Maharashtra Breaking News Today LIVE : पुण्यातील 18 हॉटेल्सना तुकाराम मुंडेंचा दणका! अन्न परवाने आणि नोंदणी FDA कडून निलंबित
Maharashtra Breaking News Today LIVE Updates 24 November 2026 : राज्यासह देशभरातील प्रत्येक घडामोडींच्या अपडेट्स या लाइव्ह ब्लॉगच्या माध्यमातून एका क्लिकवर मिळवा. सर्व महत्त्वाचे अपडेट्स या Live Blog मध्ये एका क्लिकवर मिळवा.
Maharashtra Breaking News Today LIVE Updates 124 November 2026 : गोकुळच्या 4 शासननियुक्त संचालकांच्या नियुक्तीच्या समर्थनासाठी ऐन दुष्काळात 80 लाखांची उधळपट्टी केल्याचा आरोप सतेज पाटलांनी केलाय. तर मिरा भाईंदर महापालिकेत मांसाहार बंदीचा वाद पेटण्याची शक्यता आहे. दुष्काळाच्या झळांनी विदर्भ मराठवाडा होरपळून निघालाय..पिकं गेलीत गावांवर तीव्र पाणीटंचाईचं संकट निर्माण झालंय. या आणि अशा अनेक राज्यातील घडामोडीसह देशविदेशातील प्रत्येक क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडीवर एका क्लिकवर तुम्हाला माहिती मिळणार आहे.
24 Nov 2026 09:28 IST
पुण्यातील 18 हॉटेल्सना तुकाराम मुंडेंचा दणका! अन्न परवाने आणि नोंदणी FDA कडून निलंबित
पुण्यातील 18 हॉटेल्सचे अन्न परवाने आणि नोंदणी एफडीए निलंबित
पुणे शहर आणि पुणे स्टेशन परिसरात अन्न औषध प्रशासनाची मोठी कारवाई
अनेक आस्थापनामध्ये अन्न सुरक्षा व स्वच्छतेच्या नियमाचे गंभीर उल्लंघन आढळून आल्याने एफडीएची कारवाई
24 Nov 2026 09:27 IST
NVIDIA च्या CEO पदी पुन्हा जेन्सेन हुआंग
जगातील आघाडीची चिप निर्माता कंपनी NVIDIA च्या नेतृत्वाबाबत मोठी बातमी समोर आली आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने जेन्सेन हुआंग यांची पुन्हा मुख्य कार्यकारी अधिकारी अर्थात CEO पदी नियुक्ती करण्याचा एकमताने निर्णय घेतलाय.. हुआंग यांच्यासोबत चर्चा आणि बैठका केल्यानंतर मंडळाने त्यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला.. विशेष म्हणजे या निर्णयापूर्वी अमेरिकन सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडूनही अभिप्राय घेण्यात आला... हुआंग यांच्या पुनर्नियुक्तीमुळे राष्ट्रीय सुरक्षेला कोणताही धोका नसल्याचा विश्वास मंडळाने व्यक्त केलाय.. दरम्यान अंतरिम CEO कोलेट क्रेस यांच्या कामाचंही कौतुक करण्यात आलं असून हार्वे सी. जोन्स अध्यक्षपदी कायम राहणार आहेत...
24 Nov 2026 09:27 IST
पक्षांतरबंदी कायद्यात बदलाची मागणी
देशातील राजकीय पक्षांतर आणि आमदार-खासदारांच्या राजीनाम्यांच्या राजकारणाला आळा घालण्यासाठी पक्षांतरबंदी कायद्यात व्यापक बदल करण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयात करण्यात आलीय... या जनहित याचिकेची दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार, निवडणूक आयोग आणि विधी आयोगाला नोटीस बजावलीय.. अपात्रतेची कारवाई टाळण्यासाठी लोकप्रतिनिधींकडून राजीनाम्याचा मार्ग अवलंबला जात असल्याचा गंभीर मुद्दा याचिकेत उपस्थित करण्यात आलाय.. राजीनामा दिल्यानंतरही अपात्रतेची प्रक्रिया सुरू राहावी तसंच त्यावर निश्चित कालमर्यादेत निर्णय व्हावा अशी मागणी करण्यात आलीय... त्रिशंकू विधानसभेतील बहुमत चाचणीबाबतही महत्त्वाच्या सुधारणा सुचवण्यात आल्या आहेत.. आता या प्रकरणात केंद्र सरकार काय भूमिका मांडणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलंय..
