61 वर्षांनंतर पहिल्यांदाच घडलंय, महाराष्ट्राला 'याड' लावणाऱ्या 'त्या' विहीरीनं तळ गाठला
'सैराट' चित्रपटातील आर्ची आणि परश्याच्या प्रेमकथेचा साक्षीदार असलेली ती ऐतिहासिक विहीर तुम्हाला आठवतेय का?
ज्या विहिरीच्या पायऱ्यांवर आर्ची-परश्याची नजरानजर झाली, ज्या विहिरीत उड्या मारून त्यांनी पोहण्याचा आनंद घेतला, तीच विहीर आता पाण्याअभावी कोरडी पडली आहे.1965 च्या भीषण दुष्काळात बांधण्यात आलेल्या या विहिरीने तब्बल 61 वर्षांनंतर प्रथमच तळ गाठलाय. एकेकाळी शेतकऱ्यांची आणि जनावरांची तहान भागवणारी ही विहीर आता दुष्काळाच्या चक्रात सापडली
करमाळा तालुक्यातील देवळाली येथील ही ऐतिहासिक विहीर यंदाच्या दुष्काळात पूर्णपणे कोरडी पडली आहे. विशेष म्हणजे, 1965 च्या भीषण दुष्काळात या विहिरीची उभारणी करण्यात आली होती. तेव्हापासून आजपर्यंत परिसरातील शेतकऱ्यांसाठी ही विहीर पाण्याचा मोठा आधार होती.
एकेकाळी पाण्याने भरलेली विहीर पायऱ्यांवरून डोकावणारं पाणी आणि विहिरीत पोहण्याचा आनंद हे चित्र आता इतिहासजमा झालंय. विहिरीने तळ गाठल्याने परिसरातील शेतकऱ्यांसमोर पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पर्यायी जलस्रोतांचा शोध घेण्याची वेळ आता शेतकऱ्यांवर आली आहे.
निर्माता-दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या 'सैराट' चित्रपटामुळे या विहिरीला राज्यभर प्रसिद्धी मिळाली. आर्ची आणि परश्याची नजरानजर असो किंवा विहिरीच्या कठड्यावरून मारलेल्या उड्या. चित्रपटातील अनेक गाजलेल्या दृश्यांचं चित्रीकरण याच विहिरीत झालं होतं. चित्रपटाच्या लोकप्रियतेनंतर ही विहीर सिनेप्रेमींसाठी आकर्षणाचं केंद्र बनली
विशेष म्हणजे, 1965 च्या दुष्काळात माणसांची तहान भागवण्यासाठी बांधलेली ही विहीर आज पुन्हा दुष्काळाच्या विळख्यात सापडली आहे. पडद्यावर प्रेमकथेची साक्षीदार ठरलेली ही विहीर आज मात्र पाण्याअभावी ओस पडली आहे. विहिरीच्या तळाला पडलेल्या भेगा केवळ पाण्याची कमतरता दाखवत नाहीत, तर ग्रामीण भागातील पाणीटंचाईचं वास्तवही अधोरेखित करत आहेत.
सैराटमधील प्रेमकथेने महाराष्ट्राला वेड लावलं, पण त्याच विहिरीचा आजचा कोरडेपणा ग्रामीण भागातील दुष्काळाची गंभीरता सांगतोय. 61 वर्षांचा इतिहास जपणारी ही विहीर आता पावसाच्या प्रतीक्षेत आहे.