मोठी बातमी! भाजपा आमदाराला तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा, अलिबाग कोर्टाचा निर्णय, पण नंतर मोठा ट्विस्ट...
भाजपाचे उरणमधील आमदार महेश बालदी यांना तीन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. आमदार महेश बालदी यांच्यासह एकूण 4 जणांना सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
भाजपाचे उरणमधील आमदार महेश बालदी यांना तीन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. यामुळे राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. आमदार महेश बालदी यांच्यासह एकूण 4 जणांना सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 2010 मधील एका प्रकरणात कोर्टाने हा निर्णय दिला आहे. अलिबागमधील मुख्य न्याय दंडाधिकारी न्यायालयात यासंदर्भात सुनावणी सुरु होती.
नेमकं प्रकरण काय?
उरणमध्ये एका मुलीची छेडछाड झाली होती. छेडछाड करणाऱ्या तरुणाला जाब विचारण्यासाठी आमदार महेश बालदी व इतर लोक गेले होते, त्यावेळी तरुणाला शिवीगाळ करण्यात आली आणि गंभीर दुखापत केली. 2010 मधील हे प्रकरण आहे. याचा खटला अलिबाग येथील मुख्य न्याय दंडाधिकारी यांच्या न्यायालयात सुरू होता.
शिक्षेसह जामीनही मंजूर
अलिबाग येथील मुख्य न्याय दंडाधिकारी यांनी शिक्षेचा निर्णय दिला आहे. मात्र शिक्षा झालेल्या सर्व चारही आरोपींना जामीनही मंजूर करण्यात आला आहे. या सर्वांना जिल्हा न्यायालयात अपील करण्यासाठी एक महिन्याची मुदत देण्यात आली आहे.
महेश बालदी यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात यापूर्वी नोंद असलेल्या मारहाणीच्या प्रकरणांमध्ये IPC कलम 323, 324, 325, 504, 506(2) आणि 34 यांचा उल्लेख आहे. त्यात दुखापत करणे, गंभीर दुखापत, शस्त्राने दुखापत, धमकी आणि सामूहिक हेतूशी संबंधित आरोप आहेत.
महेश बालदी कोण आहेत?
महेश बालदी हे रायगड जिल्ह्यातील उरण विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार आहेत. ते उरण परिसरातील स्थानिक राजकारण, औद्योगिक विकास, सिडको, जेएनपीटी, प्रकल्पग्रस्त आणि स्थानिक नागरिकांच्या प्रश्नांशी संबंधित राजकारणी म्हणून ओळखले जातात. 2019 मध्ये उरणमधून अपक्ष उमेदवार म्हणून ते निवडून आले. निवडणुकीत त्यांना भाजपचा पाठिंबा होता. 2024 मध्ये भाजपकडून उरण विधानसभा निवडणूक लढवली आणि पुन्हा विजयी झाले 95,390 मतांनी ते जिंकले होते.
उरणमधील राजकीय प्रभाव
उरण हा जेएनपीटी बंदर, नवी मुंबई विमानतळ परिसर, औद्योगिक प्रकल्प, जमीन संपादन, स्थानिक रोजगार आणि प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न यामुळे महत्त्वाचा विधानसभा मतदारसंघ आहे. या भागातील राजकारणात महेश बालदी यांचा प्रभाव आहे. 2024 च्या निवडणुकीत त्यांनी प्रीतम म्हात्रे (शेकाप) आणि मनोहर भोईर (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्याशी सामना केला.