ऑलिम्पिक 2036 च्या यजमानपदासाठी भारताची सहा देशांशी स्पर्धा, कोणते देश शर्यतीत?
Olympics 2036 : भारताने कॉमनवेल्थ 2030 नंतर आता ऑलिम्पिक 2036 चं यजमानपद भूषवण्यासाठी सुद्धा इच्छा व्यक्त केली आहे. मात्र ऑलिम्पिक 2036 च्या यजमानपदासाठी भारतासह इतर सहा संघ शर्यतीत आहेत. त्यामुळे ऑलिम्पिक 2036 चं यजमानपद कोणाला मिळणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
Olympics 2036 : भारत 2030 मध्ये कॉमनवेल्थ स्पर्धेचं यजमानपद भूषवणार आहे. गुजरातच्या अहमदाबाद शहरात या कॉमनवेल्थ स्पर्धेचं आयोजन होणार असून त्यासाठी जोरदार हालचाली सुरु आहेत. नुकत्याच झालेल्या एशियन गेम्स 2026 स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी मोठ्या प्रमाणावर पदकांची लयलूट करून भारताचं नाव उज्जवल केलं. कॉमनवेल्थ स्पर्धेनंतर आता भारत ऑलिम्पिक 2036 चं यजमानपद भूषवण्यासाठी सुद्धा इच्छा व्यक्त करत आहे. मात्र ऑलिम्पिक 2036 स्पर्धेचं यजमानपद मिळवण्यासाठी भारतासह अन्य सहा देशांनी सुद्धा त्यांच्या देशात स्पर्धेचे आयोजन व्हावे अशी तीव्र इच्छा व्यक्त केली आहे.
कोणते संघ शर्यतीत?
भारत आणि अन्य सहा देशांनी 2036 च्या ऑलिम्पिक स्पर्धेचे यजमानपद मिळवण्यासाठी तीव्र इच्छा व्यक्त केली असून, हे सर्व देश पुढील महिन्यात 'फ्युचर होस्ट कमिशन' समोर आपल्या क्रीडा प्रकल्पांचे सादरीकरण करणार आहेत, अशी माहिती आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने मंगळवारी दिली. ऑलिम्पिकच्या यजमानपदाच्या शर्यतीत भारताला जर्मनी, हंगेरी, कतार, दक्षिण कोरिया, दक्षिण आफ्रिका आणि तुर्की या देशांशी स्पर्धा करावी लागणार आहे. हे सर्व देश सध्या आयओसी बरोबर सतत चर्चा या टप्प्यात आहेत.
अहमदाबाद शहराची निवड :
भारताने या ऑलिम्पिक आयोजन करण्यासाठी अहमदाबाद शहराची निवड केली आहे. भारताने 2024 मध्येच यासाठीची प्राथमिक इच्छा अधिकृतपणे नोंदवली होती. आता भारतीय ऑलिम्पिक संघटना, गुजरात सरकार आणि केंद्रीय क्रीडा मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने पुढील प्रक्रिया आणि बोलणी केली जाणार आहेत. भारताने अद्याप एकदाही ऑलिम्पिकचे यजमानपद भूषवलेले नाही. आयओसीने 2036 च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी 31 ऑक्टोबर 2026 नंतर कोणत्याही नव्या देशाच्या दावेदारीचा विचार केला जाणार नसल्याचे स्पष्ट केले.
नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या शहराचा सादरीकरणादरम्यान आराखडा, खेळाडूंचा अनुभव, निधीचे धोरण, राजकीय आणि जनतेचा पाठिंबा, तसेच पायाभूत सुविधा या तांत्रिक घटकांचे मूल्यमापन केले जाणार आहे. सुधारित नियमांनुसार 2028 मध्ये अंतिम टप्यातील प्रक्रिया सुरू होईल आणि 2036 च्या ऑलिम्पिक यजमान शहराची अधिकृत घोषणा 2029 च्या मध्यावर केली जाईल. एशियन गेम्स 2026 मध्ये भारताच्या खात्यात खेळाडूंनी उत्तम परफॉर्मन्स करून 85 पदकांची कमाई केली. यात भारतीय खेळाडूंनी 21 सुवर्ण, 27 रौप्य आणि 37 कांस्य पदकांचा समावेश केला होता.