ना मुंबई, ना कोकणात...; 'या' देशाने बनवली गणपतीची 50 फुटांपेक्षा उंच मूर्ती! गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद
सिंथेटिक रॅटनपासून बनवलेली ही मूर्ती 50 फूट 2 इंच उंच आहे. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सने या मूर्तीला जगातील 'सर्वात उंच आधार असलेली कृत्रिम रॅटन मूर्ती' म्हणून मान्यता दिली आहे.
महाराष्ट्रात गणेशोत्सव अत्यंत थाटामाटात साजरा करण्यात येतो आणि यावेळी अनेक मंडळं उंच मूर्ती तयार करत सर्व गणेशभक्तांचं लक्ष वेधून असतात. खासकरुन मुंबई आणि कोकणात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो. दुसरीकडे हैदराबादमध्येही उंच गणेशमूर्ती तयार केली जाते. दरम्यान एका गणेशमूर्तीची थेट 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'मध्ये नोंद झाली आहे. पण ही गणेशमूर्ती महाराष्ट्र किंवा भारतातील नसून इंडोनिशायमधील आहे. बालीमध्ये ही गणेशमूर्ती उभारण्यात आली आहे.
इंडोनेशियामधील बालीमध्ये गणपतीची एक विशाल मूर्ती तयार करण्यात आली आहे. 50 फुटांपेक्षा जास्त उंच असणाऱ्या या मूर्तीची गिनीज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली आहे. खास बाब म्हणजे ही मूर्ती दगड, माती, लोखंड किंवा सिमेटचा वापर करुन नाही तर सिंथेटिक रॅटनच्या सहाय्याने करण्यात आली आहे. या मूर्तीची उंची 15.315 मीटर म्हणजे जवळपास 50 फूट 2 इंच आहे. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सने ही जगातील सर्वात मोठी आधार असणारे सिंथेटिक रॅटन मूर्ती असल्याचं म्हटलं आहे. ही मूर्ती बालीमधील कंपनी 'अलास हारुम बाली' (Alas Harum Bali) ने तयार केलं आहे.
ही भव्य मूर्ती इंडोनेशियातील बाली प्रांतातील गियान्यार (Gianyar) येथे उभारण्यात आली आहे. यात भगवान गणेश चित्रित आहेत. हिंदू धर्मात गणेशाला बुद्धिमत्ता, यश, सौभाग्य आणि नवीन सुरुवातीचे प्रतीक मानले जाते. भारतातील इंडोनेशिया दूतावासानेही फेसबुकवर या मूर्तीचे फोटो आणि माहिती शेअर केली असून, बालीमध्ये तिचे अनावरण करण्यात आल्याचं सांगितलं आहे.
इंडोनेशियातील 'गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स'नेही या कामगिरीची पुष्टी केली आहे. मात्र, हा जगातील सर्वात उंच गणेश पुतळ्याचा विक्रम नाही; तर हा 'सिंथेटिक रॅटन' (कृत्रिम वेत) पासून बनवलेल्या आणि आधार (सपोर्ट) असलेल्या सर्वात उंच पुतळ्याचा विक्रम आहे.
इंडोनेशिया हा जगातील सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या असलेला देश आहे आणि तिथे इस्लाम हा प्रमुख धर्म आहे. असे असूनही, या देशाची संस्कृती आणि इतिहास हिंदू व बौद्ध परंपरांनी खोलवर प्रभावित झाले आहेत. विशेषतः, इंडोनेशियातील 'बाली' प्रांत आपल्या हिंदू संस्कृतीसाठी प्रसिद्ध आहे. तिथे मोठ्या संख्येने लोक हिंदू धर्माचे पालन करतात आणि हिंदू प्रथा त्यांच्या दैनंदिन जीवनाचा व संस्कृतीचा एक अविभाज्य भाग आहेत. बालीमध्ये अनेक प्रसिद्ध हिंदू मंदिरे आहेत. त्यापैकी 'पुरा बेसाकिह' (Pura Besakih) हे मुख्य मंदिर मानले जाते, तर समुद्राच्या काठी वसलेले 'तानाह लोट' मंदिरही अत्यंत प्रसिद्ध आहे.
रामायण आणि महाभारताचा प्रभाव
बालीच्या संस्कृतीत रामायण आणि महाभारतातील कथांना विशेष स्थान आहे. पारंपारिक नृत्य आणि नाटकांच्या माध्यमातून ही महाकाव्ये जिवंत केली जातात. 'केचक' (Kecak) हे बालीचे एक प्रसिद्ध पारंपारिक नृत्य असून, त्यात रामायणातील विविध प्रसंग, जसे की सीतेचे अपहरण आणि रावणाविरुद्धचे युद्ध दर्शवले जातात.
बालीमधील चित्रकला, शिल्पकला आणि कथा सांगण्याच्या परंपरांमध्येही रामायण आणि महाभारताचा प्रभाव दिसून येतो.