अभिनेत्री दिया मिर्झाने दिवाळीच्या पार्श्वभूमीवर दिलेल्या पर्यावरणपूरक संदेशामुळे नवीन वादाला तोंड फुटलं असून या प्रकरणावरुन राजकारण तापलं आहे. असं असतानाच आता ठाकरेंच्या शिवसेनेनं भारतीय जनता पार्टीचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांना या प्रकरणावरुन डिवलं आहे. तसेच भाजपाची सत्ता असलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या व्हिडीओवर मुंबई अध्यक्षांनीच आक्षेप घेण्यामागील कारणाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेनं भाष्य केलं आहे.
नेमका वाद काय?
मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार मुंबईत सणांच्या काळात होणारे वायू आणि ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने एक विशेष जनजागृती मोहीम सुरू केली होती. या मोहिमेसाठी पालिकेने अनेक नामवंत व्यक्तींना सहभागी करुन घेतले. अभिनेत्री माधुरी दीक्षित, क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे आणि अभिनेत्री दिया मिर्झा यांसारख्या प्रसिद्ध सेलिब्रिटींचे व्हिडिओ बीएमसीने तयार केले होते. या व्हिडिओमध्ये दिया मिर्झाने, "पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करा आणि फटाके फोडू नका" असे आवाहन नागरिकांना केले होते. या व्हिडीओवरुन अमित साटम आणि इतर काही नेत्यांनी आक्षेप घेतला. "दिवाळी कशी साजरी करावी हे शिकण्यासाठी आम्हाला दिया मिर्झाची गरज नाही," अशी टीका भाजप नेत्यांकडून करण्यात आली. दिया मिर्झावर 'हिंदूविरोधी' असल्याचा आरोप करण्यात आला आणि केवळ हिंदू सणांच्या वेळीच पर्यावरणाचा पुळका का दाखवला जातो, असा सवाल उपस्थित केला गेला. यानंतर राजकीय दबावामुळे मुंबई महानगरपालिकेने दिया मिर्झाचा तो व्हिडिओ आपल्या अधिकृत अकाउंटवरून डिलीट केला.
ठाकरेंच्या शिवसेनेनं काय म्हटलं?
ठाकरेंच्या शिवसेनेच्या 'शिवसंचार सेना' आणि युवा आघाडीतील नेते अखिल चित्रेंनी दिया मिर्झा प्रकरणावरुन अमित साटम यांना सुनावलं आहे. आधी अखिल चित्रेंनी दिया मिर्झाला मिळालेल्या पुरस्कारांची यादी पोस्ट केली आहे. त्यांनी, "दिया मिर्झा या केवळ अभिनेत्री नाहीत, तर पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक कार्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळखल्या जाणाऱ्या व्यक्तिमत्त्व आहेत. त्यांना मिळालेले महत्त्वाचे सन्मान :
• UNEP Goodwill Ambassador for India
• UN Secretary-General’s Advocate for SDGs
• BBC 100 Women (2023)
• Mother Teresa Memorial Award for Social Justice (2022)
• Champions of Change Award (2021)
• Olive Green Young Crusader of the Year
राष्ट्रीय स्वच्छ भारत अभियानांतर्गत ‘स्वच्छ साथी’ कार्यक्रमाच्या युवा दूत म्हणूनही त्यांनी काम केले आहे. #BeatPlasticPollution, Wildlife Trust of India आणि Sanctuary Nature Foundation यांसारख्या पर्यावरणविषयक उपक्रम व संस्थांशी त्यांचा सक्रिय संबंध राहिला आहे. मुंबई महानगरपालिकेसोबतही त्यांनी विविध जनजागृती मोहिमांमध्ये सहभाग घेतला आहे," असं पोस्टमध्ये म्हटलं आहे.
पुढे बोलताना अखिल चित्रेंनी, "अशा व्यक्तीने मुंबई महापालिकेच्या विनंतीवरून फटाक्यांमुळे होणाऱ्या प्रदूषणाबाबत जनजागृतीचा संदेश दिला, तर त्यात गैर काय? अंधेरीचे आमदार अमित साटम यांचा बीएमसी प्रशासनाशी थेट संबंध नसताना, त्यांच्या आक्षेपानंतर महापालिकेला हा व्हिडीओ का हटवावा लागतो? ते काय सुपर महापौर आहेत?" असा सवाल उपस्थित केला आहे.
