उपचारासाठी शेती विकली, आता घरावरही संकट, कर्जाच्या हप्त्यांसाठी फायनान्स कंपनीची निर्दयी कारवाई, शेतकऱ्याला घरातून बाहेर काढत...
एकीकडे निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी आणि शेतमजूर आर्थिक संकटात सापडले आहेत, तर दुसरीकडे कर्जाच्या वसुलीसाठी फायनान्स कंपन्यांकडून होणाऱ्या कारवायांमुळे सामान्य कुटुंबांचे जगणेच कठीण झाले आहे.
भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील वाहनी गावात असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कर्जाचे काही हप्ते थकल्याने सितारा फायनान्स कंपनीने थेट एका शेतमजुराच्या घरालाच कुलूप ठोकले. घरातील संसारोपयोगी साहित्य बाहेर काढण्यात आले आणि आई-वडील, पत्नी व तीन मुलांसह संपूर्ण कुटुंब रस्त्यावर आले. अखेर स्थानिक नेते आणि गावकऱ्यांनी हस्तक्षेप करत घराचे कुलूप तोडले आणि कुटुंबाला पुन्हा घरात प्रवेश मिळवून दिला. मात्र, या घटनेने कर्जवसुलीच्या पद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
विष्णू कनपटे यांच्याकडे अडीच एकर शेती होती. मात्र, लहान भावाच्या आजारपणामुळे उपचारासाठी पैशांची गरज निर्माण झाली. भावाच्या उपचारासाठी त्यांनी आधी स्वतःची शेती विकली. तरीही पैशांची कमतरता भासत असल्याने 2023 मध्ये सितारा फायनान्स कंपनीकडून 7 लाख 40 हजार रुपयांचे कर्ज घेतले. शेती गेल्यानंतर कनपटे यांनी शेतमजुरीचा आधार घेतला आणि मिळेल त्या पैशातून कर्जाचे हप्ते नियमित भरण्याचा प्रयत्न केला. मात्र, नियतीने आणखी एक आघात केला.
उपचार सुरू असतानाच त्यांच्या भावाचा मृत्यू झाला. कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आणि आर्थिक परिस्थितीही ढासळली. परिणामी काही हप्ते थकले. हप्ते थकल्यानंतर फायनान्स कंपनीकडून वारंवार वसुलीसाठी तगादा लावण्यात येत असल्याचा कनपटे कुटुंबाचा आरोप आहे. अखेर न्यायालयीन आदेशाचा आधार घेत फायनान्स कंपनीने पोलिस बंदोबस्तात कनपटे यांच्या घरावर कारवाई केली. घराला थेट कुलूप ठोकण्यात आले, तर घरातील साहित्य बाहेर काढण्यात आले.
आई-वडील, पत्नी आणि तीन मुलांसह संपूर्ण कुटुंब अचानक रस्त्यावर आले. रात्रीच्या सुमारास घडलेल्या या प्रकारामुळे गावात एकच खळबळ उडाली. अखेर स्थानिक गावकरी व राजकीय पुढाऱ्यांनी घराचा कुलूप तोडून कनपटे परिवारात घरात प्रवेश दिला.
विशेष म्हणजे, मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून कर्जवसुलीसाठी सक्तीच्या पद्धतींचा अवलंब करू नये, अशा सूचना आणि नियमांची चर्चा असताना प्रत्यक्षात सामान्य कर्जदारांच्या दारापर्यंत वसुलीचा हा प्रश्न पोहोचला आहे. मात्र, या प्रकरणात न्यायालयाचा आदेश, फायनान्स कंपनीची कारवाई आणि कर्जदार कुटुंबाची आर्थिक परिस्थिती या सर्व बाबींची स्वतंत्र चौकशी होणे गरजेचे आहे. कर्जाची परतफेड न होणे हा एक मुद्दा असला, तरी कर्जदार कुटुंबाच्या पुनर्वसनाचा आणि मानवी दृष्टिकोनाचाही विचार होणे तितकेच महत्त्वाचे आहे.
घटनेची दखल घेत आमदार डॉ. परिणय फुके यांनी पीडित कुटुंबाशी फोनद्वारे संवाद साधला. संबंधित फायनान्स कंपनीच्या प्रतिनिधींना बोलावून समस्या सोडविण्याचे आश्वासन. जबरदस्तीने कर्जवसुली किंवा कर्जासंदर्भात अडचण असल्यास नागरिकांनी 7507676223 या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन आमदार फुके यांनी केले आहे.
भावाच्या उपचारासाठी आधी शेती विकली... भावाला वाचवता आले नाही... आणि आता कर्जाच्या वसुलीसाठी घरालाच कुलूप ठोकण्यात आले, ज्या हातांनी शेतात राबून कुटुंबाचा उदरनिर्वाह केला, त्याच हातांवर आज स्वतःच्या घरासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. प्रश्न केवळ विष्णू कनपटे यांच्या कुटुंबाचा नाही, तर कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या प्रत्येक सामान्य कुटुंबाचा आहे. कर्जवसुली महत्त्वाची असेल, तर माणुसकीही महत्त्वाची नाही का? कायदेशीर प्रक्रियेच्या नावाखाली एखाद्या कुटुंबाचा संसारच रस्त्यावर येणार असेल, तर अशा कारवाईचा मानवी चेहरा कोण दाखवणार? आता प्रशासन या प्रकरणाची दखल घेऊन कनपटे कुटुंबाला न्याय देणार का, हा खरा प्रश्न आहे.