मुंबईतील उघडी, तुटलेली आणि गायब झालेली मॅनहोलची झाकणे बदलण्यासाठी मुंबई महापालिकेने मोठा खर्च करण्याची तयारी केली आहे. शहरातील नऊ वॉर्डांमध्ये मॅनहोलची झाकणे बसवणे आणि त्यांच्या सुरक्षेसाठी विशेष यंत्रणा उभारण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. या कामासाठी महापालिकेने तब्बल 1 कोटी 10 लाख 49 हजार रुपयांचा प्रस्ताव तयार केलाय. विशेष म्हणजे, एका मॅनहोलच्या झाकणासाठी सरासरी 25 हजार 769 रुपये खर्च अपेक्षित आहे. झाकणांची चोरी होऊ नये, यासाठी त्यांना चेन लॉकिंग यंत्रणेने सुरक्षित केले जाणार आहे. काय घडलंय नेमकं? सविस्तर जाणून घेऊया.
मुंबईतील ए ते जी उत्तर अशा नऊ वॉर्डांमध्ये हे काम करण्यात येणार आहे. उघडी पडलेली, तुटलेली तसेच गायब झालेली मॅनहोलची झाकणे बदलून त्या ठिकाणी नवीन झाकणे बसवली जाणार आहेत. पावसाळ्यात रस्त्यांवर पाणी साचल्यास उघडी मॅनहोल वाहनचालक आणि पादचाऱ्यांसाठी धोकादायक ठरू शकतात. त्यामुळे या झाकणांची दुरुस्ती आणि बदल करण्याला महत्त्व प्राप्त झाले आहे.
या संपूर्ण कामासाठी महापालिकेने 1 कोटी 10 लाख 49 हजार रुपयांचा खर्च प्रस्तावित केलाय. त्यानुसार एका मॅनहोलच्या झाकणासाठी 25 हजार 769 रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यामुळे झाकणांच्या किमतीबरोबरच त्यांची बसवण्याची पद्धत आणि सुरक्षेसाठी होणारा खर्च याकडेही नागरिकांचे लक्ष लागले आहे.
मुंबईत मॅनहोलची झाकणे चोरीला जाण्याच्या किंवा गायब होण्याच्या घटनांमुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो. झाकणे चोरीला गेल्यानंतर संबंधित मॅनहोल उघडे राहण्याची शक्यता असते. ही समस्या टाळण्यासाठी नव्या झाकणांना चेन लॉकिंग यंत्रणा बसवण्यात येणार आहे. त्यामुळे झाकणे सहजपणे काढून नेणे शक्य होणार नाही, असा महापालिकेचा उद्देश आहे.
2026 च्या पावसाळ्यात उघड्या मॅनहोलमुळे संभाव्य धोका निर्माण होऊ नये, यासाठी महापालिकेने कंत्राटदाराकडून आधीच सुमारे 50 लाख रुपयांची कामे करून घेतल्याची माहिती आहे. त्यामुळे प्रस्तावित कामाचा काही भाग आधीच पूर्ण करण्यात आला आहे. उर्वरित कामांसाठी आता प्रशासकीय आणि आर्थिक मंजुरीची प्रक्रिया पुढे नेली जाणार आहे.
या कामासाठी बेलटेक इंजिनिअर्स या कंत्राटदाराची सर्वात कमी बोली प्राप्त झाली आहे. विशेष म्हणजे, कंपनीने महापालिकेच्या अंदाजित खर्चापेक्षा 12.65 टक्के कमी दराने काम करण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र, उर्वरित कामे पुढे नेण्यासाठी स्थायी समितीची मंजुरी आवश्यक आहे. मंजुरीनंतर पुढील कामकाजाचा मार्ग मोकळा होईल. आता या प्रस्तावाला समितीकडून हिरवा कंदील मिळतो का? आणि प्रत्यक्षात सर्व धोकादायक मॅनहोल सुरक्षित होतात का?, याकडे मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.