Prithvi Shaw Yograj Singh : क्रिकेटर पृथ्वी शॉने आपल्या करिअर आणि वैयक्तिक आयुष्यावर टिप्पणी करणाऱ्यांना आता वार्निंग दिली आहे. माजी क्रिकेटर आणि स्टार क्रिकेटर युवराज सिंहचे वडील योगराज सिंह यांना उद्देशून पृथ्वीने ही वॉर्निंग दिली असून त्याने याबाबत म्हंटलं की त्याच्याजवळ भूतकाळाबाबत लपवण्यासारखे काही नाही, मात्र तो त्याच्याविषयी कोणतीही नकारात्मक गोष्ट पसरवणे आणि त्यातून कोणी फुकट पब्लिसिटी मिळवत असेल तर तो त्याच्या विरोधात आहे.
योगराज सिंहने काही दिवसांपूर्वीच एका युट्युबरशी बोलताना पृथ्वी शॉच्या करिअर आणि त्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबत टिपण्णी केली होती. योगराजने पृथ्वीच्या करिअरमध्ये आलेल्या घसरणीचे कारण त्याच्या जीवनशैलीला दिले; ज्यामध्ये पार्ट्या करणे, मद्यपान करणे आणि चुकीच्या संगतीत राहणे यांचा समावेश होता. त्याने या भारतीय फलंदाजाच्या परिस्थितीची तुलना माजी भारतीय क्रिकेटपटू विनोद कांबळी यांच्या परिस्थितीशीही केली.
काय म्हणाले योगराज सिंह?
योगराज सिंहने एका यूट्यूब चॅनलशो बोलताना म्हंटले की, 'पृथ्वी शॉचं करिअर का खाली गेलं? त्याआधी विनोद कांबळी सोबत सुद्धा हेच झालं होतं. त्याचं कारण पार्टी, अय्याशी, सिगारेट, आणि दारू ही होती. मी एकदा कांबळीला विचारलं होतं की, बेटा तू हे काय करतोयस? तुझ्यात इतकं टॅलेंट आहे. तुम्ही पहाटे अडीच वाजता आपल्या खोलीवर परतता. तुम्हाला सांगितले जाते, 'तुमचा काळ संपला आहे; आता आम्ही वेगळ्या प्रकारची क्रिकेट खेळत आहोत'. दुसऱ्याच दिवशी सकाळी, कोर्टनी वॉल्शने तुम्हाला बाद केले आणि भारत तो सामना हरला. त्यानंतर त्याच्यासोबत असलेली स्त्रीही तुम्हाला सोडून निघून गेली आणि एकाही व्यक्तीने त्याला सिगारेट किंवा मद्यपान करण्याची साधी विचारणाही केली नाही. शॉच्या बाबतीतही अगदी असेच घडले. जर तुम्ही पार्ट्यांमध्ये जात असाल, अय्याश जीवन जगत असाल, मद्यपान करत असाल आणि चुकीच्या संगतीत राहत असाल, तर तुमची अवस्थाही अगदी त्यांच्यासारखीच होईल'.
पृथ्वी शॉने दिली लीगल नोटीसची वॉर्निंग :
योगराज सिंहच्या या प्रतिक्रियेवर पृथ्वीने आपल्या इंस्टाग्रामवर स्टोरी शेअर करून पलटवार केला. पृथ्वी शॉने इन्स्टा स्टोरीवर लिहिले की, 'माझा भूतकाळ हा माझ्या आयुष्याचा एक भाग आहे आणि माझ्याकडे लपवण्यासारखे किंवा लाज वाटण्यासारखे काहीही नाही. मात्र जे लोक जाणीवपूर्वक माझे नाव, माझे वैयक्तिक आयुष्य किंवा माझा भूतकाळ वापरून नकारात्मकता पसरवतात, विनाकारण वाद निर्माण करतात, माझी प्रतिमा मलिन करतात किंवा माझ्या नावाचा वापर करून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करतात, त्यांना मी अजिबात खपवून घेणार नाही. हा एक स्पष्ट आणि अंतिम इशारा समजावा. अशा प्रकारच्या कृतींमध्ये सहभागी असलेल्या कोणत्याही व्यक्तीवर किंवा प्लॅटफॉर्मवर कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते'.