निलेश लंकेंनी भाकरीच फिरवली! मातब्बर नेत्यांना शह, अहिल्यानगर जिल्हा बँकेत दणदणीत विजय; विखेंच्या कट्टर समर्थकाचा पराभव
अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या दहा जागेंचा आज मतमोजणी निकाल जाहीर झाला आहे. जिल्ह्याचं लक्ष असलेली पारनेर येथील खासदार निलेश लंके यांनी विजयाचा गुलाल उधळला आहे.
अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी झालेल्या मतदानाची आज मतमोजणी पार पडली. सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात झाली असून पहिला निकाल समोर आला आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार निलेश लंके हे विजयी झाले आहे. निलेश लंके यांनी पारनेर विविध सेवा सोसायटी गटात भाजपचे राहुल शिंदे यांचा पराभव केला.
अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूकासाठी 21 पैकी 11 जागा बिनविरोध झाल्या असून 10 जागांसाठी मतदान झालं होतं. निलेश लंके पारनेर मतदारसंघाच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मतमोजणीला सुरुवात होताच पहिल्या तासाभरातच पारनेर विविध सेवा सोसायटी मतदारसंघात खासदार निलेश लंके विजयी झाले आहे. निलेश लंके यांनी भाजपचे राहुल शिंदे यांचा पराभव केला.
पारनेर विविध कार्य.सेवा सोसायटीच्या जागेकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले होते. त्याचे कारण म्हणजे, निलेश लंके आणि सुजय विखेंचे समर्थक राहुल शिंदे यांच्यात चुरशीची लढत झाली होती. विखे -थोरात यांच्या सहकार आघाडी आणि निलेश लंके-सदाशिव लोखंडी यांच्या परिवर्तन आघाडीत चुरशीची लढत होती. अशातच निलेश लंके यांनी बाजी मारत विजयाचा गुलाल उधळला आहे. राहुल शिंदे यांचा पराभव करत 104 मतापैकी 63 मते मिळाली.
सायकलवरुन पोहोचले होते मतदानासाठी
मतदान प्रक्रियेत खासदार निलेश लंके यांच्या मतदानाची जोरदार चर्चा झाली होती. खासदार लंके पारनेर येथील मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी सायकलवरून गेले आणि आपला मतदानाचा हक्क बजावला होता. सामान्य शेतकऱ्यांसाठी असलेल्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मतदानासाठी जाताना खासदार लंके यांनी सायकलचा वापर केल्यामुळे त्यांच्या मतदानाची सर्वत्र चर्चा सुरू होती.
सर्वपक्षीय नेत्यांचे पॅनेल
संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या निवडणुकीकडे लागून राहिलेल्या या निवडणुकीसाठी जिल्ह्यातील मातब्बर असलेल्या थोरात, विखे पाटील, गडाख या सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येऊन सहकार विकास पॅनल स्थापन केला होती. या पॅनलच्या 11 जागा बिनविरोध निवडून आल्या असून जिल्हा बँकेच्या एकूण 21जागांपैकी 11 जागा बिनविरोध झाल्याने उर्वरित 10 जागांसाठी ही मतदान प्रक्रिया होत आहे. दरम्यान या निवडणुकीसाठी एकूण 3 हजार 837 मतदार मतदानाचा हक्क बजावला. जिल्ह्यातील 14 तालुक्यांमध्ये 33 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडली.
निवडणुक का महत्त्वाची?
अहिल्यानगर हा सहकाराचा जिल्हा म्हणून ओळखला जातो जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक जिल्ह्यातील नावाजलेली बँक असून या बँकेच्या माध्यमातून जिल्ह्यातील शेतकरी आणि सहकार उद्योगाला चालना मिळते त्यामुळे या बँकेवर वर्चस्व ठेवण्यासाठी सर्वच नेत्यांची धडपड असते