गोकुळमधील सत्तासंघर्षामुळे सध्या चर्चेत असणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांना मनी लाँड्रिंग प्रकरणात मोठा दिलासा मिळाला आहे. सक्तवसुली संचलनालयाने (ED) हसन मुश्रीफ यांना क्लीन चीट दिली आहे. आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायदा (PMLA - Prevention of Money Laundering Act, 2002) अंतर्गत येणाऱ्या गुन्ह्यांची सुनावणी करण्यासाठी आणि त्यावर निर्णय देण्यासाठी केंद्र सरकारच्या किंवा उच्च न्यायालयाच्या सल्ल्याने स्थापन केलेल्या मुंबईतील विशेष सत्र न्यायालयासमोर ईडीने क्लोजर रिपोर्ट सादर केला होता. मुश्रीफ यांच्यासंदर्भातील प्रकरणांचा हा क्लोजर रिपोर्ट कोर्टाने स्वीकारला आहे. दरम्यान यावरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी अटल सेतूच्या बांधावर जाऊन उडी मारावी असा खोचक टोला त्यांनी लगावला आहे.
हसन मुश्रीफ यांना मिळालेल्या क्लीन चीटबाबत विचारलं असता राऊत म्हणाले की, "इथे बाजूला किरीट सोमय्या आहेत. त्यांनी अटल सेतूच्या बांधावरुन उडी मारावी. त्यांनी भ्रष्टाचाराविरोधात, आमच्या सर्वांविरोधात एवढी मोठी लढाई लढली, पण आता काय तोंड दाखवणार आहेत. म्हणजे तुमच्या लढाया खोट्या, बोगस होत्या. किंवा तुमच्या वॉशिंग मशीनमध्ये आल्यावर सगळे गुन्हे माफ होतात. देवेंद्र फडणवीस यांनी किरीट सोमय्यांचं थोबाड फोडलं आहे".
यावेळी त्यांनी किरीट सोमय्यांसाठी अपशब्द वापरत हा कोण आहे? अशी विचारणा केली. "जा हसन मुश्रीफच्या दारासमोर जाऊन उपोषणाला बस, किंवा हसन मुश्रीफ यांच्याविरोधात ईडीच्या दारासमोर जाऊन बस. हसन मुश्रीफ, भावना गवळी असतील ज्यांच्याविरोधात हे लढले, खटले दाखल केले. आंदोलन केलं आत ते भाजपा सोबत आहे आणि त्या सर्वांना क्लीन चीट दिली आहे. त्यामुळे आता त्याच्याकडे एकच मार्ग आहे की ज्यांच्याविरोधात आंदोलन केलं त्यांना निर्दोष ठरवलं आहे त्यांच्या दरवाजासमोर जाऊन आंदोलन करावे. ते केलं तर हा खरा", असा हल्लाबोल त्यांनी केला.
"त्याचा चेहरा पाहिला का, काळा पडला आहे, दात पडले आहेत असं वाटलं, शब्द उमटत नाहीत. तुमच्या आंदोलनाचं काय झालं? आता भाजपाने हसन मुश्रीफांचे फोटो त्यांच्या कार्यालयात लावावे आणि त्यांच्य नावाने एक पदक किरीट सोमय्यांच्या छातीवर लावावं," अशी टीका त्यांनी केली.
शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल भेटीबाबत ते म्हणाले की, "शरद पवारांना राजकारणात आणि प्रफुल्ल पटेल यांच्या पक्षात काय सुरु आहे हे माहिती आहे. कोणत्याही परिस्थितीत शरद पवार एनडीएसोबत जाणार आहे. पवार साहेब कुठेही जाणार नाहीत. मोदी कही नाही जायेंगे तसेच हमारे पवार साहेब कही नाही जायेंगे हमारे साथ रहेंगे. पटेल काहीही म्हणाले तरी शरद पवार आमच्यासोबत राहतील. पुरोगामी महाराष्ट्राचं नेतृत्व त्यांनी केलं आहे. त्यांच्याबाबत कोणी काही सांगत असेल तर त्या खोट्या आहेत. शरद पवार इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीसोबतच असून आम्हाला मार्गदर्शन देत राहतील".