SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

टायगर श्रॉफवरील हल्ल्यासाठी 'डेड लेटर बॉक्स' पद्धत वापरली; ही पद्धत आहे तरी काय? यात काय केलं जातं?

अभिनेता टायगर श्रॉफवर करण्यात आलेल्या हल्ल्याची तयारी मागील काही काळापासून सुरु होती. सर्व हल्लेखोरांपर्यंत हल्ल्यात वापरण्यात आलेली शस्रं 'डेड लेटर बॉक्स' पद्धतीने पोहोचली. ही पद्धत नेमकी आहे तरी काय? जाणून घ्या सविस्तर माहिती...

Reported By Swapnil Ghangale Written By Swapnil Ghangale
Published: Oct 21, 2026, 01:30 PM IST | Updated: Oct 21, 2026, 02:01 PM IST
Image Credit: 'डेड लेटर बॉक्स' पद्धतीने हत्यारं मुंबईत आली
Join

अभिनेता टायगर श्रॉफवर 18 ऑक्टोबर रोजी झालेल्या गोळीबार प्रकरणामध्ये हादरवणारी माहिती समोर आली आहे. मुख्य हल्लेखोरांसोबतच आता या प्रकरणात हत्यार पुरवणाऱ्या चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून यामध्ये दोन महिलांचाही समावेश आहे. या हल्ल्यासाठीची हत्यारं 'डेड लेटर बॉक्स' पद्धतीने हल्लेखोरांपर्यंत पोहचवण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. मात्र या प्रकरणामुळे चर्चेत आलेली 'डेड लेटर बॉक्स' पद्धत आहे तरी काय जाणून घेऊयात...

हल्ल्यात वापरलेल्या बंदुकीचा प्रवास मुंबईपर्यंत कसा झाला?

अमृतसरमध्ये अज्ञात व्यक्तीने ठेवलेली शस्त्रे घेण्यासाठी कुणाल आणि सुमित  हे दोन आठवड्यांपूर्वी गेले होते. दिल्ली पोलिसांनी याप्रकरणात या चौघांबरोबरच अन्य दोन महिलांना अटक केली आहे. बिश्नोई गँगचा हस्तक असलेल्या अनिल पंडितने दोघांना शस्त्रे ठेवलेल्या नेमक्या जागेची लोकेशन पाठवली होती. शस्त्रांची मुंबईत वाहतूक करण्यासाठी कुणालने राधा आणि बबिता या दोन महिलांचा वापर केल्याची माहिती समोर आली आहे. दिल्ली पोलिसांनी या दोघींनाही अटक केली आहे. या कामासाठी अनिल पंडितने कुणाल आणि सुमितला 70 ते 80 हजार रुपये दिल्याचा संशय आहे. आरोपींनी राधा आणि बबिताला  10 ते 12 हजार रुपये दिल्याची माहिती तपासातून समोर आली आहे. जुलैमध्ये सोनीपत कारागृहातून बाहेर आलेल्या कुणालचा मित्रामार्फत अनिल पंडितशी संपर्क झाला होता. त्यानंतर एन्क्रिप्टेड अॅपद्वारे संपर्क सुरू होता, राधा आणि बबिता सोनीपतच्या कारखान्यात काम करत असल्याची माहिती तपासातून समोर आली आहे. हल्ल्यासाठी वापरण्यात आलेली दोन्ही शस्रे ही डेड लेटर बॉक्स पद्धतीने मुंबईत आणली गेली. 

मुंबईतील दादर कनेक्शन

अनिल पंडितच्या सांगण्यावरून कुणाल अमृतसरहून एक पिस्तूल आणि 20 काडतुसे घेऊन आला होता. सुमारे दोन महिन्यांपूर्वी कुणालची राधाशी भेट झाली. त्यानंतर त्याने राधाला शस्त्र घेऊन मुंबईला जाण्यास तयार केले. 15 ऑक्टोबर रोजी कुणाल राधा आणि बबिताला घेऊन नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर पोहोचला. पिस्तूल राधाच्या बॅगेत ठेवण्यात आले होते. प्रवासादरम्यान कुणाल एन्क्रिप्टेड ॲपच्या माध्यमातून अनिल पंडितचे निर्देश दोन्ही महिलांपर्यंत पोहोचवत होता. 17 ऑक्टोबर रोजी राधा आणि बबिता मुंबईतील दादर येथे पोहोचल्या. त्यानंतर त्या एका हॉटेलमध्ये थांबल्या. त्याच दिवशी सकाळी सुमारे 11 वाजता एका अल्पवयीन मुलाने हॉटेलजवळ राधाकडून बॅग घेतली. 

