SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

'कितीही बुलेटप्रूफ केबिन...', अमिताभ बच्चन यांना जीवे मारण्याची धमकी; मुंबईत 200 जण पोहचल्याचा दावा! शीख समुदायाबद्दलचा हा वाद काय? धमकावणारा गोल्डी ढिल्लोन आहे कोण?

अमिताभ यांच्यावर हल्ला करण्याचा कट रचणाऱ्या दोन शार्पशूटर्सला अटक करण्यात आल्यानंतर आता हे शूटर्स आपल्याच टोळीचे असल्याचं सांगत स्पेनच्या तुरुंगात बसून अमिताभ यांना धमकी देणारा गँगस्टर आहे तरी कोण जाणून घ्या...

Reported By Swapnil Ghangale Written By Swapnil Ghangale
Published: Nov 16, 2026, 02:34 PM IST | Updated: Nov 16, 2026, 02:50 PM IST
Image Credit: सोशल मीडियावरुन देण्यात आली धमकी (प्रातिनिधिक फोटो)
Join

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना पंजाबमधील एक कुख्यात गँगस्टर असलेल्या गोल्डी ढिल्लोनने जीवे मारण्याची धमकी दिली आहे. सोशल मीडियावरून ही धमकी देण्यात आली असून शीख समुदायासंदर्भात 1984 च्या शीखविरोधी दंगलीनंतर केलेल्या कथित विधानाचा सूड आपण घेणार असल्याचं गोल्डी ढिल्लोनने म्हटलं आहे. विशेष म्हणजे शनिवारीच अमिताभ यांच्या 'जलसा' या निवासस्थानावर गोळीबार करण्याचा कट रचणाऱ्या दोन शार्पशूटरला अटक करण्यात आल्यानंतर हा इशारा देण्यात आला आहे.

200 साथीदार तयार असल्याचा दावा

अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांना गोल्डी ढिल्लोनने जीवे मारण्याची धमकी दिली आहे. गँगस्टर गोल्डी ढिल्लोंच्या नावाने असलेल्या सोशल मिडिया अकाऊंटवरुन धमकीची पोस्ट करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांनी अटक केलेल्या विकास ठाकूर आणि दीपक सिंग यांना आपले साथीदार असल्याचं पोस्टमध्ये म्हटलं आहे. दोघांच्या अटकेमुळे कोणताही कट उधळला गेलेला नाही, मुंबईत आणखी 200 साथीदार तयार असल्याचा दावा या पोस्टमधून करण्यात आला आहे.

कितीही बुलेटप्रूफ केबिन उभारले तरी...

शीख समुदायाविरोधात बोलणाऱ्यांना लक्ष्य करण्याची धमकी या पोस्टमधून देण्यात आली आहे. कितीही बुलेटप्रूफ केबिन उभारले तरी अमिताभ आणि अभिषेक बच्चन यांना ठार मारणार असल्याचा पोस्टमध्ये उल्लेख करण्यात आला आहे.  1984 च्या शीखविरोधी दंगलींचा संदर्भ देत धमकी देण्यात आली आहे. मात्र सोशल मीडियावरील पोस्टची स्वतंत्रपणे पुष्टी झालेली नाही. शनिवारी दिल्ली पोलिसांनी दिल्ली आणि मुंबईमधून विकास ठाकूर आणि दीपक सिंग यांना अटक केल्याने अमिताभ यांच्यावरील हल्ल्याच्या कट उधळल्याच्या बातम्या समोर आल्यानंतरही ही धमकी देण्यात आली आहे. अटक करण्यात आलेले दोन्ही आरोपी मूळचे पंजाबचे आहेत.

शीखविरोधी दंगल प्रकरणाशी अमिताभ यांचा संबंध काय?