24 Nov 2026 09:25 IST
रोहित पवारांना स्वतःच्या पक्षाकडून मोठा हादरा
रोहित पवारांना स्वत:च्याच पक्षाकडून मोठा हादरा बसला आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून पदाधिकाऱ्यांना आंदोलनात न जाण्याचे आदेश दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राष्ट्रवादी SP च्या विदर्भातील जिल्हाध्यक्ष आणि शहराध्यक्ष यांना रोहित पवारांच्या आंदोलनात सहभागी न होण्याच्या सूचना पक्षातील वरिष्ठ नेत्याकडून देण्यात आल्याची माहिती आहे. रोहित पवारांकडून नागपूरमध्ये विदर्भातील पक्षाच्या शहराध्यक्ष ग्रामीण आणि शहरी जिल्हाध्यक्ष यांची रविवारी बैठक घेण्यात आली. शेगाव ते बुटीबोरीमार्गे नागपूर विधान भवन मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. यासंदर्भात रोहित पवारांची बैठक पार पडल्यानंतर राष्ट्रवादी SP च्या वरिष्ठ नेत्याकडून जिल्हाध्यक्ष आणि शहराध्यक्ष यांना वेगळ्या सूचना देण्यात आल्या. केवळ प्रदेश कार्यालयातून ज्या सूचना प्राप्त होतील त्याच पाळाव्यात, असे ग्राऊंड लेव्हलच्या पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना सांगण्यात आले आहे. रोहित पवारांच्या कोणत्याही चळवळीत किंवा आंदोलनात सहभागी न होण्याच्या सूचनाही राष्ट्रवादी SP च्या गोटातून देण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
24 Nov 2026 09:25 IST
('कोकणची तहान भागवल्याशिवाय...'
कोकणची तहान भागवल्याशिवाय कोयनेचं पाणी कुठेही जाणार नाही... आधी कोकणातील गरजू भागांना लिफ्टिंगद्वारे हे पाणी मिळालं पाहिजे आणि त्यानंतरच अतिरिक्त पाण्याचा विचार शासनाने करावा, अशी भूमिका आमदार शेखर निकमांनी मांडलीय... शेखर निकम हे चिपळूण-संगमेश्वरचे आमदार आहेत... मुंबईला पाणी नेण्याच्या चर्चांवर आमदार शेखर निकमांनी ही रोखठोक भूमिका मांडलीय...
24 Nov 2026 09:25 IST
कोयनेचं पाणी मुंबईला देण्यास हरकत नाही-तटकरे
कोयनेचे पाणी मुंबईला देण्यास आमची हरकत नाही... मात्र त्यातील काही हिस्सा कोकणातील सिंधुदुर्ग, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांना पिण्यासाठी द्या, अशी भूमिका रायगडचे खासदार सुनील तटकरेंनी घेतलीय... आपण जलसंपदा मंत्री असताना कोयनेचे अवजल मुंबईकडे वळवण्याचा प्रस्ताव ठेवला होता असंही त्यांनी सांगितलं... कोयना जलविद्युत प्रकल्पातून वीजनिर्मितीनंतर समुद्रात वाहून जाणारे 67 टीएमसी अतिरिक्त पाणी मुंबईकडे वळवण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र सरकारच्या विचाराधीन असल्याची माहिती जलसंपदा मंत्री गिरीश महाजन दिलीय... त्यावर तटकरे बोलत होते...
24 Nov 2026 09:24 IST
कोयनेचं पाणी मुंबईला वळवण्याची मागणी
कोयना धरणातील वीज निर्मितीचे पाणी मुंबईला वळवण्याच्या मागणीला सांगलीची माजी खासदार संजयकाका पाटलांनी विरोध दर्शवला आहे. मुंबईला पाणी घेऊन जाणार असाल तर शेतकऱ्यांनी आपली शेती विकून मुंबईला जायचं का ? असा संतप्त सवाल संजय पाटलांनी राज्य सरकारला केला आहे. मंत्री गिरीश महाजनांकडून कोयना धरणाच्या वीज निर्मितीचा पाणी मुंबईला वळवण्याचे मागणी करण्यात आलीय. मात्र कोयना धरणातलं वीज निर्मिती ६७ टीएमसी पाणी दुष्काळी सांगली, कोल्हापूर, सातारा, सोलापूर जिल्ह्याला मिळालं पाहिजे, अशी आग्रही मागणी संजयकाका पाटील केली आहे.त्याचबरोबर या प्रकरणी लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचं स्पष्ट करत कोयनेचं पाणी मुंबईला देण्याला जोरदार विरोध दर्शवला आहे.
