मुंबईच्या हवेत गारठा वाढण्यास सुरुवात झाली आहे. पण त्याचबरोबर वायू प्रदूषणातही वाढ होताना दिसतेय. हवेचा गुणवत्ता निर्देशांक घसरत असताना मुंबई महापालिकेने कठोर पावलं उचलली आहेत. प्रदूषण करणाऱ्या अनेक घटकांवर महापालिकेने बंदी घातली आहे. त्यातीलच एक म्हणजे उघड्यावर शेकोटी पेटवल्यास 2 हजारांचा दंड ठोठावण्यात येईल.
मुंबईत गुलाबी थंडीची चाहुल लागण्यास सुरुवात झाली आहे. हवेत गारवा वाढल्याने अनेकजण उब मिळावी म्हणून शेकोटी पेटवतात. घराबाहेरच्या मोकळ्या अंगणात किंवा मैदानात शेकोटी पेटवून बसलेले असतात. मात्र शेकोटीचा धूर आणि धुरके यामुळं प्रदूषणात आणखी वाढ होऊ शकते. म्हणूनच दंड 500 रुपयांवरुन दोन हजारांपर्यंत वाढवण्यात येणार आहे.
शेकोटी पेटवल्यामुळे हवा प्रदूषण होते आणि त्याचा आरोग्यावर गंभीर परिणाम होतो. हिवाळ्यात थंडीपासून बचाव करण्यासाठी अनेक ठिकाणी लाकूड, पालापाचोळा, कोळसा किंवा प्लास्टिक जाळून शेकोटी पेटवली जाते, ज्यामुळे हवेची गुणवत्ता खालावते.
शेकोटीच्या धुरातून कार्बन मोनोऑक्साइड, नायट्रोजन ऑक्साइड आणि सूक्ष्म धूलिकण हवेत मिसळतात. या धुरामुळे दमा (अस्थमा), खोकला, श्वास घेण्यास त्रास आणि फुफ्फुसांचे विकार बळावतात. याचा सर्वाधिक फटका लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना बसतो. हिवाळ्यात थंड हवेमुळे हा धूर जमिनीलगत साचून राहतो, ज्यामुळे धुरके तयार होते.
मुंबईत आज हवेचा गुणवत्ता निर्देशांक 170 इतका म्हणजे 'आरोग्यास हानिकारक' पातळीवर पोहोचला. 'एक्यूआय'मध्ये वाढ होण्याची शक्यता असल्याने पालिकेने प्रदूषण रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. हिवाळ्यात उघड्यावर कचरा जाळून वाढणारे प्रदूषण रोखण्यासाठी 500 रुपयांचा दंड 2 हजारांपर्यंत वाढवण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.
हिवाळ्यात प्रदूषण रोखण्यासाठी पालिकेने 28 प्रकारची नियमावली बांधकामे, आस्थापने, कंपन्या आणि नागरिकांसाठी जारी केली आहे. ही नियमावली पाळली जाते का यावर नजर ठेवण्यासाठी शहर, पूर्व आणि पश्चिम उपनगरात 74 स्क्वॉड तैनात करण्यात आली आहेत. या स्क्वॉडकडून प्रदूषणकारी प्रकल्पांना नोटीस बजावणे, काम बंद करणे, दंड आकारण्याची कारवाई करण्यात येत आहे.