18 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी सुमारे सात वाजता टायगर श्रॉफच्या कारवर गोळीबार झाला. गोळीबारानंतर अनिल पंडितने कुणालला फोन केला. शूटर मुंबईत अडकले असून त्यांच्या पळून जाण्याची व्यवस्था करण्यास सांगितल्याची माहिती तपासात समोर आली आहे. याच दिवशी राधा आणि बबिता दादरहून हरिद्वार एक्स्प्रेसने दिल्लीला रवाना झाल्या. 20 ऑक्टोबर रोजी राधा आणि बबिता यांना नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरून ताब्यात घेण्यात आले. तर कुणाल आणि सुमित यांना हरियाणातील सोनीपत येथून ताब्यात घेण्यात आले.

'डेड लेटर बॉक्स' पद्धत काय आहे?

'डेड लेटर बॉक्स' पद्धतीला 'डेड ड्रॉप' असंही म्हणतात. ही हेरगिरीची तसेच गुन्हेगारी जगतात माहिती किंवा वस्तू एकमेकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वापरली जाणारी एक अत्यंत गुप्त पद्धत आहे. या पद्धतीमध्ये गुन्हेगारांच्या दृष्टीने सर्वात मोठी जमेची बाजू म्हणजे माहिती अथवा वस्तूची देवाण-घेवाण करताना दोन व्यक्तींना एकमेकांना प्रत्यक्ष भेटण्याची किंवा एकमेकांशी बोलण्याची गरज लागत नाही. या पद्धतीमध्ये दोन्ही बाजूकडील व्यक्तींच्या सहमतीने आधीच देवाण-घेवाणीसाठी एक गुप्त जागा ठरवलेली असते. ही जागा एखाद्या चौकातील दुकान, झाड किंवा खांब अशी सार्वजनिक ठिकाणावरील असू शकते. पहिली व्यक्ती ठरलेल्या ठराविक गुप्त ठिकाणी जाऊन वस्तू लपवून ठेवते. या प्रकरणामध्ये ही वस्तू म्हणजे बंदुका होत्या. निश्चित केलेल्या ठिकाणी वस्तू ठेवल्यानंतर वस्तू ठेवणारी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला विशिष्ट पद्धतीने संकेत देते. जुन्या काळात यासाठी खुणांचा वापर केला जायचा. आजच्या आधुनिक काळात यासाठी एन्क्रिप्टेड मेसेजिंग ॲप्स वापरून लोकेशन किंवा कोड पाठवला जातो. टायगरच्या प्रकरणामध्येही याच एन्क्रिप्टेड मेसेजिंग ॲप्सचा वापर करण्यात आला. संकेत मिळताच दुसरी व्यक्ती ठरलेल्या गुप्त जागी जाते आणि कोणालाही संशय न येऊ देता ती वस्तू तिथून काढून घेते. या प्रकरणात हल्लेखोरांनी अशाच प्रकारे शस्तं ताब्यात घेतली.

या पद्धतीमधील सर्वात खास बाब म्हणजे वस्तू ठेवणारी आणि ती उचलणारी व्यक्ती एकमेकांना कधीच प्रत्यक्ष भेटत नाही. त्यामुळे गंभीर गुन्ह्यांमध्ये एक जण पकडला गेला, तरी दुसऱ्याची माहिती पोलिसांना मिळणे कठीण होते. कारण समोरच्या व्यक्ती एकमेकांना भेटल्याच नसल्याने साखळीतील पुढील आरोपी कसा दिसतो, काय करतो वगैरे काही कल्पनाच नसते. 
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

