मुंबईतील प्रदूषण हा चिंतेचा विषय ठरला आहे. पावसाळा संपताच मुंबईसह महानगरातील वायू प्रदूषणाची पातळी वाढली आहे. हवेची गुणवत्ता खालावली आहे. त्याचा परिणाम लाहन मुले, ज्येष्ठ नागरिकांसह सर्वांच्या आरोग्यावर होत आहे. प्रदूषणावर मात करण्यासाठी तातडीने उपाययोजना आखण्याची आवश्यकता आहे. मुंबई महापालिकेच्या पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभागाने शहरातील वायुप्रदूषण करणाऱ्या हॉटस्पॉटवर लक्ष केंद्रित केले आहे.
मुंबई महापालिकेकडून शहरात प्रदूषण करणाऱ्या हॉटस्पॉटवर आता नजर ठेवणार आहे. त्यासाठी प्रभागनिहाय वायुप्रदूषण हॉटस्पॉट जागांची निवड करण्यात आली असून त्यात धारावी पुनर्विकास प्रकल्प, शिवाजी पार्क मैदान, मेट्रोची कामे, बुलेट ट्रेन प्रकल्प यांचा समावेश आहे. पालिकेने आत्तापर्यंत 17 प्रभागांतील 129 हॉटस्पॉटची निवड केली असून एम पूर्व आणि जी दक्षिण प्रभागामध्ये अनुक्रमे 25 आणि 18 असे सर्वाधिक वायुप्रदूषण हॉटस्पॉट आहेत.
सर्वाधिक प्रदूषण करणाऱ्या या हॉटस्पॉटवरील प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी लवकरच पालिका कठोर पावलं उचलण्याची शक्यता आहे. पालिकेकडून तशा हालचाली करण्यात येत आहेत. तसंच, मुंबईतील वायुप्रदूषण नियंत्रणासाठी महापालिकेने नुकताच 'वायुप्रदूषण नियंत्रण व अंमलबजावणी कृती आराखडा-2026' तयार केला आहे. त्यानुसार प्रत्येक महापालिका वॉर्डमध्ये किमान 10 वायुप्रदूषण हॉटस्पॉट निश्चित करण्याचा निर्णय घेतानाच बांधकामस्थळे, वाहनांच्या प्रदूषणाचा यात समावेश करण्यावर शिक्कामोर्तबही करण्यात आले आहेत.
धारावी, मेट्रोची कामे, बुलेट ट्रेन, गोरेगाव-मुलुंड लिंक रोड (जीएमएलआर), एल्फिन्स्टन पूल,
‘एम’ पूर्व वॉर्डमध्ये घाटकोपर-मानखुर्द लिंक रोड, गोवंडी आणि शिवाजीनगर परिसरातील विकासकामे
‘टी’ वॉर्डमध्ये गोरेगाव-मुलुंड लिंक रोड, पूर्व द्रुतगती मार्ग, मुलुंडमधील 90 फूट रोड आणि एलबीएस मार्गावरील वाहतूक व विकासकामांचा समावेश आहे.
‘आर’ उत्तर वॉर्डमध्ये पश्चिम रेल्वेवरील पाचवी-सहावी मार्गिका, दहिसर गावठाण आणि महापालिकेचा दहिसर ट्रान्सपोर्ट हब प्रकल्प यांचा समावेश
‘जी’ उत्तर वॉर्डमधील माहीम-माटुंगा परिसरातील धारावी आणि शिवाजी पार्क मैदानाचा हॉटस्पॉटमध्ये समावेश
‘जी’ दक्षिण वॉर्डमध्ये वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प, मेट्रो-३ ची कामे, नेहरू सायन्स सेंटर पूल आणि विविध रस्त्यांच्या कामांचा समावेश
‘एफ’ दक्षिण वॉर्डमध्ये एल्फिन्स्टन पूल प्रकल्प आणि शिवडीतील झकेरिया बंदर रोडवरील राडारोडा साठवणुकीची ठिकाणे
एच पूर्व वॉर्डमध्ये बीकेसी परिसरातील एशियन हार्ट इन्स्टिट्यूटजवळील भाग आणि बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामांचा समावेश