देशात सध्या सोन्याच्या किंमती घसरल्याचे तुम्ही पाहत असाल. यामुळे सामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळालाय. दरम्यान याचे श्रेय पंतप्रधान मोदींनी सर्वसामान्यांना दिलंय. सोन्याची खरेदी कमी करण्याच्या आवाहनाला नागरिकांनी प्रतिसाद दिला आणि त्यामुळे सोन्याचे दर घसरले, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. त्याचवेळी पुढील 20 वर्षांत पदवीपेक्षा प्रत्यक्ष कौशल्य आणि कामाचा अनुभव असलेल्या तरुणांना अधिक मागणी असेल, असे भाकीतही त्यांनी केले. लखनऊ येथील कौशल्य दीक्षांत समारंभात बोलताना त्यांनी आटीआय शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले.
पंतप्रधान मोदी यांनी उत्तर प्रदेशातील लखनऊ येथे पाचव्या राष्ट्रीय कौशल्य दीक्षांत समारंभात भाषण केले. यावेळी त्यांनी वर्षभरापूर्वी गरज नसेल तर सोन्याची खरेदी टाळण्याचे आवाहन केल्याची आठवण करून दिली. नागरिकांनी त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला आणि सोन्याचे दर घसरले, असा दावा त्यांनी केला. काही नागरिकांनी आपला सल्ला ऐकल्यामुळे पैसे वाचल्याचे सांगितल्याचेही मोदी म्हणाले.
केवळ पदवी किंवा प्रमाणपत्रांवर नोकरी मिळवण्याचा काळ बदलत असल्याचे मोदी यांनी सांगितले. प्रत्यक्ष काम करण्याची क्षमता, तांत्रिक ज्ञान आणि कौशल्य असलेल्या तरुणांची मागणी वाढेल, असे त्यांचे म्हणणे आहे. पुढील काळात जगभरातील देशांना भारतीय कुशल मनुष्यबळाची गरज भासेल. त्यामुळे पुढील 20 वर्षे विकसित भारताच्या उभारणीसाठी महत्त्वाची ठरतील, असे भाकीत त्यांनी केले.
सौदी अरेबिया, दुबई, अबुधाबी, कतार आणि कुवेत यांसारख्या देशांमध्ये भारतीय कारागीर आणि कामगारांनी महत्त्वाचे योगदान दिले आहे, असे मोदी म्हणाले. विविध देशांकडून दरवर्षी 90 हजार, एक लाख किंवा दीड लाख कुशल कर्मचाऱ्यांची गरज व्यक्त केली जात असल्याचा दावाही त्यांनी केला. ही मागणी केवळ विद्यापीठातून पदवी घेतलेल्या तरुणांसाठी नसून आयटीआयमधून प्रशिक्षण घेतलेल्या उमेदवारांसाठीही आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच एआयमुळे रोजगारावर परिणाम होईल, अशी चर्चा सुरू आहे. मात्र, विशेष कौशल्य असलेल्या व्यक्तींचे महत्त्व कायम राहील, असे मोदी म्हणाले. प्लंबरचे उदाहरण देताना त्यांनी सांगितले की, घरांना पाइपद्वारे गॅस जोडणी देण्याचे उद्दिष्ट पूर्ण करताना प्रशिक्षित प्लंबरची कमतरता जाणवते. सौरऊर्जा, इलेक्ट्रिक वाहने, ड्रोन, सायबर सुरक्षा आणि औद्योगिक रोबोटिक्ससारख्या क्षेत्रांतही कुशल कर्मचाऱ्यांची गरज वाढत असल्याचे त्यांनी नमूद केले.
2014पासून देशात जवळपास पाच हजार नवीन आयटीआय सुरू करण्यात आले असून, विद्यार्थ्यांची संख्या पाच लाखांहून अधिक वाढलीय. सध्या आयटीआयमध्ये ड्रोन तंत्रज्ञान, इलेक्ट्रिक वाहने, सायबर सुरक्षा, सेमीकंडक्टर आणि औद्योगिक रोबोटिक्ससारखे आधुनिक अभ्यासक्रम शिकवले जात आहेत. पीएम-सेतू योजनेतून 60 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली जात असल्याचाही त्यांनी उल्लेख केला. महाराष्ट्रातील तरुणांनीही आयटीआय, कौशल्य विकास अभ्यासक्रम आणि अप्रेंटिसशिपच्या संधींचा विचार करणे महत्त्वाचे ठरू शकते.