24 Nov 2026 09:24 IST
मुंबईतील विहिरींना मिळणार नवसंजीवनी
मुंबईतील पाणीटंचाईची समस्या दिवसेंदिवस तीव्र होत असल्याने महापालिकेने शहरातील पारंपरिक जलस्रोत असलेल्या विहिरींच्या पुनरुज्जीवनासाठी पुढाकार घेतला आहे...विहिरींमध्ये साचलेला गाळ काढणे, स्वच्छता आणि पंप बसविण्यासाठी प्रत्येक विभागाला ३० लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे... प्रायोगिक तत्त्वावर प्रत्येक विभागातील पाच विहिरींची निवड करून त्यांचे पुनरुज्जीवन केले जाणार आहे.... त्यामुळे महापालिकेच्या तिजोरीवर तब्बल ७ कोटींचा भार पडला आहे...
24 Nov 2026 09:21 IST
व्हॉट्सअॅप वेब वापरताय... सावधान!
सरकारने व्हॉट्सअॅप वेब वापराबाबत इशारा जारी केला आहे... गृह मंत्रालयाच्या सायबर क्राइम युनिटने सांगितले आहे की, तुम्ही संगणकावर व्हॉट्सअॅप सुरू ठेवले, तर त्यातून डेटा लीक होऊ शकतो...सायबर क्राइम युनिटने त्याबाबत एक परिपत्रक जारी करुन संवेदनशील कामासाठी व्हॉटसअॅप वेब न वापरण्याच्या सूचना दिल्या आहेत..
24 Nov 2026 09:21 IST
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, या दिवशी पाणीपुरवठा राहणार बंद
मुंबईत 26 नोव्हेंबरपासून पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे. मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी मुंबईत 24 तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे. 26 नोव्हेंबरला सकाळी नऊ ते 27 नोव्हेंबरपर्यंत सकाळी नऊ वाजेपर्यंत पाणीपुरवठा होणार नाहीये. यामुळे धारावी, माहीम, मरोळ, चकाला, जे. बी. नगर, वांद्रे पूर्व, विक्रोळी, कांजूरमार्ग, भांडुप यासह काही भागात पाणीपुरवठा होणार नाही. तसंच दुरुस्तीनंतर पुढील तीन ते चार दिवस काही भागांत कमी दाबाने आणि गढूळ पाणी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी गाळून आणि उकळून प्यावे, असं आवाहन करण्यात आलंय.
24 Nov 2026 09:18 IST
ट्रक आणि स्कॉर्पिओच्या धडकेत 5 जणांचा जागीच मृत्यू
बिहारच्या लखीसराय जिल्ह्यात आज सकाळी भीषण अपघात घडला. ट्रक आणि स्कॉर्पिओ गाडीच्या जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला, तर चार जण गंभीर जखमी आहेत. मृतांमध्ये तीन पुरुष आणि दोन महिला आहेत.
24 Nov 2026 09:16 IST
मिरा-भाईंदर महापालिकेत मांसाहारबंदीचा वाद
मिरा भाईंदर महापालिकेत मांसाहार बंदीचा वाद पेटण्याची शक्यता आहे.. महापालिकेचत्या महासभेतील जेवणातून मांसाहारी पदार्थ हद्दपार करण्यात आलेत. गेल्या सहा महिन्यांपासून केवळ शाकाहारी जेवणाची व्यवस्था करण्यात येत असल्यानं आता नव्या वादाला तोंड फुटलंय.. आगरी कोळी समाजाच्या शहरात मांसाहारावर बंदी का? असा सवाल शिवसेनेसह काँग्रेस नगरसेवकांनी विचारलाय.. जैन समाजाच्या एकगठ्ठा मतांमुळे सत्ताधारी भाजपने हा निर्णय घेतल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.. महासभेतील जेवणाच्या मेन्यूवर सत्ताधारी भाजपमधूनही काही जणांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिलीय... गेल्या 25 वर्षांपासून महापालिकेच्या महासभेत शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची व्यस्था केली जाते.. मात्र अचानक केवळ शाकाहारी जेवणाचा निर्णय घेतल्यानं नवा वाद पेटण्याची शक्यता आहे..
24 Nov 2026 09:16 IST
वाशिममध्ये दुष्काळाचा फळबागांना फटका
वाशिम जिल्ह्यात दुष्काळाची तीव्रता वाढली असून, त्याचा मोठा फटका आता फळबागांना बसू लागला आहे... जऊळका शिवारातील अडीच एकरांतील पेरूची बाग पाण्याअभावी सुकण्याच्या मार्गावर आहे. या बागेत तब्बल १२०० झाडे असून,विहिरीतील पाणीसाठा आटल्याने झाडांना पाणी देणेही शक्य होत नाहीये... यामुळे फळबाग वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे... तर दुसरीकडे वाशिमच्या येथील शेतकरी कुंदन रघुवंशी यांनी पाच एकरांत सीताफळाची लागवड केली होती... सात वर्षांत या बागेसाठी त्यांनी २० ते २२ लाख रुपये खर्च केले,तर मागील दोन वर्षांत सुमारे १० ते १२ लाखांचे उत्पन्न मिळवले होते... मात्र, यंदा पाण्याअभावी २ हजार झाडांपैकी तब्बल १६०० झाडे सुकली असून,उत्पन्नही पूर्णपणे बुडाले आहे...
