Explainer: शरद पवारांनी घेतलेले 5 सर्वात मोठे राजकीय निर्णय, राजकारण झटक्यात फिरले, संजय राऊत उगाच नाही म्हणाले पवारांना समजून घ्यायला 100 जन्म लागतील
शरद पवारांनी घेतलेले 5 मोठे राजकीय निर्णय. शरद पवारांच्या निर्णयामुळे बडे बडे नेतेच नाही जनताही अचंबित झाली. संजय राऊतही म्हणाले होते पवारांना समजून घ्यायला शंभर जन्म लागतील.
शरद पवार : शरद पवारांच्या एका निर्णयामुळे गल्लीपासून दिल्लीपर्यंत राजकारण पेटले आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीने डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा जाहीर करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. पवारांचं राजकारण समजून घेण्यासाठी त्यांचे सत्तेचे प्रयोग समजून घ्यायला हवेत. यामुळेच तर संजय राऊतही म्हणाले होते पवारांना समजून घ्यायला शंभर जन्म लागतील. जाणून घेऊया शरद पवारांनी घेतलेले 5 मोठे राजकीय निर्णय ज्यामुळे संपूर्ण देश अचंबित झाला.
40 आमदार फोडून शरद पवार सरकारमधून बाहेर पडले
आणीबाणीनंतर देशात काँग्रेस पक्षात फुट पडली. त्यावेळी पवार यशवंतराव चव्हाणांच्या रेड्डी काँग्रेसमध्ये गेले. 1978 च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात त्रिशंकू परिस्थिती होती. सर्वाधिक जागा मिळालेल्या जनता पक्षाला सरकार स्थापनेपासून रोखण्यासाठी दोन्ही काँग्रेस पुन्हा एकत्र आल्या आणि वसंतदादा पाटील मुख्यमंत्री झाले. पवार या सरकारमध्ये उद्योगमंत्री होते. दोन्ही काँग्रेसचं एकमेकांशी जमेना, सरकार चालवणं अवघड झालं, तेव्हा पवार 40 आमदार फोडून सरकारमधून बाहेर पडले. महाराष्ट्राला धक्का देणारं हे पवारांचं सगळ्यात मोठं आणि पहिलं बंड.
पवारांनी समाजवादी काँग्रेसची स्थापना केली
40 आमदारांसह पवारांनी समाजवादी काँग्रेसची स्थापना केली. समाजवादी काँग्रेस, जनता पक्ष. शेकाप, मुस्लिम लीग, प्रजा समाजवादी पक्ष आणि कम्युनिस्ट पक्षाचं सरकार आलं. त्याचंच नाव पुलोद. पवार अवघ्या ३८ व्या वर्षी महाराष्ट्राचे सर्वात तरुण मुख्यमंत्री झाले. 1980 मध्ये इंदिरा गांधी पुन्हा सत्तेत आल्या आणि पुलोदचं सरकार बरखास्त झालं. पण पवारांनी त्यांची राज्यातली ताकद कायम ठेवली. वाऱ्याची दिशा ओळखून पवारांनी 1987 मध्ये पुन्हा इंदिरा काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पुढे मुख्यमंत्रीही झाले. पवार तब्बल चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले.
काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या पवारांनी पंतप्रधानपदासाठी पुन्हा काँग्रेसशी जुळवून घेतलं
15 मे 1999 याच दिवशी पवारांनी काँग्रेसमधून पुन्हा काडीमोड घेतला. कारण होतं सोनिया गांधींच्या विदेशी मूळाचं. अस्थिर देश आणि अस्थिर काँग्रेसमुळे पवारांना पंतप्रधानपद खुणावत होतं. पण सोनियांची जादू चालली आणि पंतप्रधानपदान पवारांनां हुलकावणी दिली. पण पुढच्या तीन महिन्यांतच राज्यात निवडणुका झाल्या. काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या पवारांनी अवघ्या तीन महिन्यांत काँग्रेसशी जुळवून घेतलं आणि राज्यात आघाडीचं सरकार आलं.
उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री बनवण्यास मान्यता
नोव्हेंबर 2019 मध्ये महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप झाला. ज्यामुळे संपूर्ण देशाला धक्का बसला. विधानसभा निवडणुकांनंतर भाजप आणि शिवसेना यांच्यात मुख्यमंत्रीपदावरून वाद निर्माण झाला. यानंतर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी सरकार स्थापन करण्यासाठी हालचाली सुरू केल्या. 22 नोव्हेंबरच्या संध्याकाळी शरद पवारांनी उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री म्हणून नियुक्त करण्यावर एकमत झाल्याची घोषणा केली.
उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणाऱ्या अजित पवारांचा निर्णय फेटाळला
पण 23 नोव्हेंबरच्या सकाळी, देवेंद्र फडणवीस यांनी अचानक मुख्यमंत्री आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या पाठिंब्याचा दावा केला होता. या घडामोडीने विरोधी आघाडीला मोठा धक्का बसला. मात्र, शरद पवार यांनी अजित यांच्या या निर्णयाला पक्षाचा निर्णय म्हटले नाही.
शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचे महाविकास आघाडी सरकारची स्थापना
सर्वोच्च न्यायालयाने विधानसभेत बहुमत चाचणी घेण्याचे आदेश दिले. यानंतर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. 26 नोव्हेंबर रोजी फडणवीस सरकार कोसळले. हे सरकार केवळ तीन दिवसच टिकले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचे महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले.
2019 भर पावसात भाषण
18 ऑक्टोबर 2019 रोजी साताऱ्यातील एका निवडणूक सभेत शरद पवार यांनी मुसळधार पावसात भाषण केले. शरद पवारांचा पावसातील सभेचा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला. 21 ऑक्टोबरच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने 24 जागा जिंकल्या, तर 2014 मध्ये हा आकडा 41 होता. सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे श्रीनिवास पाटील यांनी भाजपचे उदयनराजे भोसले यांचा 87,717 मतांनी पराभव केला.
2023 मध्ये पवारांनी आणखी एक असा निर्णय घेतला ज्यामुळे विरोधी पक्षांमध्ये खळबळ उडाली
मार्च 2023 मध्ये, पवारांनी आणखी एक असा निर्णय घेतला ज्यामुळे विरोधी पक्षांमध्ये खळबळ उडाली. पक्षाने नागालँडमधील भाजप आणि राष्ट्रवादी लोकशाही पुरोगामी पक्षाच्या (एनडीपीपी) सरकारला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. नागालँड विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने सात आमदार जिंकले होते. पवारांनी सांगितले की, मुख्यमंत्री नेफियू रिओ यांच्यासोबत पक्षाचा पूर्वनियोजित करार झाला होता आणि त्यांचा पाठिंबा भाजपला नसून एनडीपीपीला होता. तथापि, भाजपदेखील सरकारचा एक भाग होता.
2023 राजीनाम्याची घोषणा
जवळपास दोन महिन्यांनंतर, 2 मे 2023 रोजी, पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा जाहीर केला. त्यांनी ही घोषणा त्यांच्या 'लोक माझे संगती' या आत्मचरित्राच्या प्रकाशनप्रसंगी केली. त्यांच्या या निर्णयामुळे पक्षात खळबळ उडाली आणि नेते व कार्यकर्त्यांनी विरोध दर्शवला. त्यानंतर, 5 मे रोजी पक्षाच्या 18 सदस्यीय समितीने त्यांचा राजीनामा फेटाळला आणि पवारांनी आपला निर्णय मागे घेतला.
मतदारसंघ पुनर्रचनेला पाठिंबा दिल्याने पवार पुन्हा चर्चेत
आता, परिसीमन विधेयकावर केंद्र सरकारला पाठिंबा देण्याच्या पवारांच्या दाव्यामुळे त्यांच्या राजकीय रणनीतीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. काँग्रेसचे म्हणणे आहे की, त्यांनी राज्यसभा निवडणुकीत पवारांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला होता, परंतु त्यांच्या पक्षाचा हा निर्णय आता विरोधी पक्षांच्या एकजुटीच्या विरोधात आहे. तथापि, पवारांच्या पूर्वीच्या निर्णयांवरून आघाड्या बदलणे, वेगवेगळ्या पक्षांसोबत काम करणे आणि बदलत्या परिस्थितीनुसार रणनीती जुळवून घेण्याचा त्यांचा इतिहास दिसून येतो. यामुळेच त्यांच्या निर्णयांनी अनेकदा मित्रपक्ष आणि विरोधक दोघांनाही आश्चर्यचकित केले आहे.