मुंबईकरांना आता आणखी एक पर्यटनस्थळ मिळणार आहे. पवई तलावाच्या सौंदर्यात आणखी भर पडणार आहे. सुमारे 30 कोटी रुपये खर्चुन म्हाडाच्या माध्यमातून या प्रकल्पाची उभारणी करण्यात येणार आहे. पवई तलावाच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या अत्याधुनिक 180 मीटर लांबीचा अत्याधुनिक म्युझिकल फाउंटन उभारण्यात आला आहे. आज मंत्री मंगालप्रभात लोढा यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.
पवई तलावाच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या अत्याधुनिक म्युझिकल फाऊंटन आणि लाईट अँड साऊंड शोचे उद्घाटन कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते होणार आहे. विशेष म्हणजे, या शोच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठ्यांच्या पराक्रमाची गौरवगाथा अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने अतिभव्य आणि अद्भुत स्वरूपात सादर केली जाणार आहे.
या प्रकल्पासाठी तब्बल 30 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. तसंच, 180 मीटर लांबीचा म्युझिकल फाउंटन देशातील सर्वांत मोठ्या फाउंटन्सपैकी एक ठरणार आहे. येथे पर्यटकांसाठी दररोज तीन शो आयोजित करण्याचे नियोजन आहे.
पवई तलाव गणेश घाट येथे लाईट, साउंड आणि म्युझिकल फाउंटन शोचे उद्घाटन रविवारी संध्याकाळी 7 वाजता होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या फाउंटनमध्ये अत्याधुनिक डिजीटल तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. 40 मीटर उंचीपर्यंत झेपावणारे वॉटर जेट्स आणि 27 फायर जेट्स हे या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण आहेत.
त्याचबरोबर, रनिंग फाउंटन चेसर्स, थ्रीडी स्विंग नॉझल्स आणि फॅन जेट्स यामुळं पाण्याच्या विविध रचना साकारल्या जातील. संगीताच्या तालावर नृत्य करणारे पाण्याचे कारंजे, आगीच्या ज्वाळा आणि वॉटर स्क्रीनवरील प्रोजेक्शन व लेझर प्रतिमा यांचा संगम हे नागरिकांसाठी आकर्षण ठरू शकतं.
कारंज्यांच्या माध्यमातून दररोज सुमारे 30 लाख लीटर पाण्यात हवा मिसळली जाणार असल्याने (एरेशन प्रक्रिया) तलावातील पाण्यात ऑक्सिजनचे प्रमाण वाढण्यास मदत होईल. तसंच, जलचरांना हानी पोहोचू नये याची दक्षता घेण्यात येणार आहे. तसंच, आवाजाची तीव्रता डेसिबल मर्यादित ठेवण्यात येणार असल्याचेही सांगण्यात येतेय.
तिकीट दर आणि बुकिंग. म्हाडा किंवा प्रशासनाकडून या शोसाठी अद्याप कोणतेही प्रवेश शुल्क (तिकीट दर) जाहीर करण्यात आलेले नाहीत. उद्घाटनानंतर हे शो सर्वसामान्य पर्यटकांसाठी मोफत असतील की नाममात्र शुल्क आकारले जाईल, याबाबत अधिकृत घोषणा होईल. गणेश घाटावर प्रेक्षकांसाठी बसण्यासाठी खुर्च्या, ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांसाठी व्हीलचेअर, सीसीटीव्ही सुरक्षा आणि प्रथमोपचार केंद्राची व्यवस्था करण्यात आली आहे.