जळगाव जिल्ह्यातील भोकर गावात भरदिवसा स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेवर सशस्त्र दरोडा पडतो. बँकेत प्रवेश करणारे दरोडेखोर थेट व्यवस्थापक आणि कॅशियरला लक्ष्य करतात. बंदुकीचा धाक दाखवतात. विरोध होताच हवेत गोळीबार करतात आणि तब्बल 16 लॉकरमधील कोट्यवधी रुपयांचे सोने आणि लाखोंची रोकड घेऊन पसार होतात!
या दरोडेखोरांना पोलिसांसोबतच ग्रामस्थही पुरून उरतात. काही तासांतच चारही संशयित पोलिसांच्या ताब्यात येतात. पण या संपूर्ण दरोड्याचा सर्वात धक्कादायक खुलासा म्हणजे या टोळीचा कथित सूत्रधार दुसरा तिसरा कोणी नसून एक बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक असल्याची माहिती समोर आली आहे.
तारीख ३१ ऑक्टोबर. दुपारची वेळ साधारण अडीच वाजताची. जळगाव तालुक्यातील भोकर येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत नेहमीप्रमाणे कामकाज सुरू होते. त्याचवेळी दोन दुचाकींवरून आलेले चार हेल्मेटधारी दरोडेखोर अचानक बँकेत घुसले. हातात बंदूक आणि चाकू सारखे हत्यार, बंदुकीचा धाक दाखवत त्यांनी व्यवस्थापक आणि कॅशियरला ताब्यात घेतले. विरोध होताच हवेत गोळीबार केला. त्यानंतर कर्मचाऱ्यांना मारहाण करून खुर्चीला बांधले आणि लॉकर उघडण्यास भाग पाडले
दरोडेखोरांनी तब्बल 16 लॉकरमधील सोन्याचे दागिने आणि रोकड लुटली. पोलिसांच्या माहितीनुसार 27 किलो म्हणजेच अंदाजे 35 कोटी रुपयांचे सोने आणि साडे 12 लाख रुपयांची रोकड लुटण्यात आल्याचा अंदाज आहे. सोन्याच्या बॅगा घेऊन दरोडेखोर पसार झाले. मात्र, त्यांचा हा आनंद फार काळ टिकला नाही. दरोड्याची माहिती मिळताच भोकरमधील ग्रामस्थांनी धाडस दाखवत दरोडेखोरांचा पाठलाग सुरू केला. काही संशयितांना ग्रामस्थांनी अडवले, तर पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी शोधमोहीम राबवत चारही संशयितांना ताब्यात घेतले. या कारवाईत लुटीतील मुद्देमालही पोलिसांच्या हाती लागला आहे
या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे दरोड्याचा कथित सूत्रधार बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक शंकर रमेश जासक असल्याची माहिती समोर आली आहे. 2023 मधील जळगाव शहरातील स्टेट बँक दरोडा प्रकरणातही त्याचे नाव आले होते. कारागृहात असताना त्याची गजानन राजेंद्र पवार याच्याशी ओळख झाली. याच ओळखीतून भोकर बँक दरोड्याचा कट आखल्याचा पोलिसांना संशय आहे. विशेष म्हणजे, आरोपींनी चादरी विकणारे फेरीवाले बनून बँकेची रेकी केली होती, अशी माहितीही समोर आली आहे
या प्रकरणात पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयितांमध्ये शंकर रमेश जासक, अंकुश श्रावण चव्हाण, गजानन राजेंद्र पवार आणि अंकुश तुळशीराम चव्हाण यांचा समावेश आहे. यापैकी गजानन पवार हा खूनप्रकरणात कारागृहात होता, तर शंकर जासक याच्यावर यापूर्वीच्या बँक दरोडा प्रकरणाचाही आरोप आहे दरम्यान, पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाची माहिती घेतली. बँकेतून नेमके किती सोने आणि रोकड लुटली गेली, त्याची पडताळणी सुरू आहे. भरदिवसा बँकेवर दरोडा टाकण्याचे धाडस, कारागृहात आखलेला कट आणि ग्रामस्थांनी दाखवलेली सतर्कता. या संपूर्ण घटनेने बँकांच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. या दरोड्यामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का? आणि लुटीतील संपूर्ण मुद्देमाल हस्तगत झाला आहे का? याचा तपास आता पोलीस करत आहेत
कारागृहात असताना अशा प्रकारचे गुन्हेगारी कट कसे रचले जातात. बडतर्फ पोलीस अधिकाऱ्याचा या प्रकरणातील नेमका सहभाग किती? आणि बँकेच्या सुरक्षेतील त्रुटी कोणत्या? या सर्व प्रश्नांची उत्तरे आता पोलीस तपासातून समोर येणार आहेत.