पदार्पणाच्या पहिल्याच 2 बॉलमध्ये 2 विकेट, भारतीय महिला खेळाडूने रचला विक्रम
India VS Zimbabwe Niki Prasad Takes 2 Wickets : भारत विरुद्ध झिम्बाब्वे यांच्यात टी20 सीरिज खेळवली जात असून यात भारताकडून पदार्पण करणाऱ्या निकी प्रसादने जबरदस्त कामगिरी करून विक्रम केला. तिने पदार्पणाच्या पहिल्या दोन बॉलमध्येच दोन विकेट घेतल्या.
India VS Zimbabwe : भारतीय महिला क्रिकेट संघात आता नव युग सुरु झालं असून हरमनप्रीत कौर कर्णधार पदावरून पायउतार झाल्यावर स्मृती मंधानाच्या नेतृत्वात भारतीय महिला संघ सामना खेळत आहे. स्मृती मंधानाच्या नेतृत्वात टीम इंडिया झिम्बाब्वे दौऱ्यासाठी गेली असून येथे अनुभवी खेळाडूंसह काही नव्या खेळाडूंना सुद्धा संधी देण्यात आली आहे. यात 20 वर्षांच्या निकी प्रसादच्या नावाचा समावेश होता. फक्त 20 वर्षांच्या युवा खेळाडू निकीने आपल्या डेब्यू सीरीजमध्येच आधी गोलंदाजीने तर नंतर फलंदाजीतील कामगिरीने छाप सोडली.
पदार्पणातच अविस्मारणीय खेळी :
भारत विरुद्ध झिम्बाब्वे महिला संघांमधील सध्या टी20 सीरिज सुरु आहे. निकी प्रसादच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरुवात याच सीरिजमधून झाली. तिने या सीरिजमधील पहिल्याच सामन्यात पदार्पण केले. त्या सामन्यात निकीने भारतीय संघाला कठीण परिस्थितीतून सावरले आणि दीप्ती शर्माच्या साथीने संघाला विजयापर्यंत पोहोचवले. या सामन्यात तिने 39 धावांची नाबाद खेळी केली.
पहिल्या सामन्यात फलंदाजीमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्यानंतर आता तिची गोलंदाजीत सुद्धा तिने जबरदस्त कामगिरी केली. सीरिजमधील दुसऱ्या सामन्यात निकीने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिल्याच बॉल बळी मिळवून इतिहास घडवला. 15 व्या ओव्हर गोलंदाजीसाठी आलेल्या निकीने आपल्या पहिल्याच बॉलवर चिपोनो तिरिपानोला बाद केले. तिरिपानो ही झिम्बाब्वेसाठी सर्वाधिक धावा करणारी खेळाडू होती, जिने 34 धावा केल्या होत्या. या कामगिरीसह, निकी आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिल्याच बॉलवर विकेट मिळवणारी पहिली भारतीय महिला गोलंदाज ठरली.
अशी कामगिरी करणारी पहिली गोलंदाज :
निकीने पहिल्या बॉलमध्ये तर विकेट घेतलीच मात्र दुसऱ्या बॉलमध्ये सुद्धा निकीने विकेट घेऊन सर्वांना आश्चर्यचकित केलं. यासोबतच ती आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपल्या सुरुवातीच्या 2 बॉलमध्ये 2 विकेट घेणारी पहिली भारतीय क्रिकेटर ठरली आहे. जरी निकीला हॅट्ट्रिक साधता आली नाही, तरीही तिने इतिहासात आपले नाव कोरले. तिने टाकलेल्या 2 ओव्हरमध्ये 7 धावा दिल्या आणि 2 विकेट मिळवले.