प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याचं निधन! झोपेत असतानाच आली फिट, मनोरंजन विश्वात खळबळ
अनुज ठाकूरचा मित्र आणि सहकारी रुपेश सोनार याने 30 ऑक्टोबर रोजी आपल्या इंस्टाग्रामवर एक श्रद्धांजली पोस्ट शेअर केली होती.
टीव्ही अभिनेता अनुज ठाकूरचं निधन झालं आहे. तो 33 वर्षांचा होता. 'धूम मचाओ धूम', 'बंधन सात जन्मों का', 'बींद बनूंगा घोड़ी चढ़ूंगा' आणि 'महिसागर' सारख्या टीव्ही मालिकांमध्ये त्याने काम केले. 27 ऑक्टोबरला झोपेत असतानाच त्याला फिट आणि त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. अनुज ठाकूरचा मित्र आणि सहकारी रुपेश सोनारने 30 ऑक्टोबर रोजी इन्स्टाग्रामवर एक श्रद्धांजली पोस्ट शेअर करून ही बातमी दिली. अनुज यांच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर रुपेशला झोपेत असताना फिट आल्यामुळे अनुजचे निधन झाल्याचं समजलं.
रुपेशने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत लिहिलं आहे की, "तू आता आमच्यात नाहीस, यावर अजूनही विश्वास बसत नाहीये. तू केवळ माझा मित्रच नव्हतास, तर माझ्या लहान भावासारखा होतास. आम्ही एकत्र अनेक प्रोजेक्टचे नियोजन केले होते. तुझ्या सुरुवातीच्या दिवसांतील संघर्ष आणि तुझा संपूर्ण प्रवास मी जवळून पाहिला आहे. आयुष्य खरोखरच अनपेक्षित आहे. तू इतक्या लवकर निघून गेलास, हे स्वीकारणे खूप वेदनादायी आहे. ही बातमी अजूनही खरी वाटत नाहीये. भावा, तुझी सदैव आठवण येईल. देव तुझ्या आत्म्याला शांती देवो."
रूपेश अनुजला 17 वर्षांपासून ओळखत होता. 2008 मध्ये 'बंधन सात जन्मों का' या मालिकेपासून त्यांची ओळख झाली आणि त्यानंतर त्यांनी 'बींद बनूंगा घोडी चढूंगा'सह अनेक मालिकांमध्ये एकत्र काम केले. रूपेशने सांगितले की, तो अनुजला अवघ्या 10 दिवसांपूर्वीच भेटला होता.
"माझा यावर विश्वासच बसत नव्हता, कारण मी त्याला 10 दिवसांपूर्वीच भेटलो होतो. तो रात्री झोपायला गेला आणि पुन्हा कधीच जागा झाला नाही, हे ऐकून मला मोठा धक्का बसला. नक्की काय घडले असेल, हे मला उमजत नव्हते. मी त्याच्या भावाशी बोललो, पण तो काहीही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हता," असं त्याने सांगितलं आहे.
"त्यामुळे, शनिवारी मी त्याची आई आणि भावाला भेटायला गेलो. तेव्हा मला समजले की, अनुजला फिट (seizure) आली होती आणि त्या दरम्यानच त्याचा मृत्यू झाला," असे रूपेशने 'द टाइम्स ऑफ इंडिया'ला सांगितले.