सर्वोच्च न्यायालयाने बिहारमधील सासाराम येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीशाला कडक शब्दांत फटकारलंय. न्यायाधीशांनी 'रॉबिन हूड' किंवा 'बाहुबली'सारखे वागण्याचा प्रयत्न करू नये, असे न्यायालयाने म्हटले. न्यायाधीशांना आपल्या अधिकारांची व्याप्ती आणि ज्या कायदेशीर मर्यादेत राहून त्यांना कारवाई करता येते, याची जाणीव असणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले. सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं? सविस्तर जाणून घेऊया.
बिहारमधील सासाराम येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश अनिल कुमार यांच्याशी संबंधित एका प्रकरणाची सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने हे निरीक्षण नोंदवले. न्यायाधीश अनिल कुमार यांनी रोहतासचे पोलीस अधीक्षक (SP) रोशन कुमार यांच्यावर न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी 1 रुपयाचा प्रतिकात्मक दंड आकारला होता. न्यायाधीशांच्या आदेशानंतरही पोलिसांनी एफआयआर (FIR) नोंदवण्यास विलंब केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली होती. एका फौजदारी खटल्यात खोटे पुरावे सादर केल्याचे लक्षात आल्यावर, न्यायाधीशांनी एफआयआर नोंदवण्याचा आदेश दिला होता. या आदेशाचे पालन न झाल्यामुळे, न्यायाधीशांनी पोलीस अधीक्षकांना न्यायालयात बोलावले. त्यानंतर, पोलीस अधीक्षकांना न्यायालयाच्या अवमानासाठी दोषी ठरवत, 'भारतीय नागरिक सुरक्षा संहिता' (BNSS) च्या कलम 384 अंतर्गत त्यांना 1 रुपयाचा प्रतिकात्मक दंड ठोठावला. तसेच, ही कारवाई संबंधित अधिकाऱ्याच्या सेवा पुस्तकात नोंदवण्याचे निर्देशही न्यायाधीशांनी दिले होते.
या प्रकरणात, पाटणा उच्च न्यायालयाने न्यायाधीशांच्या या वर्तनाला 'असामान्य' म्हटवे. उच्च न्यायालयाने या प्रकरणाशी संबंधित सर्व दस्तऐवज मागवून घेतले आणि पुढील कार्यवाहीला स्थगिती दिली. न्यायाधीश अनिल कुमार यांनी उच्च न्यायालयाच्या या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले.
न्यायाधीशांना कायद्याची पुरेशी समज नसल्याबद्दल असमाधान व्यक्त करत सर्वोच्च न्यायालयाने म्हटले.त्यांना 'भारतीय नागरिक सुरक्षा संहिता' (BNSS) चे कलम 384 आणि 'फौजदारी प्रक्रिया संहिता' (CrPC) चे कलम 345 यांचा योग्य अर्थ समजून घेणे आवश्यक आहे, असल्याचे न्यायालयाने म्हटले. एखाद्या अधिकाऱ्याने न्यायालयाच्या आदेशाचे पालन न करणे आणि न्यायालयाच्या उपस्थितीत गुन्हा घडणे, या दोन पूर्णपणे भिन्न गोष्टी आहेत. कोणाला तरी थप्पड मारणे, अपशब्द वापरणे किंवा न्यायालयाच्या आदेशानंतरही कोर्टरुम सोडण्यास नकार देणे—यांसारख्या गोष्टी 'न्यायालयात घडलेला गुन्हा' मानल्या जाऊ शकतात, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
सर्वोच्च न्यायालयाने निरीक्षण नोंदवले की, न्यायाधीशांचा उद्देश न्याय मिळवून देणे हा असू शकतो,ज्याचे न्यायालय स्वागतही करते,परंतु न्याय देण्याच्या इच्छेपोटी कायद्याचे किंवा प्रस्थापित प्रक्रियेचे उल्लंघन करणे समर्थनीय ठरू शकत नाही. न्यायालयाने संबंधित न्यायाधीशांना 'नॅशनल ज्युडिशियल अकॅडमी'मध्ये प्रशिक्षण घेण्याचा सल्लाही दिला, जेणेकरून त्यांना त्यांच्या न्यायिक अधिकारांच्या आणि अधिकारांच्या मर्यादा अधिक चांगल्या प्रकारे समजून घेता येतील. हे प्रकरण निकाली काढताना, सर्वोच्च न्यायालयाने पाटणा उच्च न्यायालयाला संबंधित न्यायाधीशांचे म्हणणे विचारात घेण्यास सांगितले. जर त्यांनी माफी मागितली, तर त्याकडे सहानुभूतीपूर्वक पाहिले जावे.