ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत आज समाजकल्याण मंत्री संजय शिरसाट यांच्यावर निशाणा साधला आहे. अण्णाभाऊ साठे ट्रेनिंग सेंटरच्या प्रस्तावासाठी संजय शिरसाट यांनी 5 कोटींची लाच मागितली, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेतून केला आहे. संजय राऊत छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर असताना हे मोठं विधान त्यांनी केलं आहे. एवढंच नाहीतर त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केलं.
काल संभाजीनगरला आल्यावर लातूरचे एक सामाजिक कार्यकर्ते नरसिंग उदगीरकर मला भेटले. उदगीरकर हे मातंग समाजाचे नेते आहेत. अण्णाभाऊ साठेंच्या नावाने लातूरमध्ये ट्रेनिंग सेंटर उभं करण्यासाठी उदगीकर यांनी प्रस्ताव दिला होता. त्यांनी सर्व कागदपत्रांची पूर्तता केली होती. 25 कोटी रुपयांचं ट्रेनिंग सेंटर उभारायचं होतं. त्यात दलित मुलं आणि मातंग समाजातील मुलांना स्पर्धा परीक्षांचं प्रशिक्षण मिळावं किंवा शैक्षणिक कार्यक्रम व्हावेत म्हणून हा प्रस्ताव दिला होता. खरं तर अशा प्रस्तावाला वाट पाहायला लागू नये. पण उदगीरकर हे वारंवार हेलपाटे मारत होते. ओएसडी सिद्धार्थ भंडारी यांनी मंत्र्यांना भेटल्याशिवाय काम होणार नाही म्हणून उदगीरकर यांना सांगितलं.
मुख्यमंत्री @Dev_Fadnavis जी आपले सरकार हे भ्रष्ट्राचाराची खाण बनले आहे .. राज्याची आणि जनतेची लूट खुलेआम सुरू आहे, आपण काय करताय? लहान कामांसाठी देखील मंत्री पैसे मागत आहेत,हे अराजक आहे! लातूर येथील श्री नरसिंग उरगीर मला भेटले, या आधी त्यांची व्यथा घेऊन ते सरकार दरबारी,लाच लुचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिकाऱ्यांना भेटले पण निकाल शून्य केस अशी आहे: श्री नरसिंग यांनी त्यांच्या आरती सेवाभावी संस्था लातूर यांचे माध्यमातून साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे ट्रेनिंग सेन्टर उदगीर या साठी प्रस्ताव दिनांक 6 / 10 / 2025 रोजी समाज कल्याण मंत्रालयात सादर केला,पंचवीस कोटी रुपयांचा परिपूर्ण असा हा प्रस्ताव. तो प्रस्ताव अद्याप समाज कल्याण मंत्री महोदयांनी मंजूर केला नाही त्याचे कारण मंत्रीमहोदयानी प्रस्तावाच्या २०% म्हणजेच साधारण पाच कोटी ची लाच मुंबईतील ७२ व्या मजल्यावर खाजगी घरी बोलवून स्वतः मागितली ,ती रक्कम दिली नसल्यामुळे आपला प्रस्ताव अद्याप मंजूर केला नाही असे श्री नरसिंग यांचे म्हणणे आहे! अण्णा भाऊ साठे यांच्या नावाने पाच कोटी रुपयांची लाच मागितली जाते ज्या अण्णा भाऊ साठे यांचे संयुक्त महाराष्ट्र राज्य स्थापन करण्यात मोठे योगदान आहे! देवेंद्रजी, हा असला दलितोद्धार काय कामाचा? श्री नरसिंग यांची कहाणी राज्यातील प्रत्येक माणसाची व्यथा आहे! असे राज्य सरकार बुडालेले बरे! (आज नरसिंग उरगिरकर माध्यमाना भेटतील,त्याना अडवले नाही तर) @PMOIndia @AmitShah
— Sanjay Raut (@rautsanjay61) November 25, 2026
मंत्र्यांनी उदगीरकरांना भेटायला बोलावलं. समोरासमोर बसवलं. मंत्री शिरसाटच डीलिंगला बसले होते. मी 25 कोटी मंजूर करतो. पण तुला मला 5 कोटी द्यावे लागतील. उदगीकर म्हणाले, दलितांसाठी काम करत आहे. 5 कोटी कुठून देऊ? थोडेफार देऊ शकतो. त्यावर मंत्र्याने प्रस्ताव मंजूर होणार नाही म्हणून सांगितलं. अजूनही प्रस्ताव अजूनही मंजूर झाला नाही. आणि हे लोक बाळासाहेब ठाकरेंचं नाव सांगतात. मी सांगतो ते तथ्य तपासा. नरसिंग उदगीरकर यांना बोलवा. ते काय सांगतात ते ऐकून घ्या, असंही ते यावेळी म्हणालेत.