आधी यूपीएससी आणि मग केबीसीचही स्वप्न भंगलं, मुंबईत चोर कसा बनला इसम? धक्कादायक कहाणी समोर
UPSC परीक्षेत अपयश, केबीसीमध्ये हॉट सीटपर्यंत पोहोचण्याचे स्वप्न अपूर्ण आणि ट्रॅव्हल व्यवसायात नुकसान. मुंबईतील 5 लाखांची सोनसाखळी चोरल्याप्रकरणी 42 वर्षीय आरोपीला दिल्लीमधून अटक करण्यात आली.
मुंबईतील कांदिवली परिसरात सुमारे पाच लाख रुपये किमतीची सोनसाखळी चोरल्याप्रकरणी पोलिसांनी एका 42 वर्षीय व्यक्तीला दिल्लीमधून अटक केली आहे. सतीश कुमार कृष्णप्रसाद केसरी असे आरोपीचे नाव असून तो मूळचा बिहारचा रहिवासी आहे. विशेष म्हणजे, सतीश हा कॉम्प्युटर सायन्समधील पदवीधर आहे. त्याचे आयएएस अधिकारी होण्याचे स्वप्न होते. त्यासाठी तो दिल्लीला राहून यूपीएससी परीक्षेची तयारी करत होता. मात्र अनेक प्रयत्नांनंतरही त्याला यश मिळाले नाही. त्यानंतर त्याने लोकप्रिय टीव्ही शो ‘कौन बनेगा करोडपती’च्या आठव्या सीझनमध्येही नशीब आजमावले. मात्र फास्टेस्ट फिंगर फर्स्ट फेरीच्या पुढे त्याला जाता आले नाही. पुढे या इसमाचं काय झालं? सविस्तर जाणून घेऊया.
पत्नीसोबत सुरू केला ट्रॅव्हल व्यवसाय
यूपीएससी आणि केबीसीमधून अपेक्षित यश न मिळाल्यानंतर सतीशने पत्नीसोबत टूर अँड ट्रॅव्हल व्यवसाय सुरू केला. या व्यवसायासाठी त्याने कर्ज काढून चार ते पाच गाड्या खरेदी केल्या. या गाड्या ओला आणि उबरसारख्या कॅब प्लॅटफॉर्मवर चालवण्यासाठी देण्यात आल्या. सुरुवातीला व्यवसायातून उत्पन्न मिळण्याची अपेक्षा होती. मात् व्यवसायात नुकसान होऊ लागले आणि कर्जाचा भार वाढत गेला. आर्थिक अडचणींमुळे त्याच्यावर कर्ज फेडण्याचा दबाव निर्माण झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
ग्राहक बनून ज्वेलर्सच्या दुकानात चोरी
कर्ज फेडण्यासाठी सतीशने कथितपणे दागिन्यांच्या दुकानांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली. ग्राहक असल्याचे भासवून दुकानात जायचे, दागिने पाहण्याच्या बहाण्याने ते हातात घ्यायचे आणि संधी मिळताच पळ काढायचा, अशी त्याची पद्धत असल्याचे तपासात समोर आले आहे. वेगवेगळ्या शहरांतील ज्वेलर्सच्या दुकानांमध्ये अशाच प्रकारे चोरी करण्याची योजना त्याने आखल्याचा पोलिसांचा संशय आहे.
पाच लाखांची सोनसाखळी लंपास
15 नोव्हेंबर 2025 रोजी सतीशने कांदिवली पश्चिम येथील मथुरादास रोडवरील पद्मावती ज्वेलर्समध्ये ग्राहक बनून प्रवेश केला. त्याने दुकानातील कर्मचाऱ्यांकडे 43.2 ग्रॅम वजनाची सोनसाखळी पाहण्यासाठी मागितली. तिची किंमत सुमारे पाच लाख रुपये होती. दागिना हातात घेतल्यानंतर संधी साधून तो दुकानातून पसार झाला. या प्रकरणी कांदिवली पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. आरोपीने ओळख लपवण्यासाठी मुंबईतील वसतिगृहात कथितरीत्या बनावट आधारकार्डची माहिती दिली होती. त्याने मोबाइलही बंद ठेवला होता.
वर्षभर पोलिसांना गुंगारा
चोरीनंतर आरोपी जवळपास वर्षभर पोलिसांच्या हाती लागला नव्हता. मात्र, कांदिवली पोलिसांनी दुकानातील आणि परिसरातील शेकडो सीसीटीव्ही फुटेज तपासले. तांत्रिक तपासातून त्याच्याशी संबंधित सक्रिय मोबाइल क्रमांकाचा माग काढण्यात आला. त्यानंतर पोलिसांचे पथक दिल्लीतील उत्तम नगर परिसरात पोहोचले आणि 28 ऑक्टोबर 2026 रोजी सतीशला अटक केली. त्याच्याकडून चोरीची सोनसाखळीही जप्त करण्यात आली. चौकशीदरम्यान त्याने डिंडोशी परिसरातील आणखी एका दागिने चोरीच्या प्रकरणाची माहिती दिल्याचे पोलिसांनी सांगितले. सध्या आरोपी पोलीस कोठडीत असून पुढील तपास सुरू आहे.