दादर नामांतर प्रकरणात मोठा ट्विस्ट! रेल्वे नाही तर मेट्रो स्थानकाचं होणार नामांतर, CMO कडून अधिकृत माहिती
दादर मेट्रो स्थानकाला ‘चैत्यभूमी’ नाव देण्यासाठी विधिमंडळ अधिवेशनात आवश्यक पूर्तता करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे.
दादर नामांतर प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे. राज्य सरकारने दादर रेल्वे स्थानक नाही तर मेट्रो स्थानकाचे नामांतर करणार असल्याचे जाहीर केले आहे. याआधी दादर रेल्वे स्थानकाच्या नामांतराची माहिती समोर आल्यानंतर मनसे, शिवसेनेसह विरोधकांनी टीकेसह विरोध करण्यास सुरुवात केली होती. इतकेच नाही तर महायुतीमधूनही रेल्वे स्थानकाच्या नामांतराला विरोध होऊ लागला होता. यादरम्यान आता राज्य सरकारने दादर मेट्रोचे नामांतर 'चैत्यभूमी' करणार असल्याचे सांगितले आहे.
दादर मेट्रो स्थानकाच्या नामकरणाची प्रक्रिया अधिवेशनात
दादर मेट्रो स्थानकाला चैत्यभूमी नाव देण्याच्या मागणीसंदर्भात राज्य सरकारने यापूर्वीच तत्त्वतः मान्यता देऊन केंद्र सरकारला पत्र पाठवलं आहे. मात्र, या प्रक्रियेसाठी विधानमंडळाच्या समितीबाबत केंद्राकडून मार्गदर्शन प्राप्त झालं आहे. त्यामुळे विधिमंडळाच्या अधिवेशनात आवश्यक प्रक्रिया पूर्ण केली जाईल. त्यानंतर स्थानकाचे नामकरण करण्यात येईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी येथील तयारीचा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत आढावा घेण्यात आला. विधानभवनातील मंत्रिमंडळ सभागृहात आयोजित बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, गृह राज्यमंत्री योगेश कदम, माजी मंत्री संजय बनसोडे, समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे, भाई गिरकर यांच्यासह विविध विभागांचे सचिव, वरिष्ठ पोलीस अधिकारी, रेल्वे, मुंबई महापालिका आणि भारतीय बौद्ध महासभा, अखिल भारतीय बौध्द भिख्खू संघ, आदी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईतील चैत्यभूमी येथे येणाऱ्या अनुयायांसाठी विविध सुविधा, सुरक्षा, वाहतूक, आरोग्य आणि स्वच्छतेच्या व्यवस्थांचे काटेकोर व समन्वित नियोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
इंदू मिल येथील स्मारकाच्या कामासाठी वाढीव निधी कमी पडू देणार नाही
इंदू मिल येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या उर्वरित कामासाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही. स्मारकाचे बहुतांश काम पूर्ण झाले असून, मुख्य पुतळ्याचे काम पूर्ण करण्यासंदर्भात काही बाबी प्रलंबित आहेत. कामाच्या खर्चात वाढ झाली तरी त्याची भरपाई करण्यास शासन तयार असून उर्वरित काम गतीने पूर्ण करण्यासाठी पुढील आठवड्यात स्वतंत्र बैठक घेऊन हा विषय मार्गी लावण्यात येईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.
अनुयायांना सर्व सुविधा देणार – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चैत्यभूमीवर येणाऱ्या लाखो अनुयायांची कोणतीही गैरसोय होऊ दिली जाणार नसल्याची ग्वाही दिली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, महापरिनिर्वाण दिनानिमित्त येणाऱ्या लाखो अनुयायांना सुविधा देण्यासाठी शासन पूर्णपणे तयारी करत आहे. मुंबई महानगरपालिका, पोलीस, सार्वजनिक बांधकाम विभाग, नगर विकास विभाग आणि अन्य संबंधित विभागांनी एकत्रितपणे केलेल्या नियोजनातून दरवर्षी व्यवस्थांमध्ये सुधारणा करण्यात येत आहे. समन्वय समिती व विविध संघटनांकडून प्राप्त होणाऱ्या सूचनांची दखल घेऊन त्यांची अंमलबजावणी करण्यात येईल.
मुंबईतील प्रवेश करताना महामार्गावरील टोल यापूर्वीच बंद करण्यात आला असून, महापरिनिर्वाण दिनासाठी येणाऱ्या वाहनांना टोल सवलत देण्यासंदर्भात सकारात्मक विचार करण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी नमूद केले.