मोजक्या शब्दांमध्ये...स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.पत्रकारितेचा श्रीगणेशास्वप्निल यांनी पत्रकारितेच्या दुसऱ्या वर्षापासूनच 'ठाणे वैभव' या ठाण्यातील स्थानिक वृत्तपत्रामध्ये शिकाऊ पत्रकार म्हणून कामाला सुरुवात केली. सांस्कृतिक आणि गुन्हेगारी यासंदर्भातील वृत्तांकन यांनी या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये केलं. बीएमएमच्या तृतीय वर्षाला ठाण्यातील जोशी-बेडेकर महाविद्यालयातील 'ऋत' या पत्रकारिता विभागाच्या महाविद्यालयीन वृत्तपत्रासाठी स्वप्निल यांनी उपसंपादक म्हणून काम पाहिले.डिजिटलमध्ये एन्ट्री'महाराष्ट्र टाइम्स डॉट कॉम'च्या माध्यमातून पहिल्यांदा डिजिटल क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या स्वप्निल यांनी सुरुवातीला सोशल मिडिया व्यवस्थापक म्हणून काम पाहिले. त्यानंतर हळूहळू ते डिजिटल वृत्तांकनाकडे वळले. त्यांनी 'महाराष्ट्र टाइम्स' वृत्तपत्रामध्येही माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लेखन केलं. मुख्य पुरवणीसोबतच अनेकदा रविवार विशेष अंकांमध्येही त्यांचे लेख छापून आले आहेत. 'मुंबई टाइम्स' या पुरवणीअंतर्गत विद्यार्थ्यांच्या विश्वातील अनेक विषय त्यांनी कॉलेज क्लब रिपोर्ट्सच्या माध्यमातून हाताळले. कॉलेज क्लब रिपोर्टर्ससोबतच्या कामासोबतच त्यांनी 'मटा सन्मान', 'मटा श्रावण क्विन' यासारख्या कार्यक्रमांसाठी डिजिटल आणि प्रिंटदरम्यान संयोजक म्हणून काम पाहिलं. जवळपास पाच वर्ष ते मटामध्ये कार्यरत होते.प्रगल्भतेची आसमहाराष्ट्र टाइम्सनंतर तितक्याच तोलामोलाच्या 'लोकसत्ता'मध्ये स्वप्निल यांनी काम केलं. या ठिकाणीही ते पाच वर्ष कार्यरत होते. 'मटा'पासून सुरु झालेल्या प्रवासाला 'लोकसत्ता'मध्ये प्रगल्भता लाभली. राजकीय बातम्या, ताज्या घडामोडी, ट्रेडींग बातम्या याबरोबरच त्यांनी डिजिटल आणि प्रिंटमधील समन्वयाचं (इंटीग्रेशन) कामही त्यांनी लोकसत्तामध्ये केलं. 'लोकसत्ता'मधील 'व्हिवा' या पुरवणीमध्ये तरुणाईसंदर्भातील विषयांवर त्यांनी लेखन केलं. तसेच 'लोकप्रभा'च्या माध्यमातून त्यांनी माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लिखाण केलं. लोकसत्ता डॉट कॉममध्ये स्वप्निल यांनी चार ते पाच सेक्शनसची जबाबदारी पार पाडली.तो सध्या काय करतो?'लोकसत्ता'नंतर स्वप्निल यांनी पहिल्यांदाच टीव्हीशी संलग्न वेबसाईटसाठी म्हणजेच 'झी 24 तास'च्या वेबसाईटसाठी काम करण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी ते ताज्या घडामोडींबरोबरच, राजकीय बातम्या, ब्रेकिंग बातम्या, ट्रेडिंग बातम्या हाताळतात. बातमीमधील अचूक माहिती, व्याकरण, उत्तम मथळे यासारख्या गोष्टींकडे त्यांचं कटाक्षाने लक्ष असतं. लिखाणबरोबरच मॅरेथॉन पळणं, वेगवेगळ्या ठिकाणी खादडीसाठी जाणं, पुस्तकांसोबतच अवांतर वाचन यासारख्या गोष्टींना ते प्राधान्य देतात.

ZEENEWS TRENDING STORIES