तसेच, "एकीकडे स्वतःच्या सामाजिक-राजकीय कार्यक्रमांसाठी सेलिब्रिटींना बोलवायचे आणि दुसरीकडे पर्यावरणाच्या जनजागृतीसाठी पुढे आलेल्या दिया मिर्झांच्या संदेशाला विरोध करायचा! दिया मिर्झा यांनी यांच्या कार्यक्रमांना उपस्थिती लावली नाही म्हणून हा आकस आहे का? की त्यांच्या मर्जीतल्या सेलिब्रिटींनाच महापालिकेने जनजागृतीसाठी निमंत्रित करावे, असा आग्रह आहे? की इतर सेलिब्रिटींनीही अंधेरीच्या Donald Duck स्वभावाच्या भाजपाच्या राजकीय ‘मुकरी’ ला ओळखावा, म्हणून हा सगळा खटाटोप सुरू आहे?" असा खोचक सवाल ठाकरेंच्या शिवसेनेनं केला आहे.
दिया मिर्झा या केवळ अभिनेत्री नाहीत, तर पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक कार्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळखल्या जाणाऱ्या व्यक्तिमत्त्व आहेत. त्यांना मिळालेले महत्त्वाचे सन्मान : • UNEP Goodwill Ambassador for India • UN Secretary-General’s Advocate for SDGs • BBC 100 Women (2023) • Mother Teresa Memorial Award for Social Justice (2022) • Champions of Change Award (2021) • Olive Green Young Crusader of the Year राष्ट्रीय स्वच्छ भारत अभियानांतर्गत ‘स्वच्छ साथी’ कार्यक्रमाच्या युवा दूत म्हणूनही त्यांनी काम केले आहे. #BeatPlasticPollution, Wildlife Trust of India आणि Sanctuary Nature Foundation यांसारख्या पर्यावरणविषयक उपक्रम व संस्थांशी त्यांचा सक्रिय संबंध राहिला आहे. मुंबई महानगरपालिकेसोबतही त्यांनी विविध जनजागृती मोहिमांमध्ये सहभाग घेतला आहे. अशा व्यक्तीने मुंबई महापालिकेच्या विनंतीवरून फटाक्यांमुळे होणाऱ्या प्रदूषणाबाबत जनजागृतीचा संदेश दिला, तर त्यात गैर काय? अंधेरीचे आमदार अमित साटम यांचा BMC प्रशासनाशी थेट संबंध नसताना, त्यांच्या आक्षेपानंतर महापालिकेला हा व्हिडीओ का हटवावा लागतो? ते काय सुपर महापौर आहेत? एकीकडे स्वतःच्या सामाजिक-राजकीय कार्यक्रमांसाठी सेलिब्रिटींना बोलवायचे आणि दुसरीकडे पर्यावरणाच्या जनजागृतीसाठी पुढे आलेल्या दिया मिर्झांच्या संदेशाला विरोध करायचा! दिया मिर्झा यांनी यांच्या कार्यक्रमांना उपस्थिती लावली नाही म्हणून हा आकस आहे का? की त्यांच्या मर्जीतल्या सेलिब्रिटींनाच महापालिकेने जनजागृतीसाठी निमंत्रित करावे, असा आग्रह आहे? की इतर सेलिब्रिटींनीही अंधेरीच्या Donald Duck स्वभावाच्या भाजपाच्या राजकीय ‘मुकरी’ ला ओळखावा, म्हणून हा सगळा खटाटोप सुरू आहे?
— Akhil Chitre अखिल चित्रे (@akhil1485) November 4, 2026
व्हिडीओ पुन्हा अपलोड करण्याचे आदेश
दरम्यान, या वादामध्ये व्हिडीओ हटवण्यात आल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणाची दखल घेतली आहे. न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती डॉ. नीला गोखले यांच्या खंडपीठाने व्हिडीओ हटवल्यावरुन नाराजी व्यक्त केली. "भारत हा एक धर्मनिरपेक्ष देश आहे" आणि कोणत्याही नागरिकाला कोणताही सण साजरा करण्यापासून रोखता येणार नाही, असं न्यायालयाने म्हटलं. पर्यावरण आणि सार्वजनिक आरोग्यासाठी सेलिब्रिटींनी निःस्वार्थपणे पुढाकार घेतला असताना त्याला असा विरोध होणे दुर्दैवी आहे. एक-दोन लोकांच्या वैयक्तिक किंवा राजकीय मतांमुळे अशा चांगल्या मोहिमांवर परिणाम होऊ देऊ नका, असे कोर्टाने या प्रकरणावरुन मत नोंदवताना स्पष्ट केलं आहे. न्यायालयाने केवळ मतच नोंदवले नाही तर, 'नागरिकांचा संविधानावरील आणि प्रशासनावरील विश्वास कायम ठेवण्यासाठी बीएमसीने हटवलेला दिया मिर्झाचा व्हिडिओ तात्काळ पुन्हा सोशल मीडियावर अपलोड करावा', असा स्पष्ट आदेश उच्च न्यायालयाने दिला आहे.