'बलात्काराच्या धमक्या अन् अश्लिल फोटो', बॉलिवूड गायिकेकडून सलमानच्या गाण्याची खिल्ली; करुन दिली जुनी आठवण!
सोना मोहपात्राने सलमान खानच्या ‘मातृभूमी’ चित्रपटातील ‘तेरी सेक्सी ब्युटी’ गाण्यावर टीका केली. 2016 मधील वादानंतर मिळालेल्या धमक्या आणि 20 वर्षांच्या संगीत प्रवासाबद्दलही तिने भाष्य केले.
बॉलिवूड अभिनेता सलमान खान कधी गाण्यांमुळे तर कधी वादांमुळे चर्चेत असतो. त्याने कितीही समाजसेवा केली तरी जुने वाद त्याची पाठ सोडताना दिसत नाहीत. त्याच्या गाण्याच्या रिलीजनंतर नुकतीच याची प्रचिती आलीय. सलमानच्या गाण्याची बॉलिवूड गायिकेने खिल्ली उडवलीय. ते करताना त्याला 2016 मध्ये झालेल्या वादाची आठवणही करुन दिली. काय घडलंय नेमकं? सविस्तर जाणून घेऊया.
सलमानच्या गाण्याची उडवली खिल्ली
बॉलिवूडमध्ये आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाणारी गायिका सोना मोहपात्रा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सलमान खानच्या आगामी ‘मातृभूमी : मे वॉर रेस्ट इन पीस’ या चित्रपटातील ‘तेरी सेक्सी ब्युटी’ या गाण्यावर तिने उपरोधिक टीका केलीय. विशेष म्हणजे, संगीत क्षेत्रात 20 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तिने सलमान खानसोबतच्या जुन्या वादाचीही आठवण सांगितली. 2016 मध्ये सलमानच्या एका वक्तव्यावर टीका केल्यानंतर आपल्याला बलात्काराच्या धमक्या, अश्लील मॉर्फ केलेले फोटो आणि कुटुंबीयांनाही शिवीगाळ सहन करावी लागल्याचा दावा तिने केलाय.
सलमानच्या नव्या गाण्यावर टीका
सोना मोहपात्राने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर केला. दिवाळीच्या सुट्टीत ती कुटुंबासोबत केरळमध्ये होती. तिथे तिने ‘ओट्टम थुल्लाल’ या पारंपरिक कलाप्रकाराचा आनंद घेतला. मुंबईत परतल्यानंतर इन्स्टाग्रामवर तिला सलमानच्या आगामी चित्रपटातील ‘तेरी सेक्सी ब्युटी’ हे गाणे दिसले. सैनिकांच्या बलिदानावर आधारित असल्याचे सांगितल्या जाणाऱ्या चित्रपटात अभिनेता दोन पेग प्यायल्यानंतर विमानासारखे उडण्याबद्दल गात असल्याचा उल्लेख करत तिने गाण्याची खिल्ली उडवली.
‘माझं करिअर बुडालं’ म्हणणाऱ्यांना टोला
सलमान खानवर टीका केल्यामुळे तुझी बॉलिवूडमधील संधी कमी झाली, असे अनेकजण सांगतात असा उल्लेख सोनाने केला. सलमानशी पंगा घेतला नसता तर तिचे करिअर आणखी मोठे झाले असते, अशा स्वरूपाच्या सहानुभूतीच्या प्रतिक्रिया तिला मिळत असल्याचे तिने सांगितले. असे असले तरी गेल्या दहा वर्षांकडे पाहिल्यानंतर कोणाच्या करिअरला सहानुभूतीची गरज आहे?, असा उपरोधिक सवाल तिने केला. दुसऱ्यांच्या सत्तेच्या जवळ राहण्यापेक्षा स्वतःचे विश्व उभे करणे अधिक महत्त्वाचे असल्याचेही तिने म्हटले.
2016 मधील नेमका वाद काय?
हा वाद 2016 मध्ये सुरू झाला होता. ‘सुलतान’ चित्रपटाच्या शूटींगदरम्यान झालेल्या प्रचंड थकव्याची तुलना सलमान खानने बलात्कार पीडित महिलेच्या अनुभवाशी केली होती. त्याच्या या वक्तव्यावर सोना मोहपात्राने तीव्र आक्षेप घेतला होता. अशा संवेदनशील विषयावर केलेली तुलना अयोग्य असल्याचे तिने स्पष्ट केले होते. त्यानंतर सोशल मीडियावर तिला मोठ्या प्रमाणात ट्रोलिंगचा सामना करावा लागल्याचे तिने सांगितले.
बलात्काराच्या धमक्या, अश्लील फोटो; पोलिसांत तक्रार
सलमानच्या वक्तव्यावर टीका केल्यानंतर आपल्याला सामूहिक बलात्काराच्या धमक्या देण्यात आल्या, अश्लील पद्धतीने मॉर्फ केलेले फोटो पसरवण्यात आले आणि आईसह कुटुंबीयांनाही शिवीगाळ करण्यात आली, असा दावा सोनाने केला. परिस्थिती गंभीर झाल्याने पोलिसांत तक्रार दाखल करावी लागल्याचेही तिने व्हिडीओमध्ये सांगितले. तत्कालीन केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री मेनका गांधी यांच्या मंत्रालयाने ऑनलाइन छळाविरोधात पुढाकार घेतल्याचाही तिने उल्लेख केला.
2019 मध्येही सलमानवर केली होती टीका
2019 मध्येही सलमानच्या वक्तव्यांवर सोनाने आक्षेप घेतला होता. अभिनेत्री प्रियांका चोप्राने लग्नासाठी ‘भारत’ चित्रपट सोडल्याच्या मुद्द्यावर सलमानने केलेल्या टिप्पणीवर तिने टीका केली होती. त्या वेळीही आपल्याला धमक्या मिळाल्याचे तिने सांगितले. आता म्युझिक इंडस्ट्रीत 20 वर्षांच्या प्रवासाचा आढावा घेताना सोनाने आपले करिअर स्वतःच्या अटींवर घडवल्याचे स्पष्ट केलंय.