1984 च्या शीखविरोधी दंगलींबाबत अमिताभ बच्चन यांनी केलेल्या विधानांचा संदर्भ गोल्डी ढिल्लोनच्या पोस्टणध्ये देण्यात आला आहे. मात्र, आपण ही विधाने कधीच केली नव्हती असं अमिताभ यांनी यापूर्वीच स्पष्ट केलं असून शीखविरोधी असल्याचे सर्व आरोप फेटाळून लावलेत. 1984 च्या शीखविरोधी दंगलींबाबत अमिताभ बच्चन यांनी हिंसाचार भडकावल्याचे आरोप करण्यात आले होते. काही शीख संघटना आणि साक्षीदारांनी केलेल्या आरोपानुसार, बच्चन यांनी दूरदर्शनच्या थेट प्रक्षेपणादरम्यान हात उंचावून "खून का बदला खून से लेंगे" अशी घोषणा देऊन जमावाला भडकावलं होतं, असा उल्लेख 'टाइम्स ऑफ इंडिया'च्या वृत्तात आहे.

या वादावर अमिताभ यांनी दिलेलं स्पष्टीकरण

2011 मध्ये अमिताभ बच्चन यांनी शीख धर्माचे सर्वोच्च पीठ असलेल्या श्री अकाल तख्त साहिबचे जथेदार यांना एक पत्र लिहून आपली बाजू स्पष्ट केली होती. हिंसाचार भडकावल्याचे आणि शीखविरोधी घोषणा दिल्याचे सर्व आरोप निराधार आणि धादांत खोटे असल्याचे त्यांनी पत्रात म्हटले होतं. 1984 च्या शीखविरोधी दंगली या धर्मनिरपेक्ष भारताच्या इतिहासातील एक काळा अध्याय आणि कलंक असल्याचे त्यांनी या पत्रात नमूद केले होते. आपली आई तेजी बच्चन या स्वतः शीख कुटुंबातील होत्या. त्यामुळे शीख धर्म आणि परंपरेबद्दल आपल्या मनात नेहमीच नितांत आदर असल्याचे त्यांनी नमूद केले होते.

गोल्डी ढिल्लोन आहे कोण?

गोल्डी ढिल्लोनचे खरे नाव गुरप्रीत सिंह आहे. तो मूळचा पंजाबमधील पटियाला जिल्ह्यातील राजपुरा येथील रहिवासी असून, त्याला 'गोल्डी राजपुरा' या नावानेही ओळखले जाते. सुरुवातीच्या काळात तो लॉरेन्स बिश्नोई आणि गोल्डी ब्रार टोळीचा एक महत्त्वाचा आणि विश्वासू सदस्य मानला जात असे. नंतरच्या काळात त्याचे बिश्नोई गटाशी मतभेद झाल्याने तो रोहित गोदाराच्या टोळीत गेला. 2022 मध्ये तो बेकायदेशीर मार्गाने भारतातून पळून युरोपमध्ये गेला. आधी तो जर्मनी आणि नंतर स्पेन गेला होता. तेथूनच तो पंजाब, चंदीगड, हरियाणा, दिल्ली-एनसीआर आणि कॅनडामध्ये खंडणी, गोळीबार आणि 'टार्गेट किलिंग'चे नेटवर्क चालवतो.  त्याच्यावर हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणी आणि शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत डझनभराहून अधिक गंभीर गुन्हे दाखल आहेत. राष्ट्रीय तपास संस्थेने त्याच्यावर 10 लाख रुपयांचे, तर पंजाब पोलिसांनी 5 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. भारतीय गुप्तचर यंत्रणा आणि पंजाब पोलिसांच्या अँटी-गँगस्टर टास्क फोर्सने दिलेल्या माहितीच्या आधारे, जुलै 2026 मध्ये स्पेनच्या सुरक्षा यंत्रणांनी त्याला माद्रिद शहरातून ताब्यात घेतले आहे. त्याला भारतात प्रत्यार्पण करून आणण्याची कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

