भिवंडी शहरातील ओस्वालवाडी परिसरातील नोबल हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान 33 वर्षीय नितीन वाघमारे या तरुणाचा मृत्यू झाल्याप्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली आहे. वैद्यकीय निष्काळजीपणाच्या आरोपावरून डॉक्टरांसह रुग्णालय व्यवस्थापनाविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर अखेर आज भिवंडी महापालिकेच्या आरोग्य विभागाने नोबल हॉस्पिटलवर सीलबंदीची कारवाई केली आहे
18 एप्रिल 2026 रोजी नितीन विश्वनाथ वाघमारे यांना छातीत दुखू लागल्याने ओस्वालवाडी येथील नोबल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तेथे हृदयरोगतज्ज्ञ डॉ. आफान खान यांनी टू-डी इको आणि अँजिओग्राफी करून उपचार सुरू केले. मात्र उपचारादरम्यान डॉक्टर रुग्णालयातून निघून गेल्यानंतर अन्य वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी फोनवरील सूचनांनुसार उपचार केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला होता
दरम्यान, 19 एप्रिल रोजी नितीन यांची प्रकृती अचानक खालावली आणि सकाळी 6 वाजून 45 मिनिटांच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. या मृत्यूनंतर संतप्त कुटुंबीयांनी उपचारात हलगर्जीपणा झाल्याचा आरोप करत पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती
या प्रकरणाच्या चौकशीदरम्यान नारपोली पोलिसांनी उपचारांची कागदपत्रे जिल्हा शल्यचिकित्सक, ठाणे यांच्याकडे वैद्यकीय अभिप्रायासाठी पाठवली होती. 27 ऑगस्ट रोजी प्राप्त झालेल्या वैद्यकीय समितीच्या अहवालात संबंधित हृदयरोगतज्ज्ञांच्या उपचारपद्धतीत निष्काळजीपणा दिसून येत असल्याचे तसेच रुग्णालय व्यवस्थापनाकडून अपेक्षित दर्जाच्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या नसल्याचे नमूद करण्यात आले होते
या अहवालाच्या आधारे 1 ऑक्टोबर रोजी नारपोली पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम 106(1) आणि 3(5) अन्वये डॉक्टरांसह रुग्णालय व्यवस्थापनाविरुद्ध गुन्हा दाखल केला. मात्र संबंधित डॉक्टरांना अटक करण्यासह रुग्णालयाचा परवाना रद्द करण्याच्या मागणीसाठी मृताच्या कुटुंबीयांनी आणि आंबेडकरी युवा संघटनेने सातत्याने पाठपुरावा केला. अखेर आज भिवंडी महापालिकेच्या आरोग्य विभागाने नोबल हॉस्पिटलवर सीलबंदीची कारवाई केली आहे
वैद्यकीय निष्काळजीपणाच्या या प्रकरणात 7 महिन्यांनंतर सीलबंदीची कारवाई झाली असली तरी डॉक्टरांना अटक कधी होणार, आणि कुटुंबाला न्याय कधी मिळणार, असा सवाल आता आंबेडकरी युवा संघटनेने उपस्थित केला आहे.