बलात्काराच्या खोट्या प्रकरणात अडकवण्याची धमकी, सुनेच्या छळाला वैतागून सासऱ्यांनी उचललं धक्कादायक पाऊल
सुनेच्या त्रासाला कंटाळून एका सासऱ्याने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार सांगलीच्या वाळवा तालुक्यातील मसुचीवाडी येथे घडला आहे.
सुनेच्या त्रासाला कंटाळून एका सासऱ्याने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार सांगलीच्या वाळवा तालुक्यातील मसुचीवाडी येथे घडला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी सुनेसह तिघांवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विश्वास नाथा फाटक यांनी सून आणि तिच्या नातेवाईकांच्या त्रासाला कंटाळून विषारी द्रव्य पिऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणी विश्वास यांचा मुलगा ऋषिकेश फाटक यांनी शनिवारी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. या प्रकरणी सून संजना अविनाश पवार, संजना हिचे अविनाश ज्ञानदेव पवार, मावशी स्नेहल प्रवीण गलांडे अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऋषिकेश हे पेशाने शिक्षक आहेत. त्यांच्या पहिल्या पत्नीचे 2024मध्ये कर्करोगाने निधन झाले होते. त्यानंतर त्यांनी 25 जानेवारी 2026 रोजी संजना हिच्याशी दुसरे लग्न केले होते. लग्नानंतर काहीच दिवसांत संजनाचे वडील ऋषिकेशच्या घरी गेले. त्यानंतर मुलाला धमकी देऊन 15 लाखांची मागणी केली. मुलीला नांदवायचे असेल तर 15 लाख द्या, असं म्हणत शिवीगाळ करत मुलीला घेऊन गेले.
संजना हिचा पहिला विवाह झालेला आहे. तिचा घटस्फोट झाला नाही, हेदेखील कालांतराने ऋषिकेशच्या लक्षात आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर ऋषिकेश यांनी संबंध तोडण्याचे ठरवले. मात्र संशयित आरोपी संजना, वडील अविनाश आणि मावशी हे सातत्याने फाटक कुटुंबांना त्रास देत होते.
ऋषिकेशकडे लग्नाचा खर्च, पोटगी आणि पुढील पालनपोषणासाठी 20 लाखांचा खर्च देण्याची त्यांनी मागणी केली. अन्यथा विश्वास यांच्यावर कौटुंबिक हिंसाचार व बलात्काराचा गु्न्हा दाखल करु, अशी धमकी दिली जात होती.
सातत्याने धमक्या मिळत असताना तणावात असलेल्या विश्वास फाटक वय वर्ष 63 यांनी विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याचा प्रकार घडला आहे. वडिलांच्या आत्महत्या प्रकरणी ऋषिकेश फाटक याने पत्नी संजना पवार तिचे वडीलांसह तिघा नातेवाईकांविरोधात गुन्हा दाखल केला असून याबाबत अधिक तपास ईश्वरपूर पोलीस करत आहेत. मात्र सुनेच्या त्रासामुळे सासरयाने केलेल्या आत्महत्येच्या घटनेने खळबळ उडाली आहे.