अॅप्लिकेशनवर आधारित प्रवासी वाहतूक सेवेसंदर्भात राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. अॅप आधारित प्रवासी वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि सुव्यवस्थित करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट या प्रकरणामध्ये लक्ष घातलं आहे. यासंदर्भात एक अत्याधुनिक डिजिटल प्लॅटफॉर्म तयार करावा. या एकाच अॅपवर उबर, रॅपिडो, भारत टॅक्सी या अॅग्रीगेटर कंपन्या, तसेच टॅक्सी आदी वाहनांची, चालकांची आणि त्यांच्या कामाचे तास याची अद्ययावत माहिती उपलब्ध असणार आहे. विशेष म्हणजे यावर अॅप एआयचाही वापर केला जाणार असून तसा सल्ला मुख्यमंत्र्यांनीच दिला आहे.
एआयची आवश्यकता
या अॅपला कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित विश्लेषणाची जोड दिली जावी अशा सूचना फडणवीसांनी दिल्या आहेत. वाहनांचे संचालन, चालकांची नियुक्ती, पार्किंगची व्यवस्था आणि प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या सेवांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी यात एआयची आवश्यकता असल्याचं फडणवीस यांनी म्हटलं आहे.
अॅग्रीगेटर क्षेत्राचा आढावा
महाराष्ट्र अॅग्रीगेटर नियमावली संदर्भात झालेल्या बैठकीत फडणवीस यांनी अॅग्रीगेटर क्षेत्राचा आढावा घेतला. यात प्रामुख्याने अॅग्रीगेटर क्षेत्रात वाढती वाहन संख्या, टॅक्सीचालकांच्या समस्या, प्रवाशांची सुरक्षितता आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवरील प्रवास वाटपातील पारदर्शकता या मुद्द्यांचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव संजय सेठी, परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर आदी यावेळी उपस्थित होते.
समान संधी मिळावी
अॅप आधारित प्रवासी वाहतूक सेवांमध्ये स्वतंत्र टॅक्सीचालक आणि मोठ्या फ्लीट कंपन्यांच्या वाहनांना प्रवास वाटप करताना समान संधी मिळते की नाही, याची तपासणी करण्याची आवश्यकता असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. तसेच प्रवासी वाहतूक करणाऱ्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर कोणत्या वाहनाला, कोणत्या कारणाने आणि कोणत्या निकषांवर प्रवासी दिला जातो, याचे परीक्षण करता येणे आवश्यक असल्याचे फडणवीस म्हणाले.
प्रवाशांना होणार फायदा
या प्लॅटफॉर्ममुळे प्रवाशांचा फायदा होणार असून प्रवाशांना वाजवी दरात प्रवास करता येणार आहे. तसेच सर्व टॅक्सी चालकांना समान संधी मिळून पारदर्शक पद्धतीने राइड्सचे वाटप होईल, असं सांगितलं जात आहे. याच माध्यमातून मुंबईत 'मुंबई वन' अॅपच्या माध्यमातूनही टॅक्सी, रिक्षा आणि इतर सेवा बुक करण्याची सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याची योजना आहे. याबद्दलही काम करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या प्लॅटफॉर्मची विशेष गोष्ट म्हणजे यावर नोंदणीकृत सर्व चालकांना पोलीस पडताळणी बंधनकारक असेल, ज्यामुळे प्रवास अधिक सुरक्षित होईल.