सोन्यातही भेसळ... वजन वाढवण्यासाठी मिसळतात 'रेनियम पावडर', मशिन्सही ओळखता येत नाही शुद्ध सोनं; चीन कनेक्शन समोर
अशाप्रकारे सोन्यामध्ये भेसळ होत असल्याचं अनेकांना ठाऊकच नाही. विशेष म्हणजे सोन्याची शुद्धात तपासण्याच्या मशीनलाही ही भेसळ ओळखता येत नाहीये. नेमकं हे प्रकरण काय जाणून घ्या...
आतापर्यंत तुम्ही दुधाची, अन्न पदार्थांची भेसळ ऐकली असेल मात्र आता चक्क सोन्यामध्येही भेसळ होत असल्याची माहिती समोर आली आहे. अर्थात हॉलमार्क असलेलं सोनं अस्सल असतं असं मानलं जातं. मात्र प्रत्यक्षात त्यातही भेसळ असते. सोन्यात कशापद्धतीने भेसळ होते, भेसळ केलेलं हे सोनं ओळखता का येत नाही? हे आणि यासंदर्भातील गोष्टी जाणून घेऊयात...
भेसळ ओळखण्यात मशीन असमर्थ
राज्यात सोन्यातील भेसळीचा एक प्रकार समोर आला आहे. आता सोन्यात चिनी रेनियम पावडर मिसळली जात आहे. सोन्याच्या शुद्धतेवर विश्वास ठेवून दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी ही बातमी धक्कादायक आहे. ही भेसळ होऊनही काही सोनं तपासणारी यंत्रे भेसळ ओळखण्यात अयशस्वी ठरत आहेत. ही यंत्रं रेनियम पावडर मिसळलेल्या सोन्याला शुद्ध सोनं म्हणून घोषित करत आहेत. त्यामुळे गोंधळ वाढला आहे. या नव्या गोंधळामुळे आता सोन्याचे दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी ते खरेदी करत असलेल्या सोन्याची शुद्धता निश्चितपणे तपासून घेणं कठीण झालं आहे.
सोन्याचे वजन वाढवण्यासाठी आता जड धातूंच्या पावडरचा वापर केला जात आहे. सध्या सोन्यात मिसळल्या जाणाऱ्या धातूच्या पावडरला रेनियम पावडर म्हणतात. सोन्याचे वजन वाढवण्यासाठी त्यात रेनियम पावडर टाकली जात असल्याची प्रकरणं समोर आल्याचं सीएनबीसीच्या वृत्तात नमूद केलं आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, रेनियम पावडरने बनवलेले सोन्याचे दागिने अनेक शुद्धता चाचण्यांमध्ये उत्तीर्ण होतात.
रेनियम पावडरसंदर्भातील तपासात एक चिनी व्यक्तीशी असलेलं कनेक्शनही उघड झालं. या व्यक्तीला संपर्क साधल्यावर, ती व्यक्ती चीनमधील शेन्झेन येथील एका एजंट असल्याचं स्पष्ट झालं असून या एजंटने दावा केला की, त्याची कंपनी रेनियम पावडर तयार करते आणि भारतातील अनेक शहरांमध्ये त्याचे डीलर्स आहेत. या चिनी एजंटने असाही दावा केला की, या पावडरपैकी 25% पर्यंत सोन्यात मिसळता येते आणि सोनं शुद्धतेच्या चाचणी पद्धतींद्वारे ते लक्षातही येणार नाही.
रेनियम पावडर सोन्यात कशी मिसळली जाते?
अहवालानुसार, चिनी एजंटशी संपर्क साधल्यानंतर, मुंबईतील एका डीलरमार्फत रेनियमचा एक ग्रॅमचा नमुना मिळवण्यात आला. त्यानंतर जोधपूरमधील एका सराफाच्या सहकार्याने या नमुन्यावर एक प्रयोग करण्यात आला. तपासानुसार, 7.83 ग्रॅम 24-कॅरेट सोन्यामध्ये एक ग्रॅम रेनियम पावडर मिसळण्यात आली, ज्यामुळे त्याचे एकूण वजन ८.८३ ग्रॅम झाले. चाचणीदरम्यान, भेसळयुक्त तुकडा २४-कॅरेट सोन्याचा असल्याचे स्पष्ट झाले आहे.
