'तुमचा अहंकार मोडून काढू'; राधाकृष्ण विखेंना भाजपाच्याच नेत्याने दिला इशारा, 'आमच्या हक्काचं...'
जायकवाडीच्या पाण्यावरून भाजपातच संघर्ष चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तुमचा अहंकार मोडून काढू असा इशारा भाजपा नेते सतिष घाटगे यांनी राधाकृष्ण विखे पाटलांना दिला आहे.
जायकवाडीच्या पाण्यावरून भाजपातच संघर्ष चिघळण्याची शक्यता आहे. हक्काचं पाणी असूनही राधाकृष्ण विखेंचा मराठवाडयाला पाणी मिळू देणार नसल्याचा अहंकार आडवा येत असल्याची टीका जालन्यातील भाजप नेते आणि घनसावंगी विधानसभा प्रमुख सतिश घाटगे यांनी केली आहे. यावेळी त्यांनी तुमचा इगो मोडून पाणी मिळवून दाखवू असा इशाराच जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांना दिला आहे. आमच्या हक्काचं पाणी घेऊनच दाखवू असंही ते म्हणाले आहेत.
जायकवाडीत पाणी असूनही पाणी का देत नाही, नाशिकच्या धरणातून शेतकऱ्यांना कशी आवर्तने देता? असा सवालच राधाकृष्ण विखेंनी घाटगेंना विचारला आहे. 3 रब्बीसह 2 उन्हाळी आवर्तने जायकवाडीतून सोडा अशी मागणी त्यांनी केली आहे.
आज छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय आयुक्त कार्यालयात जायकवाडी कालवा समितीची बैठक आज पार पडणार आहे. या बैठकीत जायकवाडीच्या डाव्या कालव्यातून 3 रब्बीसह 2 उन्हाळी आवर्तने सोडण्याचा निर्णय घ्या, अन्यथा मराठवाडयासाठी पाणी सोडू देणार नाही हा तुमचा अहंकार मोडून टाकू असा इशारा भाजपचे नेते आणि घनसावंगी विधानसभा प्रमुख सतिश घाटगेंनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांना दिला आहे.
जायकवाडीतून आम्ही आमच्या हक्काचं पाणी मागत असून धरणात पाणी असूनही आम्हाला हक्काचं पाणी का देत नाही? नगर, नाशिक जिल्ह्यातील धरणातून शेतकऱ्यांना आवर्तनं कशी देता? असा सवाल सतिष घाटगेंनी राधाकृष्ण विखेंना केला आहे. शिवाय जायकवाडीतून आवर्तने न दिल्यास मराठवाडा पेटून उठेल याला विखे जबाबदार असतील असा इशारादेखील घाटगेंनी दिला आहे.
आता संयम संपला आहे; मराठवाड्यातील शेतकऱ्यांनो,सज्ज व्हा!
सतिश घाटगे यांनी 30 ऑक्टोबरला फेसबुक पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी लिहिलं आहे की, गेल्या दोन आठवड्यांपासून मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या हक्काच्या पाण्यासाठी मीडियाच्या माध्यमातून आपली स्पष्ट आणि ठाम भूमिका सरकारपर्यंत पोहोचवण्याचा सातत्याने प्रयत्न केला. दुष्काळात होरपळत असलेल्या बळीराजाचा आक्रोश आणि भीषण परिस्थितीची दखल घेऊन सरकार तातडीने निर्णय घेईल, अशी आपल्या सर्वांनाच अपेक्षा होती. मात्र, हक्क मागून मिळत नसेल, तर तो संघर्षाने हिसकावून घेतल्याशिवाय दुसरा पर्याय उरत नाही. हक्काच्या पाण्याची वाट पाहण्याची वेळ आता संपली असून लढा अटळ आहे. आता रस्त्यावर उतरल्याशिवाय हे सरकार आणि प्रशासन जागे होणार नाही".
जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांच्या भागातील लोकांसाठी युद्धपातळीवर बैठका घेऊन सर्व धरणांतील पाण्याचे निर्णय घेत त्यांच्या शेतकऱ्यांसाठी धरणे खुली केली. मात्र, दुष्काळाच्या सर्वाधिक झळा सोसत असलेल्या मराठवाड्याच्या शेतकऱ्यांसाठी बैठक घ्यायला त्यांना वेळ मिळाला नाही. जी तत्परता त्यांनी स्वतःच्या जिल्ह्यासाठी दाखवली, तिचा लवलेशही मराठवाड्याबाबत दिसला नाही. विखे पाटील जाणीवपूर्वक मराठवाड्यावर अन्याय करत आहेत. त्यांना मराठवाड्याच्या अन्नदात्यांशी काहीही देणेघेणे नाही, हे आता स्पष्ट झाले आहे अशी टीका त्यांनी केली आहे.
हा मराठवाडाद्रोह आणि अन्यायी डाव हाणून पाडण्यासाठी येत्या ३ नोव्हेंबर २०२६ रोजी मराठवाडाव्यापी जनआंदोलनाची घोषणा आपण करणार असून याची दिशा सर्व शेतकरी बांधवांना सोबत घेऊन ठरणार आहे. मराठवाड्यातील शेतकऱ्यांना रब्बीसाठी ३ आणि उन्हाळी हंगामासाठी २ आवर्तने मिळालीच पाहिजेत! ही आपली ठाम भूमिका असणार असून त्यासाठी शेवटपर्यंत संघर्ष करण्याची तयारी आपल्याला ठेवावी लागणार आहे असंही ते म्हणाले आहेत.
आपण दिलेल्या अल्टीमेटमनुसार २ नोव्हेंबरपर्यंत सरकारने मराठवाड्याच्या हिताचा ठोस निर्णय न घेतल्यास, मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या संतापाचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही. आपल्या हक्काचे पाणी मिळवण्यासाठी आणि या जनआंदोलनाची वज्रमूठ बांधण्यासाठी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, नेते, सामाजिक कार्यकर्ते आणि जनतेने राजकारण बाजूला ठेवून एकत्र यावे, असे आवाहनही त्यांनी केलं आहे.