प्रशांत महासागराचे तापमान सातत्याने वाढत आहे. एखादा रुग्ण तापाने फणफणावा अशा प्रकारे प्रशांत महासागरातील पाण्याचे तापमान वाढत आहे. पू्र्व आणि दक्षिण-पूर्व आशियातील किनारपट्टी परिसर म्हणजेच फिलिपिन्स, तैवान, चीन आणि जपानमध्ये राहणाऱ्या कोट्यवधी लोकांना समुद्री वादळे आणि खराब हवामानाचा अनुभव हा असतोच. अल निनोचा परिणाम यामुळं महासागर गरजेपेक्षा जास्त उष्ण झाल्याने आता पूर्व आशियावर आत्तापर्यंतचा सर्वात धोकादायक टायफून (चक्रीवादळ) घोंगावतेय.
अल निनो ही अशी नैसर्गिक घटना आहे जिथे प्रशांत महासागराचे पाणी अचानक गरम होते. याचा थेट परिणाम जगभरातील हवामानावर होतो. मात्र यंदाचे अल निनो सामान्य नसून युके सेट ऑफिसच्या नुसार, हे आत्तापर्यंतच्या इतिहासातील भयानक एल नीनो असू शकते. ही परिस्थिती मार्चपर्यंत राहण्याची शक्यता आहे.
फिलिपिन्सच्या राष्ट्रीय हवामान विभागाने प्रमुख वैज्ञानिक एना लिजा सोलिस यांनी मनिला येथे एक प्रेस कॉन्फरन्समध्ये प्रशांत महासागरच्या स्थितीची तुलना तापाने फणफणलेल्या व्यक्तीशी केली आहे. त्यांनी इशारा दिला आहे की, या स्थितीमुळं महाविनाशकारी वादळांचा जन्म होऊ शकतो. जपानच्या हवामान एजन्सीच्या आकडेवारीनुसार, ऑक्टोबरमध्ये भूमध्यरेखीय प्रशांत महासागराचे तापमान सामान्यापेक्षा पू्र्ण 4 अंश अधिक आहे. 1949 पासून या महासागरातील रेकॉर्ड ठेवण्यास सुरुवात करण्यात आली आहे. या आधी डिसेंबरमध्ये हा रेकॉर्ड 3.6 डिग्री सेल्सियस इतका होता. जेव्हा समुद्राचे पाणी अधिक गरम होते तेव्हा चक्रीवादळे निर्माण होतात.
या वर्षी दक्षिण-पूर्व आणि पूर्व-आशियातील चक्रीवादळाची तीव्रता मागील वर्षांच्या तुलनेने दुप्पट झाली आहे. या परिस्थितीमुळं फक्त चक्रीवादळाची तीव्रताच नाही तर दिशादेखील बदलते. एल निनोच्या कारणावरुन हवेचा प्रवाह बदलतो. ज्यामुळं पूर्वेकडे चक्रीवादळाची तीव्रता अधिक वाढते.
फिलिपिन्सची राजधानी मनिला येथील हवामान शास्त्रज्ञ राफेला जेन डेल्फिनो आणि त्यांच्या संशोधन पथकाने, तापमान वाढत राहिल्यास वादळे कशी दिसू शकतात हे समजून घेतले. त्यांनी 2013च्या विनाशकारी 'हाययान' या महाचक्रीवादळाच्या माहितीचे विश्लेषण केले, ज्यामध्ये 6,000 हून अधिक लोकांचा बळी गेला होता.
समुद्राच्या वाढत्या तापमानामुळे या वादळांमधून होणाऱ्या एकूण पावसात 26 टक्क्यांपर्यंत वाढ होऊ शकते. फिलीपिन्ससारख्या देशासाठी हा एक मोठा धोका आहे, जिथे दरवर्षी सरासरी 20 चक्रीवादळे येतात. फिलीपिन्समध्ये वारंवार येणाऱ्या पुरांमुळे लोकांमध्ये मोठ्या प्रमाणावर संताप निर्माण झाला आहे. सरकारी भ्रष्टाचार आणि पूर नियंत्रण पायाभूत सुविधांसाठी वाटप केलेल्या निधीच्या गैरव्यवस्थापनाविरोधात देशभरात व्यापक निदर्शने होत आहेत.