मुंबईत माहिममध्ये गोळीबार! शोभा हॉटेलजवळील पी.सी.जैन ज्वेलर्सवर 5 ते 6 गोळ्या झाडल्या
मुंबईतील माहिममध्ये गोळीबार झाला आहे. पी.सी.जैन ज्वेलर्सवर पाच ते सहा गोळ्या झाडण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
मुंबईतील माहिममध्ये गोळीबार झाला आहे. शोभा हॉटेलच्या शेजारी असलेल्या पी.सी.जैन ज्वेलर्सवर पाच ते सहा गोळ्या झाडण्यात आल्याची माहिती मिळत आहे. गोळीबार करणारे दुचाकीवरुन आले होते. संध्याकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास हा गोळीबार करण्यात आला. गोळीबाराची माहिती मिळाल्यानंतर माहीम पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. दरम्यान हा गोळीबार कोणी केली आणि यामागील कारण काय हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, हेल्मेट घातलेले दोन अज्ञात इसम दुचाकीवरून घटनास्थळी आले. त्यांनी दुकानाजवळ दुचाकी थांबवून खाली उतरत थेट दुकानाबाहेरील फुटपाथवरून दोन राऊंड फायर केले. सुदैवाने या गोळीबारात कोणीही जखमी झालेलं नाही. पोलीस सीसीटीव्हीच्या आधारे त्यांचा शोध घेत आहेत.
माहीम हा वर्दळीचा पसिसर असून येथे नेहमीच लोकांची गर्दी असते. या परिसरात काही प्रसिद्ध हॉटेल्स असल्याने संध्याकाळी खवय्यांची गर्दी असते. तसंच वांद्रेहून दादर, परळच्या दिशेने जाताना याच रस्त्याचा वापर केला जात असल्याने येथे वाहनंही मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे अशा ठिकाणी गोळीबार होणं सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर असून, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणारं आहे.
समाधान सरवणकरांची पोलिसांवर टीका
"याआधाही माहिममधून एका दहशतवाद्याला अटक करण्यात आली होती. त्यामुळे पोलिसांनी गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. माहिममध्ये दर्ग्याच्या मागे अनेक ड्रग्ज पेडलर्स असतात. तिते सुळसुळाट सुरु असून पोलिसांचं अजिबात लक्ष नाही. नागरिक वारंवार तक्रार असताना कोणतीही कारवाई होत नाही," असा आरोप शिवसेनेचे माजी नगरसेवक समाधान सरवणकर यांनी केला आहे.
'गृहमंत्र्यांचं मुंबई, पुणे, महाराष्ट्राकडे लक्ष आहे का?'
गृहमंत्र्यांचं मुंबई, पुणे, महाराष्ट्राकडे लक्ष आहे का? की फक्त सत्ता कशी टिकवता येईल याकडे लक्ष आहे? ते काय करत आहेत? सतत पोलिसांनाच दोष द्यायचा का? त्यांच्यावर त्यांच्या कामाचा ताण आहे की इतर काही ताण दिला आहे? अशी विचारणा मनसे नेते अविनाश अभ्यंकर यांनी विचारली आहे.
पुण्याला शिवाजीनगरमध्ये आज खून झाला. नाशिक, मुंबईत ड्रग्जचं ट्रॅफिकिंग आहे. ही महाराष्ट्राची संस्कृती आहे का? महाराष्ट्र कोणत्या दिशेने चालला आहे? आता तरी गृहमंत्र्यांनी जातीनं लक्ष दिलं पाहिजे. लोकांना शांततेत राहता आलं पाहिजे. कायद्याचा धाक निर्माण केला पाहिजे. माहिममसारख्या गजबजलेल्या ठिकाणी 7.30 वाजता गोळीबार होतो आणि आपण नुसत्या बातम्या पाहायच्या? आता हे बोलूनही कंटाळा आला आहे असा संताप त्यांनी व्यक्त केला आहे.