ऑनलाइन किराणा मागवताना तुम्हीही खाद्यपदार्थांची गुणवत्ता तपासता का? पुण्यात अमेझॉन आणि बिग बास्केटशी संबंधित दोन डार्क स्टोअर्सच्या तपासणीत मुदत संपलेले पदार्थ, बुरशी आणि अस्वच्छ साठवणुकीचे प्रकार समोर आले आहेत. यानंतर महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने दोन्ही केंद्रांचे अन्नव्यवसाय परवाने निलंबित केले आहेत. ऑनलाइन ऑर्डर केल्यानंतर काही मिनिटांत घरपोच किराणा मिळवून देणाऱ्या क्विक कॉमर्स सेवांचा वापर वाढत आहे. मात्र, जलद डिलिव्हरीसोबतच खाद्यपदार्थांची साठवणूक आणि गुणवत्ता याबाबतही काळजी घेणे आवश्यक आहे. पुण्यातील ताज्या कारवाईने हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय.
महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने 21 नोव्हेंबर रोजी पुण्यातील सिंहगड रोड परिसरातील अमेझॉन आणि बिग बास्केटशी संबंधित डार्क स्टोअर्सची तपासणी केली. या तपासणीत अन्नसुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचे गंभीर उल्लंघन आढळल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यानंतर अन्नसुरक्षा व मानके कायदा, 2006 अंतर्गत दोन्ही केंद्रांचे अन्नव्यवसाय परवाने निलंबित करण्यात आले.
अमेझॉनसाठी काम करणारे गजानन इन्व्हेंटरीजचे डार्क स्टोअर तपासले असता मुदत संपलेले लाडू, पेढे आणि इतर खाद्यपदार्थ आढळले. काही पदार्थांवर बुरशी वाढल्याचेही अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. खाद्यपदार्थांच्या डब्यांमध्ये धूळ साचली होती. तुपाच्या एका डब्याचे झाकण तुटलेले होते, तर तेलाच्या पॅकिंगमधून गळती होत होती. कीटक नियंत्रणाची योग्य व्यवस्था आणि कर्मचाऱ्यांच्या स्वच्छतेसंबंधी नोंदीही अपुऱ्या असल्याचे तपासणीत समोर आले.
बिग बास्केटसाठी काम करणाऱ्या इनोव्हेटिव्ह रिटेल कॉन्सेप्टच्या केंद्रात मुदत संपलेले केक, ब्रेड, मिल्क रस्क आणि चटणी आढळली. काही खाद्यपदार्थ थेट जमिनीवर ठेवण्यात आले होते. स्टोअरमधील फरशी खराब होती, तर कोल्ड रूममध्ये स्वच्छतेचा अभाव दिसून आला. तेलाच्या पाकिटांतून गळती आणि कीटक नियंत्रणातील त्रुटीही आढळल्या.
दोन्ही केंद्रांमध्ये खाद्यपदार्थ आणि बिगरखाद्य वस्तू एकाच ठिकाणी ठेवल्याचे आढळले. अमेझॉनच्या केंद्रात साबण आणि तुपाचे डबे एकत्र साठवले होते. अन्नपदार्थांच्या साठवणुकीसाठी आवश्यक स्वच्छता, कीटक नियंत्रण आणि योग्य व्यवस्था न पाळल्याने ग्राहकांच्या आरोग्याबाबत चिंता व्यक्त करण्यात आली.
हॉटेल्ससह सर्व अन्नव्यवसायांनी परवान्याच्या अटी, स्वच्छता आणि साठवणुकीचे नियम पाळणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.ग्राहकांनी ऑनलाइन किराणा मागवल्यानंतर पॅकेटवरील उत्पादन तारीख, वापरण्याची अंतिम तारीख, पॅकिंगची स्थिती आणि साठवणुकीच्या सूचना तपासाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे. मुदत संपलेला किंवा खराब झालेला पदार्थ मिळाल्यास तो खाऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे. संबंधित अॅपवर तक्रार नोंदवून परतावा मागण्याबरोबरच अन्नसुरक्षा विभागाकडेही तक्रार करता येते, याची ग्राहकांनी नोंद घ्या.