भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या 'पीपल्स एज्युकेशन सोसायटी'च्या मालकीच्या वडाळा येथील सिद्धार्थ वसतिगृहासंदर्भात मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई ऐशीच्या दशकात आंबेडकरी चळवळीचे धगधगते केंद्र म्हणून चर्चेत राहिलेले वडाळा येथील सिद्धार्थ वसतिगृह पुन्हा दिमाखात उभे राहणार आहे. राज्याच्या सामाजिक न्याय विभागाने या वसतिगृहाच्या पुर्नउभारणीसाठी 41 कोटी 21 लाख रुपयाच्या निधीस मंजुरी दिली आहे.
मागील पाच वर्षापासून पाठपुरावा
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या 'पीपल्स एज्युकेशन सोसायटी'च्या या वसतिगृहाची इमारत जीर्ण झाल्याने ती धोकादायक म्हणून जाहीर केल्यानंतर वसतिगृह बंद करण्यात आले होते. या वसतिगृहाची पुर्नबांधणी करण्याच्या मागणीसाठी आंबेडकरी कार्यकत्यांचा मागील पाच वर्षापासून सामाजिक न्याय विभागाकडे पाठपुरावा चालू होता. मात्र 15 कोटींपेक्षा अधिक निधीचा प्रस्ताव असल्याने तो उच्चस्तरीय समितीसमोर प्रलंबीत होता.
शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंतीनिमित्ताने निर्णय
या वसतिगृह उभारणीव्य दिरंगाईबाबत रिपाई कार्यकर्त्यांनी आंदोलने केली. या वसतिगृहात राहून शिक्षण घेतलेले रामदास आठवले हे केंद्रत मंत्री असूनही प्रकल्प मार्गी लागत नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत होती. फडणवीस सरकारच्या काळातील सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांच्या काळातील प्रस्ताव अखेर संजय शिससाट यांच्या कार्यकाळात मंजूर झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंती वर्षाच्या निमित्ताने हा प्रकल्प मंजूर करण्यात आला आहे.
वर्चस्वावरुन दोन गटांमध्ये वाद
दलित साहित्य चळवळ, दलित पँथरची स्थापना, मराठवाडा विद्यापीठ नामांतर चळवळ असे अनेक लढ्यांचे सिद्धार्थ वसतिगृह साक्षीदार आहे. हे वसतिगृह उभे राहत असले तरी त्याचे संचलन करणाऱ्या पीपल्स एज्युकेशनमध्ये आंबेडकर आणि आठवले गटामध्ये वाद सुरू आहेत. दोन्ही गटाकडून संस्थेवर आपलेच वर्चस्व असल्याचे दावे केले जातात.
सिद्धार्थ वसतिगृहाचं ऐतिहासिक महत्त्व
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 8 जुलै 1945 रोजी पीपल्स एज्युकेशन सोसायटी (PES) ची स्थापना केली. दलित आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी देण्यासाठी ही संस्था सुरू करण्यात आली. याअंतर्गत मुंबईत सिद्धार्थ महाविद्यालय आणि इतर शैक्षणिक संस्था उभ्या राहिल्या.वडाळ्यातील सिद्धार्थ विहार वसतीगृह 1964 मध्ये पूर्ण झाले. ग्रामीण भागातून मुंबईत शिकायला येणाऱ्या दलित व मागास विद्यार्थ्यांना स्वस्त निवास मिळावा, या उद्देशाने आंबेडकरांनी याची योजना आखली होती. इमारत ग्राउंड प्लस तीन मजल्यांची होती, सुमारे 145 खोल्या होत्या आणि मध्यभागी आवारासह बुद्ध हॉल होता. आराखडा आंबेडकरांच्या संकल्पनेशी जोडलेला होता. 1970-80 च्या दशकात हे वसतीगृह आंबेडकरी चळवळीचे महत्त्वाचे केंद्र राहिले. दलित पँथरची चर्चा आणि बैठका, दलित साहित्य चळवळ, मराठवाडा विद्यापीठ नामांतर चळवळ अशा अनेक लढ्यांशी याचे नाव जोडले जाते. नामदेव ढसाळ यांच्यासह अनेक कार्यकर्ते येथे राहिले किंवा येथे एकत्र आले. रूम 105 हे दलित पँथरच्या बैठकांचे ठिकाण म्हणून ओळखले जात असे. रामदास आठवले यांनीही येथे राहून राजकीय कारकीर्द सुरू केली. 2014 मध्ये नामदेव ढसाळ यांच्या निधनानंतर त्यांच्या पार्थिवावर येथील आवारात श्रद्धांजली अर्पण करण्यात आली होती.