पाण्याच्या थेंबासाठी संघर्ष, पाण्याच्या टँकरवर अवलंबून असलेलं गाव आणि अखेर पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था होत नसल्याने थेट गावच विक्रीला काढण्याची वेळ ग्रामस्थांवर आली होती. मात्र, आता याच तुळशी गावाच्या मदतीला लोकमंगल समूह धावून आला आहे. कोणतीही आश्वासनं न देता थेट कामाला सुरुवात करत गावात जलसंधारणाचा नवा प्रयोग राबवला जात आहे. तब्बल 19 बंधाऱ्यांच्या माध्यमातून आकार घेतोय पाणी साठवणुकीचा ‘तुळशी पॅटर्न’
सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील तुळशी गाव. पावसाच्या पाण्याशिवाय गावाला दुसरा कोणताही शाश्वत जलस्रोत नाही. पाऊस पडला तर पाणी, अन्यथा टँकरच्या पाण्यावरच ग्रामस्थांना दिवस काढावे लागतात. पाणीटंचाईच्या या दुष्टचक्रातून बाहेर पडण्यासाठी ग्रामस्थांनी अखेर आपलं गावच विक्रीला काढलं होतं. या घटनेने संपूर्ण राज्याचं लक्ष तुळशी गावाकडे वेधलं गेलं.
मात्र, गाव विक्रीला काढण्याच्या या आक्रोशानंतर आता तुळशी गावाच्या पाणीप्रश्नावर प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे. लोकमंगल समूहाचे प्रमुख तथा माजी मंत्री आमदार सुभाष देशमुख यांनी केवळ आश्वासनांवर न थांबता जलसंधारणाच्या कामांचा पुढाकार घेतला आहे.
लोकमंगल समूह आणि ग्रामस्थांच्या लोकसहभागातून तुळशी गावाच्या परिसरात तब्बल 19 बंधारे उभारले जात आहेत. या बंधाऱ्यांसाठी सध्या सुमारे 35 फूट खोलीकरण करण्यात आलं आहे. एका बंधाऱ्यात अंदाजे 25 कोटी लिटर पाणी साठवण्याचं उद्दिष्ट आहे. या जलसाठ्यामुळे परिसरातील विहिरी आणि विंधन विहिरींच्या पाणीपातळीत वाढ होण्यास मदत होण्याची अपेक्षा आहे.
दरम्यान, पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सीना-माढा उपसा सिंचन योजनेतून तुळशी गावाला पाणी उपलब्ध करून देण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याचं आश्वासन दिलं आहे. हा पाणीस्रोत उपलब्ध झाल्यानंतर 19 बंधारे आणि गावातील दोन पाणी साठवण तलावांच्या माध्यमातून पाण्याचं नियोजन करण्याचा प्रयत्न आहे.
विशेष म्हणजे, केवळ सरकारी मदतीची वाट न पाहता लोकसहभाग आणि सामाजिक संस्थांच्या सहकार्याने गावाच्या पाणीप्रश्नावर कायमस्वरूपी उपाय शोधण्याचा हा प्रयत्न आहे. त्यामुळे तुळशी गावाने सुरू केलेल्या या जलसंधारणाच्या उपक्रमाला इतर सामाजिक संस्थांनीही मदतीचा हात द्यावा, असं आवाहन ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे
काही दिवसांपूर्वी ज्या गावाने पाण्यासाठी स्वतःलाच विक्रीला काढलं होतं, त्याच गावात आता पाण्याच्या स्वयंपूर्णतेसाठी 19 बंधाऱ्यांची उभारणी सुरू झाली आहे. गावाच्या एकजुटीला लोकसहभागाची जोड आणि सामाजिक संस्थांच्या सहकार्याने उभा राहत असलेला हा जलसंधारणाचा प्रयोग भविष्यात इतर दुष्काळी गावांसाठीही दिशादर्शक ठरू शकतो
कारण गाव विक्रीला काढण्याची वेळ आणणारी पाणीटंचाई आता गावाच्या एकजुटीने दूर करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. म्हणूनच म्हणतात.