24 Nov 2026 09:15 IST
दुष्काळ झळांनी विदर्भाची होरपळ
पिकं गेली, गावांवर तीव्र पाणीटंचाईचं संकट
दीड महिन्यांत विदर्भात 155 आत्महत्या
नापिकी, कर्जबाजारीपणाला कंटाळून संपवलं जीवन
कोरडवाहूसह बागायतदार शेतक-यांचं जीणे मुश्किल
123 गावांना पाणीटंचाईचा विळखा
24 Nov 2026 09:08 IST
राज्यातील लाखो झाडांवर कु-हाड चालणार?
राज्यातील लाखो झाडांची कत्तल होण्याची शक्यता आहे.. देशातील 133 प्रकल्पांच्या प्रस्तावावर NBWL म्हणजेच राष्ट्रीय वन्यजीव मंडळाच्या बैठकीत चर्चा झालीये.. केंद्रीय पर्यावरणमंत्री भूपेंद्र यादव यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत ही बैठक झाली.. या बैठकीत 133 प्रकल्पांबाबतचे प्रस्ताव मांडण्यात आले.. जर या प्रस्तावांना मंजुरी मिळाल्यास महाराष्ट्रातील लाखो झाडांची कत्तल होण्याची शक्यता आहे.. रस्ते, संरक्षण क्षेत्रातील पायाभूत सुविधा, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा आणि अन्य अत्यावश्यक विकासकामांचा या प्रस्तावांमध्ये समावेश आहे..
24 Nov 2026 09:05 IST
मुंबई महानगरपालिकेतील फिक्स डिपॉझीटला गळती
मुंबई महानगरपालिकेतील फिक्स डिपॉझीटला गळती
गेल्या 5 वर्षात एफडीमध्ये 11,817 कोटींची घट
FDवर श्वेतपत्रीका सादर करा, काँग्रेसची मागणी
नगरसेवक अशरफ आझमींचं अश्विनी भिडेंना पत्र
24 Nov 2026 09:04 IST
'शरद पवार, सुप्रिया सुळे उघडपणे भाजपला मदत करतात'
शरद पवार आणि सुप्रिया सुळे भाजपच्या विभाजनवादी राजकीय अजेंड्याला पुढे नेतात मात्र त्यांना भाजपची बी-टीम म्हटलं जात नाही अशी टीका प्रकाश आंबेडकरांच्या पत्नी आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली आंबेडकरांनी केलीय. शरद पवार आणि सुप्रिया सुळे जेव्हा उघडपणे भाजपला राजकीय मदत करतात तेव्हा अचानक आवाज बंद होतात असा आरोपही त्यांनी केलाय.. वंचितला भाजपची बी-टीम ठरवणाऱ्या किती लोकांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांना भाजपची बी-टीम म्हटले? असा सवाल त्यांनी केलाय..
24 Nov 2026 09:04 IST
गोकुळ सत्तासंघर्षसाठी 80 लाखांचा खर्च, सतेज पाटील यांचा गंभीर आरोप
गोकुळ दूध संघात दुष्काळात 80 लाखांची उधळपट्टी केल्याचा आरोप सतेज पाटलांनी सत्ताधा-यावर केला आहे...गोकुळमधील 4 संचालकांच्या कोर्टकचेरीसाठी 80 लाख रूपये खर्च केल्याचा आरोप त्यांनी केला आहे... सतेज पाटील यांनी ट्विट करत हा आरोप केला आहे...
नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत.शैक्षणिक पात्रतानेहा चौधरी यांनी बॅचरल ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पदवी घेतली आहे. संरक्षण शास्त्रातून बीए, नाशिक भोसला मिलटरी कॉलेजमधून केलं आहे. डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा अभ्यास केलाय.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी त्या ज्योतिषशास्त्र, सणवार, विज्ञान, ट्रेंडिंग विषय आणि आरोग्याशी संबंधित तज्ज्ञांच्या मुलाखत घेतात. यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.या विषयांमध्ये हातखंडत्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही लिखाण करतात. ज्योतिष, अंकशास्त्र, टॅरो कार्ड आणि धर्म यावर लिखणा करतात. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन करुन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व, याबद्दल बातम्यांमधून समतोल राखतात. मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, खाद्य पदार्थ बनवणे, संगीताची आवड आहे.