मुंबईतील दिवाळी सेलिब्रिटी कॅम्पेनवरून नवा राजकीय वाद निर्माण झाला आहे. मुंबई महानगरपालिकेने प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्यासाठी जनजागृती मोहीम हाती घेतली होती. या मोहिमेअंतर्गत अभिनेत्री दिया मिर्झासह अनेक कलाकारांनी नागरिकांना पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचे आवाहन केले. दिया मिर्झाने आपल्या व्हिडीओमध्ये फटाके टाळण्याचे आणि ध्वनी व वायुप्रदूषण कमी करण्याचे आवाहन केले होते. मुंबईतील वाढते प्रदूषण आणि न्यायालयाच्या निर्देशांच्या पार्श्वभूमीवर ही मोहीम राबवण्यात आली होती. काय घडलंय नेमकं? सविस्तर जाणून घेऊया.
दिया मिर्झाचा व्हिडीओ बीएमसीच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर प्रसिद्ध झाल्यानंतर भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी त्यावर आक्षेप घेतला. ‘दिवाळी कशी साजरी करायची, याचे धडे दिया मिर्झाकडून घेण्याची गरज नाही. आमच्या परंपरा आणि संस्कृती खोलवर रुजलेल्या आहेत,’ अशा आशयाची पोस्ट त्यांनी X वर केली. त्यांनी या पोस्टमध्ये BMC च्या अधिकृत अकाउंटलाही टॅग केले होते.
साटम यांच्या पोस्टनंतर काही तासांतच बीएमसीने दिया मिर्झाचा व्हिडीओ आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून हटवला. विशेष म्हणजे, याच कॅम्पेनमध्ये सहभागी झालेल्या अभिनेत्री माधुरी दीक्षित, निशिगंधा वाड आणि क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे यांच्यासह इतर सेलिब्रिटींचे व्हिडीओ मात्र दिसत आहेत. दिया मिर्झाचाच व्हिडीओ का हटवण्यात आला, याबाबत महापालिका प्रशासनाकडे अधिकृत स्पष्टीकरण मागणार असल्याचे महापौर म्हणाल्या.
या वादात आता मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनीही भूमिका मांडली आहे. दिलेल्या माहितीनुसार, पत्रकार परिषदेत त्यांनी दिया मिर्झाला ‘100 टक्के ब्लॅकलिस्ट’ केल्याचे सांगितले. देश आणि हिंदू धर्माबाबत आक्षेपार्ह बोलणाऱ्यांना विरोध करणार असल्याचेही त्यांनी म्हटले. दिया मिर्झाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य असले, तरी BMC च्या व्यासपीठावर तिला सहभागी करून घ्यायचे की नाही, हा निर्णय महापौर म्हणून आपला अधिकार असल्याचे तावडे यांनी सांगितले. या व्हिडीओबाबत आयुक्तांसोबत कार्यक्रम झाल्याचा उल्लेख करत त्यांनी प्रशासनाकडून स्पष्टीकरण मागवणार असल्याचेही स्पष्ट केले.
दिवाळी कशी साजरी करायची हे दिया मिर्झाने आम्हाला शिकवू नये. तिने तिच्या वैयक्तिक प्लॅटफॉर्मवर काय वाटेल ते टाकावे पण बीएमसीच्या पोर्टलवर मी हे खपवून घेणार नाही, असे महापौर म्हणाल्या. यावरुन किशोरी पेडणेकर यांनी महापौरांवर टीका केली.