राज्यात कडाक्याची थंडी, उत्तर महाराष्ट्रात थंडीची लाट?, 'या' जिल्ह्यांत पारा थेट 8 अंशावर
राज्यात गुलाबी थंडीची चाहूल लागण्यास सुरुवात झाली असून उत्तर महाराष्ट्रात कडाक्याची थंडी पडली आहे.
महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढला आहे. मध्य प्रदेशातून महाराष्ट्राच्या दिशेने वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळं संपूर्ण राज्यात आता थंडी जाणवू लागली आहे. शुक्रवारी राज्यातील अनेक भागांमध्ये किमान तापमानाचा पारा घसरला आहे. राज्यात सर्वात कमी तापमान जळगाव येथे नोंदवण्यात आले आहे. मुंबईचे तापमान शुक्रवारी 21 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले आहे.
राज्यातील किमान तापमानातील घट कायम राहण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले अकवान चक्रीवादळ आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यावर धडकले आहेत. त्या नंतर या प्रणालीची तीव्रता कमी होऊ लागली आहे. चक्रीवादळाच्या प्रभावामुळं उत्तरेकडील थंड हवा येऊ लागल्याने उत्तर महाराष्ट्र गारठला आहे. राज्याच्या किमान तापमानात घट झाली आहे. दिवसाच्या तापमानातही घट दिसून येतेय.
अकवान चक्रीवादळाच्या अवशेषामुळं विदर्भ आणि मराठवाड्यात ढगाळ हवामानाची शक्यता असून विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यात किमान तापमानातील घट कायम राहून गारठा कायम राहण्याची शक्यता आहे.
राज्याच्या कमाल तापमानात घट होऊ लागली आहे. किमान तापमानाचा पारा घसरल्याने उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात थंडीची लाट आली आहे. जळगाव येथे 8 अंश सेल्सिअस, नाशिक-यवतमाळ येथे प्रत्येकी 10 अंश, परभणी येथील 10.1 अंश तसंच पुण्यात 11.3 आणि जेऊर येथे 12 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.
अकवान चक्रीवादळ पुरीपासून 160 किमी अंतरावर धडकले तेव्हा वाऱ्याचा वेग ताशी 70 ते 90 किमीपर्यंत पोहोचला होता. समुद्रात महाकाय लाटा उसळल्या होत्या. वादळ जमिनीवर धडकल्यानंतर त्याची तीव्रता कमी होऊन ते कमी दाबाच्या क्षेत्रात रुपांतरित झाले असून याचा परिणाम आंध्र, ओडिशा, बंगाल, झारखंड, मध्य प्रदेशच्या ठराविक भागात मुसळधार पाऊस पडत आहे.
अकवानची तीव्रता कमी झाली असली तरी शनिवारी आंध्र, ओडिशा, बिहार, झारखंड, मध्य प्रदेश, पं.बंगालमधील काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे.