बीड: भाजपा नगरसेवकाच्या मुलाच्या गाडीने दिलेल्या धडकेत पती-पत्नीचा मृत्यू; रेसिंगचा कुटुंबीयाचा दावा; BJP नेत्याने दिला व्हिडीओ पुरावा
रेसिंगच्या नादात आमचे आई-वडिल गेले, आमचं छत्र हरपलं. आरोपींना अटक करून कारवाई झाली पाहिजे अशी मागणी माजलगाव अपघात प्रकरणातील पीडित गायकवाड कुटुंबीय करत आहेत.
बीडच्या माजलगाव मध्ये भाजपा नगरसेवक दिलीप मेंडके यांच्या मुलाने मित्रांसोबत लावलेल्या शर्यतीदरम्यान दुचाकीला जोरदार धडक बसून अपघात झाला. ज्या आई-वडिलांनी बोट धरून चालायला शिकवलं, त्याच आई-वडिलांचे मृतदेह पाहण्याची वेळ तीन लेकरांवर आली आहे. माजलगावमध्ये रेसच्या नादात झालेल्या भीषण अपघातात प्रल्हादराव गायकवाड आणि त्याच्या सुनीता गायकवाड दाम्पत्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. मात्र, आता या मृत्यूला जबाबदार असलेल्यांवर कारवाई होत नसल्याचा गंभीर आरोप मृत दाम्पत्याच्या मुलांनी केला. दरम्यान भाजप नगरसेवक दिपक मेंडके यांनी आपला मुलगा गाडी चालवत नव्हता, असा दावा केला असून, पुराव्यादाखल गाडीच्या आतील एक व्हिडिओही जारी केला आहे.
आरोपींनी दारू प्यायली होती, त्यांच्या गाडीत हत्यारं होती, मात्र मेडिकलही झालं नाही आणि अटकही झाली नाही, असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. राजकीय दबावामुळे तपासाला वेगळं वळण दिलं जात असल्याचाही त्यांचा दावा आहे. तीन दिवसांपासून आई-वडिलांना शोधणाऱ्या मुलीचा आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा आहे. आता आई-वडील परत आणून देणार कोण, असा सवाल करत या लेकरांनी उपस्थित केला आहे.
ही घटना शुक्रवारी दुपारच्या सुमारास बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात घडली. यात प्रल्हाद गायकवाड यांचा जागीच मृत्यू झाला, तर सुनीता यांचा रुग्णालयात नेत असताना दुखापतींमुळे मृत्यू झाला. मृत दाम्पत्याचा मुलगा आदित्य गायकवाड याने सांगितले आहे की, "काही मुलांनी मौजमजेसाठी एकमेकांशी शर्यत (रेसिंग) लावल्यामुळे ही घटना घडली. अल्पवयीन मुलांनी वाहने चालवणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. या घटनेमुळे मी माझे आई-वडील गमावले आहेत. असे वाटतेय की, जणू माझे स्वतःचे आयुष्यच संपले आहे."
"त्यांनी अत्यंत संघर्ष आणि कष्टाने आम्हाला मोठे केले. मी एक इंजिनिअर आहे आणि आता त्यांची स्वप्ने पूर्ण करण्याची माझी वेळ होती. या दुःखाची तीव्रता शब्दांत मांडणे अशक्य आहे," अशा भावना त्याने व्यक्त केल्या आहेत.
या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ आता समोर आला आहे. फुटेजमध्ये एक भरधाव कार जोडप्याच्या मोटारसायकलला समोरासमोर धडकताना दिसत आहे. धडक इतकी भीषण होती की, मोटारसायकलवरील दोघेही हवेत उडून रस्त्यावर जाऊन आदळले. शर्यतीबद्द माहिती कशी मिळाली, असे विचारले असता त्यांनी सांगितले की, त्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले, ज्यामध्ये दोन गाड्या दिसून आल्या.
ते म्हणाले, "ही घटना घडली तेव्हा माझ्या वडिलांचा जागीच मृत्यू झाला. आम्ही सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यात दोन गाड्या दिसल्या, एक 'इनोव्हा क्रिस्टा' आणि दुसरी 'क्रेटा'. माझ्या वडिलांना 'क्रेटा' कारने धडक दिली होती. त्यांना 400 मीटरपर्यंत फरफटत नेले गेले; त्यांचे मृतदेह पाहणेही आमच्यासाठी असह्य होते. हे अत्यंत भयावह होते."
भाजपा नेत्याने फेटाळले दावे
भाजप नगरसेवकाचे म्हणणे आहे की, त्यांच्या मुलावर लावण्यात आलेले आरोप हे राजकीय सूडबुद्धीने प्रेरित आहेत. दिपक मेंडके म्हणाले, "माझ्या विरोधात जे काही केले जात आहे, ते राजकीय सूडबुद्धीने केले जात आहे. मी भाजपचा कार्यकर्ता असल्यामुळे, मला कोणत्याही प्रकारे यात अडकवण्याचा प्रयत्न सुरू आहे. माझी विनंती एवढीच आहे की, नेमके काय घडले, याचे सत्य समोर आले पाहिजे."
पत्रकारांसमोर गाडीतील एक व्हिडिओ सादर करत भाजप नगरसेवकाने सांगितले की, त्यांचा मुलगा पुढच्या सीटवर बसला होता आणि गाडी दुसरी व्यक्ती चालवत होती. व्हिडिओ दाखवताना त्यांनी, मागच्या सीटवर आणखी दोन प्रवासी दिसत असल्याचेही दाखवले. पीडित दाम्पत्याच्या मुलाने पोलिसांवरही निष्काळजीपणाचा आरोप केला आहे.
"पोलिसांनी या प्रकरणात काहीही केलेले नाही. एफआयआर (FIR) मध्ये त्यांनी 'रेस' (शर्यत) सुरू होती, याचा उल्लेखही केलेला नाही. मी ज्या व्यक्तींची नावे दिली होती, तीही त्यांनी एफआयआरमध्ये समाविष्ट केलेली नाहीत. मला फक्त न्याय हवा आहे," असे पीडित आदित्य गायकवाडचे म्हणणे आहे.