देशातील सर्वात श्रीमंत महापालिकांपैकी एक असलेल्या मुंबई महापालिका म्हणजेच बीएमसीच्या मुदत ठेवींमध्ये गेल्या पाच वर्षांत मोठी घट झालीय. 2021-22 मध्ये सुमारे 91 हजार 690 कोटी रुपये असलेल्या एफडी ऑक्टोबर 2026 मध्ये 79 हजार 873 कोटी रुपयांवर आल्या आहेत. म्हणजेच या कालावधीत 11 हजार 817 कोटी रुपयांची घट झाली आहे. या पार्श्वभूमीवर एफडीमधून काढलेला पैसा नेमका कुठे खर्च झाला?, याची सविस्तर माहिती देणारी श्वेतपत्रिका प्रसिद्ध करण्याची मागणी काँग्रेसने केलीय. काँग्रेसचे गटनेते अशरफ आझमी यांनी महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांना पत्र लिहून हा मुद्दा उपस्थित केला आहे. काय घडलंय नेमकं? सविस्तर जाणून घेऊया.
महापालिकेच्या मुदत ठेवी 2021-22 मध्ये 91690.85 कोटी रुपयांवर होत्या. मार्च 2026 अखेर हा आकडा 77905.39 कोटी रुपयांपर्यंत खाली आला. त्यानंतर 13 ऑक्टोबर 2026 रोजी एफडीमध्ये 79873.39 कोटी रुपये असल्याची माहिती प्रशासनाने दिली. त्यामुळे ऑक्टोबरमधील आकडेवारीनुसार पाच वर्षांत 11817 कोटी रुपयांची घट झाली आहे. मात्र, मार्च 2026 पर्यंतची घट मोजल्यास ती 13785 कोटी रुपये होते.
एफडीमधून काढण्यात आलेला निधी कोणत्या प्रकल्पांसाठी वापरला, खर्चाला कोणत्या अधिकाऱ्यांनी मंजुरी दिली आणि प्रत्येक कामासाठी किती रक्कम खर्च झाली, याचा तपशील सार्वजनिक करावा, अशी मागणी अशरफ आझमी यांनी केली आहे. 2021 पासून सप्टेंबर 2026 पर्यंतच्या आर्थिक व्यवहारांचा सविस्तर आढावा घेणारी श्वेतपत्रिका स्थायी समितीच्या पुढील बैठकीपूर्वी सादर करावी, अशी त्यांची मागणी आहे.
महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी एफडीमधील घटीबाबत स्पष्टीकरण दिले आहे. कोविड काळात खर्च कमी झाल्यामुळे आणि विकासकांना दिलेल्या सवलतींमधून मिळालेल्या उत्पन्नामुळे 2021-22 मध्ये एफडी वाढल्या होत्या. त्यानंतर नियमित खर्च आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांवरील भांडवली खर्च वाढल्याने ठेवी कमी झाल्या. विशेषतः फेब्रुवारी आणि मार्च 2026 मध्ये 16071.40 कोटी रुपयांचा भांडवली खर्च झाल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
महापालिकेवर 1 एप्रिल 2026 रोजी प्राधान्याच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी 2 लाख 44 हजार 552 कोटी रुपयांची बांधिलकी असल्याची माहिती आयुक्तांनी दिली आहे. हा निधी अतिरिक्त उत्पन्न, कर वसुलीतील सुधारणा, खर्चावर नियंत्रण, अंतर्गत निधी आणि गरज पडल्यास पर्यायी आर्थिक स्रोतांमधून उभारण्याचे नियोजन असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. एवढ्या मोठ्या प्रकल्पांसाठी निधी उभारताना महापालिकेच्या आर्थिक स्थैर्यावर परिणाम होणार नाही ना, असा प्रश्न काँग्रेसने उपस्थित केला.
निधी उभारण्यासाठी महापालिकेच्या जमिनी आणि रुग्णालये इतर संस्थांना देण्याची प्रक्रिया तातडीने थांबवावी, अशी मागणीही काँग्रेसने केली आहे. एफडीतील घट आणि भविष्यातील आर्थिक जबाबदाऱ्या लक्षात घेता पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, सार्वजनिक शौचालये, रुग्णालये आणि शाळांसारख्या मूलभूत सुविधांच्या निधीवर परिणाम होऊ नये, अशी चिंता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे महापालिकेच्या आर्थिक स्थितीचा पारदर्शक हिशेब जाहीर करण्याची मागणी आता जोर धरत आहे.