'जिथे पाऊसच पडत नाही, तिथे अजितदादांना आणायचं का?' आनंदराज आंबेडकरांची जीभ घसरली; वक्तव्यामुळे नवा वाद!
आनंदराज आंबेडकर यांनी जालन्यात रिपब्लिकन सेनेच्या वर्धापन दिन सोहळ्यात दिवंगत अजित पवार यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झालाय. याचा राष्ट्रवादी काँग्रेसकडून निषेध व्यक्त केला जातोय.
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबत रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात वातावरण तापलंय. जालन्यात आयोजित रिपब्लिकन सेनेच्या 28 व्या वर्धापन दिन सोहळ्यात दुष्काळाच्या प्रश्नावर बोलताना आनंदराज आंबेडकांची चीभ घसरली. 'जिथे पाऊसच पडत नाही तिथे अजितदादांना आणायचं का?' अशी बेजाबदार आणि वादग्रस्त टीपण्णी त्यांनी केली. अजित पवार यांच्या निधनानंतर करण्यात आलेल्या या विधानावर राष्ट्रवादी काँग्रेसकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. सर्व स्तरातून टीका झाल्यानंतर आनंदराज आंबेडकर यांनी यावर स्पष्टीकरण दिलंय. काय घडलंय नेमकं? सविस्तर जाणून घेऊया.
जालन्यातील कार्यक्रमात नेमकं काय घडलं?
रिपब्लिकन सेनेचा 28 वा वर्धापन दिन सोहळा जालन्यात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात आनंदराज आंबेडकर विविध विषयांवर बोलत होते. यावेळी राज्यातील दुष्काळ आणि पावसाच्या प्रश्नाचा उल्लेख करताना त्यांनी अजित पवार यांच्याबाबत वादग्रस्त विधान केले. 'जिथे पाऊसच पडत नाही तिथे अजितदादांना आणायचं का?' असे ते म्हणाले. त्यांच्या या विधानाचा व्हिडीओ समोर आल्यानंतर राजकीय चर्चेला सुरुवात झाली आहे.
अजित पवार यांच्या निधनानंतर वक्तव्याची चर्चा
अजित पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्त्वाचे नेते होते. राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी अनेक वर्षे काम केले. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या संदर्भात करण्यात आलेल्या या विधानामुळे राजकीय आणि सामाजिक स्तरावर प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे. विशेषतः सार्वजनिक व्यासपीठावर दिवंगत नेत्याचा उल्लेख करताना वापरलेल्या शब्दांवरून हा वाद निर्माण झालाय
.
वक्तव्यावरून आनंदराज आंबेडकरांची सारवासारव
वक्तव्यावरून टीका सुरू झाल्यानंतर आनंदराज आंबेडकर यांनी पत्रकारांशी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली. अजित पवार यांनी यापूर्वी पाण्याच्या संदर्भात केलेल्या विधानाचा आपण उपरोधिकपणे उल्लेख केला होता, असे त्यांनी सांगितले. आपल्या बोलण्याचा अर्थ वेगळा काढला जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
विधानाचा निषेध
आनंदराज आंबेडकर यांच्या विधानावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निषेध व्यक्त केला जात आहे. दिवंगत नेत्याबाबत अशा प्रकारचे वक्तव्य करणे योग्य नसल्याची भूमिका सुनिल तटकरेंनी मांडली. तसेच 'अजितदादांबद्दल असं विधान करणं चुकीचं', असं म्हणत संजय राऊतांनी आनंदराज आंबेडकरांना सुनावलं महाराष्ट्राच्या राजकारणात अजित पवार यांच्या निधनानंतरही त्यांच्या नावाभोवती राजकीय चर्चा सुरू आहेत. अशा परिस्थितीत आनंदराज आंबेडकर यांच्या वक्तव्यामुळे नव्या राजकीय वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.