त्यानंतर त्या सराफाने 22-कॅरेटचा तुकडा तयार करण्यासाठी त्या तुकड्यात आणखी एक धातू मिसळला. जरी त्या दागिन्याला हॉलमार्किंग केंद्रावर 22-कॅरेट सोन्याचे प्रमाणपत्र मिळाले. अहवालात म्हटले आहे की त्यातील सोन्याचे प्रमाण केवळ 8.73% होते, जे अंदाजे 20-कॅरेट शुद्धतेच्या बरोबरीचे आहे. अशा भेसळयुक्त दागिन्याची अनेक शोरूम आणि चाचणी केंद्रांवर तपासणी करण्यात आली. हे निकाल केवळ चाचणीसाठी वापरलेल्या नमुन्याशी संबंधित आहेत. याचा अर्थ असा नाही की सर्व हॉलमार्किंग केंद्रे किंवा चाचणी यंत्रे रेनियम शोधू शकत नाहीत.
सोन्यात भेसळ करण्यास कोणी सुरुवात केली?
'मिंट'च्या अहवालानुसार, इंदूरमधील दागिन्यांच्या व्यापाऱ्यांनी सोन्यामध्ये रुथेनियम, इरिडियम आणि ऑस्मियम यांसारख्या जड धातूंच्या वापराबाबत चिंता व्यक्त केली आहे. शहरातील सराफा बाजारातील सराफांचे म्हणणे आहे की सोन्याचे वजन वाढवण्यासाठी हे धातू त्यात मिसळले जात आहेत. हे धातू सोन्यापेक्षा अधिक घन असल्यामुळे, पारंपरिक ॲसिड आणि टचस्टोन चाचण्यांद्वारे भेसळयुक्त वस्तू शोधणे कठीण होते. व्यापाऱ्यांनी 'सोन्याची पावडर' नावाच्या एका पदार्थाबद्दलही चिंता व्यक्त केली आहे, जो महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमार्गे भारतीय बाजारपेठेत प्रवेश करत असल्याचे वृत्त आहे. अहवालात असेही म्हटले आहे की, ही पावडर चीनमध्ये तयार होत असल्याचा संशय असला तरी, तिच्या स्रोताची स्वतंत्रपणे पुष्टी झालेली नाही.
सोन्याच्या हॉलमार्किंगबद्दल सीएजीचा लेखापरीक्षण अहवाल काय सांगतो?
सोन्यातील भेसळीच्या या अहवालामुळे भारतातील सोन्याच्या हॉलमार्किंगच्या देखरेखीबद्दल चिंता वाढली आहे. नियंत्रक आणि महालेखापरीक्षक (सीएजी) यांच्या मसुदा अहवालानुसार, 2024-25 दरम्यान 81% नोंदणीकृत सराफांची तपासणी झाली नाही. अहवालात असेही आढळून आले की, भारतीय मानक ब्युरो (ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स) मान्यताप्राप्त मापन आणि हॉलमार्किंग केंद्रांसाठीच्या आपल्या देखरेख उद्दिष्टांमध्ये 43.7% ने कमी पडले. भारतीय मानक ब्युरोने या त्रुटींसाठी कर्मचाऱ्यांची कमतरता आणि दुर्गम भागातून नमुने गोळा करण्यातील अडचणींना जबाबदार धरले, परंतु सीएजीने हे स्पष्टीकरण फेटाळून लावले.
सोन्यातील भेसळ कशी ओळखता येते?
एक्स-रे फ्लुरोसेन्स विश्लेषण आणि इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी यांसारख्या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून परकीय धातू ओळखता येतात आणि सोन्याच्या नमुन्यांची रचना तपासता येते. सोने खरेदी करणाऱ्या नागरिकांना असा सल्ला दिला जातो की, त्यांनी हॉलमार्क असलेले दागिने केवळ विश्वसनीय विक्रेत्यांकडूनच खरेदी करावेत आणि खरेदी करण्यापूर्वी त्याची शुद्धता तपासावी. तसेच, खरेदीचे बिल आणि जीएसटी चलन जपून ठेवणे महत्त्वाचे आहे. बील असेल तरच सोन्याचा दागिना विकता येतो.