‘दिवाळी येत-जात राहील, पण…’; अजित पवारांच्या आठवणीत राजेंद्र पवारांची हळवी पोस्ट, बालपणीच्या आठवणींना उजाळा
अजित पवार यांच्या निधनानंतरच्या पहिल्या दिवाळीत राजेंद्र पवार भावुक झाले. बालपणीच्या दिवाळीतील फटाके, कुटुंबाच्या आठवणी आणि नात्यांच्या जिव्हाळ्याविषयी त्यांनी पोस्ट लिहिली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतरची ही पहिलीच दिवाळी. त्यामुळे यंदाचा सण पवार कुटुंबासाठी भावनिक ठरला आहे. अजित पवार यांचे बंधू राजेंद्र पवार यांनी सोशल मीडियावर एक हळवी पोस्ट लिहून बालपणीच्या दिवाळीच्या आठवणींना उजाळा दिला आहे. फटाके, घरातील गप्पा, लहानपणीचे खेळ आणि कुटुंबातील माणसांचा धाक-प्रेम अशा अनेक आठवणी त्यांनी या पोस्टमधून सांगितल्या आहेत. याबद्दल जाणून घेऊया.
राजेंद्र पवारांकडून आठवणींना उजाळा
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतरची ही पहिलीच दिवाळी. त्यामुळे यंदाचा सण पवार कुटुंबासाठी भावनिक ठरला आहे. अजित पवार यांचे बंधू राजेंद्र पवार यांनी सोशल मीडियावर एक हळवी पोस्ट लिहून बालपणीच्या दिवाळीच्या आठवणींना उजाळा दिला आहे. फटाके, घरातील गप्पा, लहानपणीचे खेळ आणि कुटुंबातील माणसांचा धाक-प्रेम अशा अनेक आठवणी त्यांनी या पोस्टमधून सांगितल्या आहेत. याबद्दल जाणून घेऊया.
बालपणीच्या दिवाळीतील फटाक्यांच्या आठवणी
राजेंद्र पवार यांनी पोस्टमध्ये बालपणीच्या दिवाळीचे चित्र उभे केले आहे. अनंतराव पवार सर्व मुलांसाठी फटाके आणायचे आणि प्रत्येकाला समान वाटून द्यायचे. दिवसभर पुरतील म्हणून मुलं हे फटाके घरातील अंधाऱ्या कोठडीत लपवून ठेवत असत. त्या काळात नवीन असलेले पॅराशूट फटाके उडाल्यानंतर ते पकडण्यासाठी मुलांची धावपळ व्हायची. अर्धवट उडालेल्या फटाक्यांमधील दारू गोळा करून दुसऱ्या दिवशी पुन्हा फटाके पेटवण्याचा खटाटोपही असायचा. या आठवणी आज पुन्हा मनात दाटून आल्याचे त्यांनी म्हटले आहे.
घरातील माणसांचा धाक आणि प्रेम
आजीच्या धाकामुळे घरातील सर्वजण शिस्तीत राहत असत. अजित पवार आज असते, तर घरात त्यांचाही वेगळा धाक आणि प्रेम अनुभवायला मिळाले असते, अशी भावना राजेंद्र पवार यांनी व्यक्त केली. दिवाळीच्या काळात नातेवाईक घरी आले की घर गप्पांनी भरून जायचे. विशेषतः एन. डी. पाटील यांच्या भेटीमुळे घरातील वातावरण उत्साही व्हायचे, अशी आठवणही त्यांनी सांगितली.
मतभेद बाजूला ठेवून नाती जपण्याची शिकवण
एन. डी. पाटील यांची राजकीय भूमिका आणि वैयक्तिक तत्त्वे वेगळी असली, तरी ते प्रत्येक वयोगटातील व्यक्तीशी सहज संवाद साधत. पक्ष आणि वैचारिक मतभेद एका बाजूला ठेवून नाती कशी जपायची, याची शिकवण त्यांच्याकडून मिळाल्याचे राजेंद्र पवार यांनी नमूद केले. लहानपणीच्या साध्या प्रसंगांतूनही आयुष्यभर उपयोगी पडणारे धडे मिळाले, असे त्यांच्या आठवणींतून दिसते.
साध्या जगण्यातून मिळालेली सामाजिक जाण
गावातील पाणी भरण्याची लगबग, पहाटे कावडीचे ऐकू येणारे आवाज, राखेने दात घासण्यासारख्या जुन्या सवयी आणि घरट्यातून पडलेल्या पक्ष्यांच्या पिलांची काळजी घेणे, अशा अनेक प्रसंगांचा त्यांनी उल्लेख केला. आपल्याकडे असलेल्या साधनसंपत्तीमध्ये समाजाचाही वाटा असतो, ही जाणीव मागील पिढीने दिल्याचे ते सांगतात.
पुढच्या पिढीला त्या जिव्हाळ्याच्या दिवाळीची ओळख कशी होणार?
राजेंद्र पवार बारामतीत शेती करत स्थायिक झाले, तर अजित पवार आणि इतर भावंडे मुंबईला गेली. पुढची पिढी वेगवेगळ्या ठिकाणी वाढली आणि शिकली. त्यामुळे लहानपणीच्या एकत्रित दिवाळीतील आपुलकी आणि नात्यांची घट्ट वीण त्यांना कशी समजणार, असा हळवा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. अजित पवार यांच्या कपड्यांच्या वेगळ्या आवडीपासून ते एकत्र घालवलेल्या क्षणांपर्यंत अनेक आठवणी त्यांनी शब्दांत मांडल्या. ‘दिवाळी येत-जात राहणार; पण लहानपणी टोचलेल्या काट्यांच्या आठवणींची कुरूपं आता बोचून एकटेपणा देत राहणार,’ या भावनेतून त्यांनी अजित पवार यांच्याविना सण साजरा करण्याची वेदना व्यक्त केली आहे.