Explained: डेंजर भविष्याची चाहूल... AI ची सेल्फ प्रोग्रामिंगने 100+ संस्थांमध्ये घुसखोरी; अनेक देशांच्या सरकारी वेबसाईट्समध्येही फेरफार
जगभरामध्ये एआयच्या भविष्यासंदर्भात चिंता व्यक्त होत असून एआय बनवणाऱ्या मानवासाठीच हे तंत्रज्ञान धोकादायक होऊ शकतं असं म्हटलं जात आहे. एआय मानवाच्या हाताबाहेर जाण्याची भीती व्यक्त केली जात असतानाच एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. त्याबद्दल जाणून घेऊयात...
मानव आणि मशिन्समध्ये भविष्यात संघर्ष अटळ असल्याची शक्यता व्यक्त केली जात असतानाच या भयंकर भविष्याची चाहूल देणारी घटना समोर आली आहे. सध्या जगभर चर्चा असलेली कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच एआय आता केवळ मोबाईलवर उत्तरं देण्यापर्यंतच मर्यादित राहिलेली नाही. ही यंत्रणा स्वत:ची भाषा तयार करुन एकमेकांशी मानवाला न कळणाऱ्या भाषेत संवाद साधेल अशी शक्यता व्यक्त केली जात होती. असे काही प्रकार नोंदवले गेले असतानाच यापुढे जात आता या वेबसाईटवर काम करुन, माहिती शोधून काढणाऱ्या या यंत्रणेचा भाग असलेल्या ओपनएआयच्या एआय एजंट्सने 100 हून अधिक संस्थांच्या वेबसाईट्सवर अपेक्षेहून विचित्र कृती करण्याचा प्रयत्न केल्याचं समोर आलं आहे. विशेष म्हणजे एआयकडून झालेली ही कृती 'चूक' असल्याचं ओपनएआय कंपनीने मान्य केली असून संबंधित संस्थांना सतर्कतेचा इशाराही दिला आहे.
काही देशांच्या सरकारी वेबसाईट्सवर परस्पर कृती
एआय एजंट्सच्या अशा अनपेक्षित आणि अनियंत्रित पद्धतीने व्यक्त होण्याचा हा काही पहिलाच प्रकार नाही. यापूर्वीही एआय एजंट्सनी केवळ चाचणीसाठी तयार केलेल्या मर्यादित क्षमतांबाहेर पडून दुसऱ्या बाहेरील प्रणालींवर अनधिकृतपणे कृती करण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले होते. विशेषतः सप्टेंबर महिन्यात ओपनएआयशी संबंधित एआय एजंट्सच्या संशयास्पद हालचालींबाबत अनेक घटना समोर आलेल्या. एआयने परस्पर कृती केलेल्या वेबसाईट्समध्ये काही देशांच्या सरकारी वेबसाईट्सचाही समावेश होता.
एआय काय वेगळं करतं?
नॉर्मल कंप्युटर प्रोग्राम हे आधीच ठरवून दिलेल्या नियमांनुसार काम करतात. मात्र, एआय एजंटची कार्यपद्धती पूर्णपणे वेगळी आणि आधुनिक असते. एआय यंत्रणेला एखादे अंतिम टार्गेट दिले की, ते पूर्ण करण्यासाठीचे मधले अनेक टप्पे एआय स्वतःच्या बुद्धीने निर्णय घेऊन ठरवतो आणि काहीही करुन अंतिम टार्गेटपर्यंत पोहोचतो. त्यामुळेच 'काय करायचे?' यासोबतच ते काम 'कसे करायचे?' हा निर्णय घेण्याचे स्वातंत्र्यही काही प्रमाणात एआयकडे असते.
100+ अधिक संस्थांना इशारा
अनपेक्षित घडामोडींनंतर ओपनएआयने तातडीने पावले उचलत जगभरातील 100 हून अधिक सरकारी आणि खाजगी संस्थांना याबाबतची माहिती दिली आहे. संबंधित संस्थांना त्यांच्या मुख्य प्रणाली आणि वेबसाईट्सवरील संशयास्पद हालचालींची कसून तपासणी करण्यास सांगण्यात आले आहे.
हा गोंधळ का झाला?
ओपन एआयने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, काही एआय एजंट्सनी त्यांना नेमून दिलेल्या मर्यादपेक्षा पूर्णपणे वेगळ्या पद्धतीने इंटरनेटचा वापर करण्यास सुरुवात केली. हे एआय एजेंट्स त्यांना दिलेले काम पूर्ण करण्यासाठी मानवी हस्तक्षेपाशिवाय स्वतःहून अनेक डिजिटल कृती करू शकतात. स्वत:चे स्वत: निर्णय घेऊ शकतात. मात्र, या प्रकरणांमध्ये एआयला देण्यात आलेल्या आदेशाचा अर्थ त्यांनी चुकीच्या पद्धथीने घेतला. तसेच, काही वेबसाईट्सवरील सामान्य मजकुरालाच एआयने स्वतःसाठीचा 'आदेश' समजल्यामुळे ही परिस्थिती अधिक गुंतागुंतीची आणि गंभीर झाल्याचं कंपनीने म्हटलं आहे. एआय सुरक्षेच्या परिभाषेत या संपूर्ण प्रकाराला 'इललिगल एजंट अक्टीव्हिटी' म्हणून पाहिले जाते.
एआय सुरक्षित करण्यासाठी काय करावं लागणार?
आता एआयने पडद्यामागे कोणती माहिती वाचली, कोणत्या आदेशाला चुकीने प्राधान्य दिले, इंटरनेटवर नेमकी कोणती कृती केली आणि त्या कृतीचा पुढे काय परिणाम होऊ शकतो, यावरही 24 तास डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवावे लागणार आहे. एआय एजंट्सना अत्यंत मर्यादित अधिकार देणे, त्यांच्या प्रत्येक डिजिटल कृतीची नोंद ठेवणे आणि कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास तातडीने 'शटडाऊन' करणारी सुरक्षा यंत्रणा उभारणे हेच आता सायबर तज्ज्ञांसमोर आव्हान आहे. म्हणजे आपण बनवलेली यंत्रणा आपल्याविरुद्ध जाऊ नये म्हणून मानवाला विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.
यापूर्वी अनेक तज्ज्ञांनी एआय मानवाच्या नियंत्रणाबाहेर गेल्यास ते स्वत:च्या भाषेत संवाद साधून मानवाविरुद्ध कृती करण्यासही मागेपुढे पाहणार नाही असा इशारा दिलेला आहे. त्यामुळेच आता जगभरामध्ये एआयचा वापर मानवी अस्तित्वाचा विचार करत अधिक सुरक्षित कसा करता येईल याबद्दलची चर्चा जोर धरताना दिसतेय.