लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सत्तेचा फैसला लागण्यास सुरुवात झाली आहे. तब्बल 99.40 टक्के मतदान झाल्याने या निवडणुकीच्या निकालाबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. 999 पैकी 993 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. एका बाजूला परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर, तर दुसऱ्या बाजूला सहकार पॅनलमधून काँग्रेसचे आमदार तथा दिवंगत विलासराव देशमुख यांचे पुत्र अमित देशमुख आणि धीरज देशमुख अशी ही थेट लढत होत आहे. 15 पैकी 12 जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. यामध्ये देशमुख यांच्या सहकार पॅनलने 8 जागांवर विजय मिळवत आघाडी घेतली आहे, तर परिवर्तन पॅनलला 4 जागांवर विजय मिळाला. धीरज देशमुख यांनीही दणदणीत विजय मिळवला. उदगीरमध्ये प्रीती भोसले यांनी विजय मिळवलाय, तर लातूर मतदारसंघात हेमंत जाधव यांनी बाजी मारली.
धीरज देशमुखांचं काय झालं?
लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत सव्वा दहाच्या सुमारास धीरज देशमुख यांनी विजय मिळवल्याचं मतमोजणीनंतर निश्चित झालं. धीरज देशमुख यांना 15 मतं पडली. त्यांच्याविरोधात असलेले भारत चामले यांना अवघी 2 मतं पडली.
काकी विरुद्ध पुतण्या, जिंकलं कोण?
लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निकालाचा पहिला कल हाती आला तो सकाळी दहाच्या सुमारास. सुरुवातीलाच निलंगा मतदारसंघात मोठा राजकीय उलटफेर झाला. परिवर्तन पॅनलचे अरविंद पाटील निलंगेकर यांनी विजय मिळवत सहकार पॅनलच्या संगीता पाटील निलंगेकर यांचा पराभव केला. पुतण्या विरुद्ध चुलती अशा रंगलेल्या लढतीत पुतण्याने बाजी मारली. दुसरीकडे उदगीरमध्ये सहकार पॅनलच्या प्रीती भोसले यांनी विजय मिळवला. तर लातूर मतदारसंघात हेमंत जाधव यांच्या विजयाची नोंद झाली. पहिल्या फेरीतील या निकालामुळे जिल्हा बँकेच्या सत्तासंघर्षाला आता वेगळं वळण मिळाल्याचं दिसून आलं.
भाजपा आमदाराचा मुलगा जिंकला
परिवर्तन पॅनलचे ऋषिकेश कराड 19 मताने विजय झालेत. ऋषिकेश कराड हे भाजपाचे आमदार रमेश कराड यांची चिरंजीव आहेत.
अपहरण नाट्य
या निवडणुकीत आरोप-प्रत्यारोपांनी राजकीय वातावरण चांगलंच तापलं. कर्जवाटपावरून देशमुखांना लक्ष्य करण्यात आलं, तर देशमुखांकडूनही विरोधकांच्या आरोपांना प्रत्युत्तर देण्यात आलं. त्यातच अपहरण प्रकरणाने निवडणुकीला मोठं नाट्यमय वळण दिलं. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनाही पळवून नेण्याचा डाव होता, असा खळबळजनक दावा अमित देशमुख यांनी केला. या सगळ्या घडामोडींमुळे जिल्हा बँकेची निवडणूक राज्यभर चर्चेचा विषय ठरली.
दोन्ही बाजूंनी काय सांगण्यात आलं?
दोन्ही बाजूंनी विजयाचा दावा करण्यात आला होता. देशमुखांचं बँकेवरील वर्चस्व कायम राहणार की निलंगेकर सत्तांतर घडवणार? याचा फैसला आज मतमोजणीतून होणार याबद्दल प्रचंड उत्सुकता होती. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष आजच्या निकालाकडे लागलं होतं. काँग्रेस महाविकास आघाडीच्या सहकार पॅनेलच्या बाजूने नेहमीप्रमाणे मतदारांचा कौल राहील, असा विश्वास धीरज देशमुख यांनी काल झालेल्या मतदानानंतर व्यक्त केला होता. तर या निवडणुकीत विजयाचा आत्ताच दावा करणे योग्य ठरणार नाही... मतदार जो कौल देतील, तो आम्हाला मान्य असेल, अशी प्रतिक्रिया भाजप नेते तथा माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिली होती.