रात्री किर्तन झालं, सकाळी संशयास्पद मृत्यू; प्रसिद्ध किर्तनकाराचा मठात आढळला मृतदेह, फोनही गायब, गूढ वाढले
तरुणांना व्यसनातून मुक्त करणाऱ्या देवेंद्र चैतन्य स्वामी महाराजांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला असल्याने एकच खळबळ उडाली आहे.
तरुणांना व्यसनातून मुक्त करणाऱ्या देवेंद्र चैतन्य स्वामी महाराजांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. महाराजांच्या मृत्यनंतर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले असून पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रात्री गावात कीर्तन करून मठात परतलेल्या कीर्तनकार महाराजांचा मृतदेह सकाळी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. भोकरदन तालुक्यातील अवघडराव सावंगी येथे ही धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे, घटनास्थळावरून महाराजांचा मोबाईल फोन गायब असल्यामुळे या प्रकरणाचे गूढ आणखी वाढले असून, यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
41 वर्षीय देवेंद्र चैतन्य स्वामी तथा दौलत रामनाथ सातपुते महाराज असं मृतदेह आढळून आलेल्या महाराजांचं नाव आहे. ते मूळ नाशिक जिल्ह्यातील मुसळगाव येथील रहिवासी आहेत. मागील 8 ते 10 वर्षांपासून भोकरदन तालुक्यातील अवघडराव सावंगी येथील पाताळेश्वर मंदिर परिसरातील मठात वास्तव्यास होते.
गेल्या 10 वर्षात त्यांनी अनेक तरुणांना व्यसनातून मुक्त केलं. दरम्यान या प्रकरणी पारध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस या प्रकरणी अधिक तपास करतायत. दरम्यान हजारो भक्तांच्या उपस्थितीत देवेंद्र चैतन्य महाराज यांच्या पार्थिवावर सावंगी अवघडराव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.
दरम्यान, देवेंद्र चैतन्य यांचा मोबाईल गायब असणे, खोलीचा दरवाजा बंद नसणे आणि सीसीटीव्ही संदर्भातील तांत्रिक बाबींमुळं हा मृत्यू नेमका घातपात आहे की आत्महत्या याबाबत मोठा संशय निर्माण झाला आहे. रविवारी सकाळी नेहमी महाराज विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आरतीसाठी उपस्थित राहतात. मात्र त्या दिवशी ते गैरहजर असल्याने काहीजण त्यांच्या निवासस्थानाकडे आले.
गावकऱ्यांनी बघितले तर खोलीचा दरवाजा उघडाच होता. तर आतमध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह होता. तसंच, फोनही घटनास्थळावरुन गायब आहे. त्यामुळं महाराजांची हत्या करुन ती आत्महत्या असल्याचे भासवण्याचा प्रयत्न करण्यात आलाय का? असा संशय सध्या उपस्थित करण्यात येत आहे. त्याचबरोबर, सध्या पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून या घटनेचा सर्व बाजुंनी तपास केला जात आहे. ही हत्या असेल तर यात जवळच्याच कोणत्या तरी व्यक्तीचा हात असावा, असा संशय पोलिसांना आहे. पोलीस घटनेचा सविस्तर तपास करत आहेत.