SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

अमित मिश्राचा विराट कोहलीवर गंभीर आरोप; म्हणाला, 'त्याने माझा फोन सुद्धा ...'

Amit Mishra On Virat Kohli : भारताचा माजी गोलंदाज अमित मिश्राने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याच्या टीम इंडियातील पुनरागमन न होण्यासाठी विराट कोहलीला कारणीभूत ठरवले आहे. अमित मिश्रा म्हणाला की त्याला पुनरागमनाच्या आशा दाखवण्यात आल्या, मात्र तसं कधी झालंच नाही.

Reported By pooja pawar Written By pooja pawar
Published: Oct 22, 2026, 01:53 PM IST | Updated: Oct 22, 2026, 02:33 PM IST
Image Credit: अमित मिश्राचा विराट कोहलीवर गंभीर आरोप; म्हणाला, 'त्याने माझा फोन सुद्धा ...'
Join

Amit Mishra On Virat Kohli :  भारतीय क्रिकेट संघाचा माजी लेग स्पिनर असलेल्या अमित मिश्राने माजी कर्णधार विराट कोहलीवर गंभीर आरोप केले आहेत. अमित मिश्रणे त्याच्या आंतरराष्ट्रीय करिअर संपुष्टात येण्यासाठी आणि टीम इंडियात पुनरागमन न झाल्याप्रकरणी विराट कोहलीला जबाबदार ठरवत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. आकाश चोपडाशी बोलताना अमित मिश्राने दावा केला की दुखापत झाल्यावर त्याला संघात परत घेण्यात येईल असा विश्वास देण्यात आलेला. मात्र अमित पूर्णपणे फिट झालेला असताना सुद्धा त्याला पुन्हा भारतीय संघात संधी देण्यात आली नाही. अमित मिश्राच्या सांगण्यानुसार विराट कोहलीशी संपर्क करण्याचा प्रयत्न सुद्धा करण्यात आलेला, परंतू त्याला कोणतेही स्पष्ट उत्तर मिळालं नाही.

एका ओव्हरमध्ये 5 विकेट :

आकाश चोप्राशी मुलाखतीत बोलताना अमित मिश्राने त्याच्या अमित मिश्राने आपल्या कारकिर्दीतील अशा एका टप्प्याची आठवण सांगितली, जेव्हा ते उत्कृष्ट फॉर्ममध्ये होते. 2016 मध्ये भारत आणि न्यूझीलंड यांच्यात झालेल्या पाच सामन्यांच्या वनडे सीरिजमध्ये त्याने अत्यंत प्रभावी गोलंदाजी केली. त्यांनी या पाच सामन्यांत एकूण 15 विकेट मिळवले आणि त्यांना प्लेअर ऑफ द सिरीज म्हणून गौरवण्यात आले.

29 ऑक्टोबर 2016 रोजी विसशाखापट्टणम येथे खेळवण्यात आलेल्या पाचव्या निर्णायक वनडे सामन्यात अमित मिश्राने फक्त 18 धावा देऊन 5 विकेट घेतल्या होत्या. भारताने न्यूझीलंडला 190 धावांनी पराभूत करून सीरिज 3-2 ने आपल्या नावावर केली. त्या सामन्यात मिश्राला प्लेअर ऑफ द मॅच म्हणूनही घोषित करण्यात आले होते. मात्र एवढी प्रभावी कामगिरी करूनही अमित मिश्राची आंतरराष्ट्रीय कारकीर्द फार पुढे जाऊ शकली नाही. दुखापतीमुळे संघातून बाहेर पडल्यानंतर, त्याला पुन्हा भारतीय संघात आपले स्थान मिळवता आले नाही.

विराटवर केले गंभीर आरोप :

आकाश चोपडाशी बोलताना गोलंदाज अमित मिश्राने त्याला कमबॅकची संधी न मिळाल्याने निराशा व्यक्त केली. अमित मिश्राच्या सांगण्यानुसार अमित जेव्हा दुखापतग्रस्त होता तेव्हा विराट कोहली हा टीम इंडियाचा कर्णधार होता. त्याने असा दावा केला की कोहलीने त्याला पुनरागमनाबाबत खात्री दिली होती. मिश्राने सांगितले की, दुखापत झाल्यानंतर त्याने सातत्याने आपल्या फिटनेसवर काम केले आणि रिहॅबिलिटेशन पूर्ण केली. पुन्हा खेळण्यासाठी तंदुरुस्त झाल्यावर त्याने विराट कोहलीशी संपर्क साधला.

अमित मिश्राच्या सांगण्यानुसार विराटने त्याच्याकडून थोडा वेळ मागितला आणि एक आठवड्याच्या आत उत्तर देईन असं सांगितलं. अमित मिश्राच्या म्हणण्यानुसार, एक आठवडा उलटला, त्यानंतर दोन आणि तीन आठवडेही निघून गेले, तरीही अमितला विराटकडून कोणताही फोन आला नाही. त्यानंतर त्याने स्वतःहून पुन्हा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याला स्पष्ट उत्तर मिळाले नाही. मिश्रा यांनी सांगितले की, तेव्हा त्यांना जाणीव झाली की आता भारतीय संघात परतण्याची शक्यता जवळपास संपली आहे. त्यानंतर अमितने कोहलीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करणं थांबवलं.

अमित मिश्रा विराटच्या या वागणुकीमुळे नाराज होता, कारण दुखापत होण्यापूर्वी त्याची कामगिरी उत्कृष्ट होती. अमितच्या मते एखादा खेळाडू दमदार कामगिरी केल्यानंतर दुखापतीमुळे मैदानाबाहेर गेला असेल. तर त्याला पुनरागमन करण्याची योग्य संधी दिली गेली पाहिजे.
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

पूजा सुनील पवार या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 6 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. प्रिंट मीडियापासून सुरु झालेला त्यांचा पत्रकारितेतील प्रवास हा टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया पर्यंत येऊन पोहोचला आहे. सध्या त्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. पूजा पवार या बीसीसीआयच्या मान्यताप्राप्त पत्रकार असून आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा मान्यताप्राप्त पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन, राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल क्षेत्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.प्रिंट मीडिया ते डिजिटल पर्यंतची कारकीर्द:पूजा यांनी 'सकाळ' वृत्तपत्रापासून त्यांच्या पत्रकारितेला सुरुवात केली. यात त्यांना सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांमध्ये फिल्ड रिपोर्टींगचा अनुभव मिळाला. त्यांनी आपल्या लेखनाच्या माध्यमातून अनेक सामाजिक समस्यांना वाचा फोडली ज्याचा इम्पॅक्ट सुद्धा प्रशासनाच्या कारभारावर पाहायला मिळाला. पूजा यांनी 'न्यूज १८ लोकमत' पासून डिजिटल पत्रकारितेत पाऊल टाकले. येथे त्यांना विशेषतः क्रीडा पत्रकारितेमध्ये भक्कम अनुभव मिळाला शिवाय मनोरंजन आणि लाईफस्टाईलशी निगडित विषयांवर देखील त्यांनी लेखन केले. त्यानंतर आता पूजा या झी २४ तास मध्ये मुख्यत्वे क्रीडा विभागासाठी काम करत आहेत.  पूजा यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्या स्वतः बॉक्स क्रिकेटमध्ये एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत.शैक्षणिक पात्रतापूजा पवार यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.

ZEENEWS TRENDING STORIES