मोजक्या शब्दांमध्ये...स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.पत्रकारितेचा श्रीगणेशास्वप्निल यांनी पत्रकारितेच्या दुसऱ्या वर्षापासूनच 'ठाणे वैभव' या ठाण्यातील स्थानिक वृत्तपत्रामध्ये शिकाऊ पत्रकार म्हणून कामाला सुरुवात केली. सांस्कृतिक आणि गुन्हेगारी यासंदर्भातील वृत्तांकन यांनी या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये केलं. बीएमएमच्या तृतीय वर्षाला ठाण्यातील जोशी-बेडेकर महाविद्यालयातील 'ऋत' या पत्रकारिता विभागाच्या महाविद्यालयीन वृत्तपत्रासाठी स्वप्निल यांनी उपसंपादक म्हणून काम पाहिले.डिजिटलमध्ये एन्ट्री'महाराष्ट्र टाइम्स डॉट कॉम'च्या माध्यमातून पहिल्यांदा डिजिटल क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या स्वप्निल यांनी सुरुवातीला सोशल मिडिया व्यवस्थापक म्हणून काम पाहिले. त्यानंतर हळूहळू ते डिजिटल वृत्तांकनाकडे वळले. त्यांनी 'महाराष्ट्र टाइम्स' वृत्तपत्रामध्येही माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लेखन केलं. मुख्य पुरवणीसोबतच अनेकदा रविवार विशेष अंकांमध्येही त्यांचे लेख छापून आले आहेत. 'मुंबई टाइम्स' या पुरवणीअंतर्गत विद्यार्थ्यांच्या विश्वातील अनेक विषय त्यांनी कॉलेज क्लब रिपोर्ट्सच्या माध्यमातून हाताळले. कॉलेज क्लब रिपोर्टर्ससोबतच्या कामासोबतच त्यांनी 'मटा सन्मान', 'मटा श्रावण क्विन' यासारख्या कार्यक्रमांसाठी डिजिटल आणि प्रिंटदरम्यान संयोजक म्हणून काम पाहिलं. जवळपास पाच वर्ष ते मटामध्ये कार्यरत होते.प्रगल्भतेची आसमहाराष्ट्र टाइम्सनंतर तितक्याच तोलामोलाच्या 'लोकसत्ता'मध्ये स्वप्निल यांनी काम केलं. या ठिकाणीही ते पाच वर्ष कार्यरत होते. 'मटा'पासून सुरु झालेल्या प्रवासाला 'लोकसत्ता'मध्ये प्रगल्भता लाभली. राजकीय बातम्या, ताज्या घडामोडी, ट्रेडींग बातम्या याबरोबरच त्यांनी डिजिटल आणि प्रिंटमधील समन्वयाचं (इंटीग्रेशन) कामही त्यांनी लोकसत्तामध्ये केलं. 'लोकसत्ता'मधील 'व्हिवा' या पुरवणीमध्ये तरुणाईसंदर्भातील विषयांवर त्यांनी लेखन केलं. तसेच 'लोकप्रभा'च्या माध्यमातून त्यांनी माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लिखाण केलं. लोकसत्ता डॉट कॉममध्ये स्वप्निल यांनी चार ते पाच सेक्शनसची जबाबदारी पार पाडली.तो सध्या काय करतो?'लोकसत्ता'नंतर स्वप्निल यांनी पहिल्यांदाच टीव्हीशी संलग्न वेबसाईटसाठी म्हणजेच 'झी 24 तास'च्या वेबसाईटसाठी काम करण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी ते ताज्या घडामोडींबरोबरच, राजकीय बातम्या, ब्रेकिंग बातम्या, ट्रेडिंग बातम्या हाताळतात. बातमीमधील अचूक माहिती, व्याकरण, उत्तम मथळे यासारख्या गोष्टींकडे त्यांचं कटाक्षाने लक्ष असतं. लिखाणबरोबरच मॅरेथॉन पळणं, वेगवेगळ्या ठिकाणी खादडीसाठी जाणं, पुस्तकांसोबतच अवांतर वाचन यासारख्या गोष्टींना ते प्राधान्य देतात.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES