शतक ठोकलं अन् मैदानात ढसाढसा रडला! बलात्कारांच्या आरोपामुळे अटक झालेल्या अभिषेक पोरेलचं रणजी ट्रॉफीमध्ये दमदार पुनरागमन
रणजी ट्रॉफी 2026-27 मध्ये बंगालचा विकेटकिपर फलंदाज अभिषेक पोरेलने दिल्ली विरुद्ध रणजी ट्रॉफी सामन्यात दमदार शतक ठोकलं आणि त्यानंतर तो मैदानात गुडघ्यावर बसून ढसाढसा रडला. पत्रकार परिषदेत त्याने त्याच्या संपूर्ण प्रवासाबाबत खुलासा केला.
Abhishek Porel Century : वाईट वेळ ही माणसाला आतून जसं तोडू शकते तसं अधिक मजबूत सुद्धा करू शकते. सध्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये रणजी ट्रॉफी 2026-27 चे सामने खेळवले जात आहेत. 11 ऑक्टोबर पासून या सामन्यांना सुरुवात झाली असून अनेक ठिकाणी संघांमध्ये रोमांचक सामने पाहायला मिळत आहेत. बंगालचा विकेटकिपर फलंदाज अभिषेक पोरेलने दिल्ली विरुद्ध रणजी ट्रॉफी सामन्यात दमदार शतक ठोकलं आणि त्यानंतर तो मैदानात गुडघ्यावर बसून ढसाढसा रडला. अभिषेक पोरेलवर मागील महिन्यात एका तरुणीने लग्नाचे अमिश दाखवून बलात्काराचा आरोप केले होते, त्यासंदर्भात पोलिसांनी अभिषेकला ताब्यात घेऊन अटक केली होती. १४ दिवसांच्या अटकेनंतर अभिषेकची जामिनावर सुटका झाली. मागील काहीकाळापासून अभिषेक पोरेल हा कायदेशीर लढाई लढत आहे. दिवस अखेरीस अभिषेक म्हणाला की शतक ठोकल्यावर त्याला रडायचं नव्हतं पण तो अश्रू थांबवू शकला नाही. त्याने सांगितलं की या कठीण काळाने त्याला मानसिक रूपाने मजबूत केले.
अभिषेक पोरेल काय म्हणाला?
दिल्ली विरुद्ध अभिषेक रणजी ट्रॉफीच्या ग्रुप सी सामन्यात पोरेलने जबरदस्त फलंदाजी केली. शतक पूर्ण केल्यावर तो मैदानात खूप भावुक झाला आणि त्याची चर्चा झाली. दिवसाच्या शेवटी खेळ संपल्यावर झालेल्या पत्रकार परिषदेत अभिषेक पोरेलने त्याच्या शतकाबाबत आणि त्यानंतरच्या भावुक क्षणाबाबत भाष्य केले. पत्रकार परिषदेत अभिषेक म्हणाला की, 'मला रडायचं नव्हतं, पण आपोआप डोळ्यातून अश्रू निघाले. त्याने स्पष्ट केलं की कोणत्याही वादाविषयी बोलण्याऐवजी त्याला आपल्या बॅटिंगने उत्तर द्यायचे आहे.तो त्याचं लक्ष फक्त क्रिकेट खेळण्यात आणि त्यात चांगलं प्रदर्शन करण्यावर आहे'.
कठीण काळाने मजबूत केलं :
अभिषेक पोरेलने सांगितले की, कठीण काळात त्याला खूप काही शिकायला मिळाले. या अनुभवांनी त्याला मानसिकदृष्ट्या खंबीर बनवले. फलंदाजी करतानाही, कोणाला काही बोलण्यापेक्षा धावा काढूनच उत्तर देण्याची त्याची मानसिकता होती.
11 ऑक्टोबर पासून सुरु झालेल्या दिल्ली विरुद्ध बंगाल सामन्यात दिल्लीचा पहिला डाव 240 धावांवर आटोपला. त्याला प्रत्युत्तर म्हणून बंगालने फलंदाजी केली, दिवसाचा खेळ संपेपर्यंत त्यांनी 79 षटकांत 3 बाद 304 धावा केल्या होत्या. सुदीप कुमार घरामी (122*) आणि अभिषेक पोरेल (114*) हे नाबाद राहिले. या जोडीने चौथ्या विकेटसाठी 199 धावांची अभेद्य भागीदारी करत बंगालला मजबूत स्थितीत पोहोचवले.
अभिषेक पोरेलवर काय होते आरोप?
अभिषेक पोरेलवर कर्नाटकच्या एका मेडिकल विद्यार्थिनीने 23 जून रोजी अभिषेक पोरेल विरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. दोघे जवळपास साडे तीन वर्ष एका रिलेशनशिपमध्ये होते आणि त्यांनी लग्न करण्याचं सुद्धा ठरवलं होतं. मात्र महिलेने नंतर आरोप केला की अभिषेकने नंतर तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला.
या प्रकरणात बलात्कार आणि गुन्हेगारी स्वरूपाची धमकी दिल्याचा आरोप आहे. तक्रार प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. 20 जुलै रोजी कलकत्ता उच्च न्यायालयाने पोलिसांना पोरेल यांना अटक करण्याचे निर्देश दिले. न्यायालयाने त्याचा जामीन फेटाळला आणि त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.एका महिन्याहून अधिक काळ तुरुंगात राहिल्यानंतर त्याला जामीन मंजूर करण्यात आला. अद्याप त्याच्या वरचे आरोप न्यायालयात सिद्ध झालेले नाहीत.