सोशल मीडिया क्षेत्रातील दिग्गज कंपनी मेटाला अमेरिकेत मोठा कायदेशीर धक्का बसलाय. फेसबुक युजर्सची वैयक्तिक माहितीच्या गोपनीयतेबाबत दिशाभूल केल्याप्रकरणी अमेरिकेतील न्यू मेक्सिको न्यायालयाने कंपनीला तब्बल 25 अब्ज डॉलरचा दंड भरण्याचे आदेश दिलेयत. भारतीय रुपयांत ही रक्कम सुमारे दोन लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. काय घडलंय नेमकं? सविस्तर जाणून घेऊया.
न्यू मेक्सिकोमधील न्यायाधीश फ्रान्सिस मॅथ्यू यांनी 21 ऑक्टोबर 2026 रोजी मेटाला 25 अब्ज डॉलरचा दंड भरण्याचा आदेश दिला. राज्याच्या कायद्यानुसार 219 अब्ज डॉलरपेक्षा अधिक दंड योग्य ठरू शकतो, असे न्यायालयाने नमूद केले होते. यानंतर अंतिम दंडाची रक्कम कमी करून 25 अब्ज डॉलर निश्चित करण्यात आली. अमेरिकेच्या इतिहासातील एखाद्या कंपनीवरील हा सर्वात मोठ्या आर्थिक दंडांपैकी एक मानला जात आहे.
2018 मध्ये कँम्ब्रिज अॅनॅलेटीका या ब्रिटिश राजकीय सल्लागार कंपनीने फेसबुकवरील तृतीय-पक्ष अॅपच्या माध्यमातून कोट्यवधी यूजर्सची पर्सनला माहिती मिळवल्याचे उघड झाले होते. अंदाजे 87 दशलक्ष यूजर्सचा डेटा त्यांच्या स्पष्ट संमतीशिवाय मिळवण्यात आल्याचा आरोप होता. या माहितीचा वापर मतदारांचे प्रोफाइल तयार करण्यासाठी आणि राजकीय जाहिराती लक्ष्यित करण्यासाठी करण्यात आला. 2016 च्या अमेरिकन अध्यक्षीय निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा प्रकार चर्चेत आला होता.
न्यू मेक्सिको राज्याच्या अॅटर्नी जनरल यांनी 2021 मध्ये मेटाविरोधात खटला दाखल केला होता. यूजर्सचा डेटा कोणाला उपलब्ध होतो, त्याचा वापर कसा केला जातो आणि प्लॅटफॉर्मवरील द्वेषपूर्ण मजकूर व चुकीच्या माहितीवर कंपनी कशी कारवाई करते, याबाबत फेसबुकने दिशाभूल करणारी विधाने केल्याचा आरोप होता. सप्टेंबर 2026 मध्ये ज्युरींनी मेटा आणि कंपनीच्या नेतृत्वाने केलेल्या 29 पैकी 26 विधानांना दिशाभूल करणारे ठरवले.
न्यायालयाच्या निर्णयानंतर मेटाचे मुख्य कायदेशीर अधिकारी सी. जे. महोनी यांनी कंपनी या निकालाशी सहमत नसल्याचे स्पष्ट केले. कंपनीला अपीलमध्ये विजय मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. या खटल्यातून ऑनलाइन अभिव्यक्तीवर मर्यादा आणण्याचा प्रयत्न होत असल्याचा दावा मेटाने केलाय.
कॅम्ब्रिज अॅनॅलेटीका प्रकरणात मेटाला 2019 मध्ये अमेरिकेच्या फेडरल ट्रेड कमिशनकडून पाच अब्ज डॉलरचा दंड झाला होता. आता न्यू मेक्सिकोतील निर्णयामुळे डेटा गोपनीयतेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आलाय. सोशल मीडिया कंपन्या यूजर्सची माहिती कशी गोळा करतात? ती कोणासोबत शेअर करतात आणि जाहिरातींसाठी तिचा वापर कसा करतात, याबाबत पारदर्शकता असणे आवश्यक आहे. भारतातही फेसबुक आणि इन्स्टाग्रामचे मोठ्या प्रमाणावर यूजर्स आहेत. त्यामुळे वैयक्तिक माहिती शेअर करताना अॅपच्या परवानग्या, प्रायव्हसी सेटिंग्ज आणि थर्ड-पार्टी अॅप्सना दिलेला प्रवेश तपासणे महत्त्वाचे ठरते.