SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

कर्जतपाठोपाठ आता मुंबईत वृक्षतोडीला परवानगी; 8 प्रोजेक्टला मान्यता! किती झाडांचा बळी जाणार? समोर आला आकडा

मुंबईत असलेलं संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आधीच अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले आहे. असं असताना आता येथील 468 झाडांची कत्तल होणार आहे. नेमकी कशासाठी या झाडांची कत्तल होणार हे जाणून घ्या सविस्तरपणे...

Reported By Swapnil Ghangale Written By Swapnil Ghangale
Published: Oct 29, 2026, 10:38 AM IST | Updated: Oct 29, 2026, 10:50 AM IST
Image Credit: वन्यजीव मंडळाकडून मिळाली परवानगी (प्रातिनिधिक फोटो, सौजन्य - रॉयटर्स)
Join

कर्जतमध्ये टोरंट कंपनीच्या प्रकल्पासाठी जंगतोडीमुळे राजकीय वातावरण तापलेलं असतानाच शहरी भागामध्ये असलेल्या जगातील सर्वात मोठ्या जंगलामधील म्हणजेच 'मुंबईचे फुफ्फुस' अशी ओळख असलेल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामधील शेकडो झाडांवरही कुऱ्हाड पडणार आहे. यासंदर्भात वन्यजीव मंडळाने परवानगी दिली असून वृक्षतोडीचा मार्ग मोकळा झाला आहे.

पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रातील वृक्षतोडीस मंजुरी

सध्या महाराष्ट्रामध्ये विविध प्रकल्पांमुळे मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड केली जात आहे. त्यामुळे ग्रीन झोन म्हणजेच वनक्षेत्र बऱ्याच प्रमाणात बाधित होणार. म्हणूनच पर्यावरणवादी आणि निसर्गप्रेमींकडून या अशा मोठ्या प्रकल्पांना विरोध होतोय. मात्र या विरोधाला फारसं न जुमानता पुन्हा प्रोजेक्टसाठी पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रातील वृक्षतोडीस मंजुरी देण्यात आली आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील आठ प्रकल्पांना महाराष्ट्र वन्यजीव मंडळाने मंजुरी दिली आहे. या प्रकल्पांमुळे एकूण 468 झाडे बाधित होणार असून यातील निम्म्याहून अधिक झाडे ठाण्यातील माजिवडा येथील एका खासगी बांधकाम प्रकल्पासाठी तोडली जाणार आहेत. तसेच, 476 झाडे कायम ठेवली जाणार असून 372 झाडांचे पुनर्रोपण केले जाणार आहे.

आधीच अतिक्रमणाचा त्रास

खरं तर वेगाने शहरीकरण होत असलेल्या मुंबईत असलेलं संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आधीच अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले आहे. असं असताना आता येथील 468 झाडांची कत्तल होणार असल्याने पर्यावरण संवर्धनासाठी कार्य करणाऱ्या संस्थांकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

कोणत्या कामांसाठी देण्यात आलीये परवानगी?

वन्यजीव मंडळाने कांदिवलीत खटाऊ मिलच्या जागेवर एका बांधकाम प्रकल्पाला मंजुरी दिली असून यासाठी 228 झाडे तोडली जाणार आहेत. त्यातील 92 झाडांचे पुनर्रोपण होणार आहे. या भूखंडावर जुन्या चाळी असून त्यांचा पुनर्विकास करणे आवश्यक आहे, असे मंडळाने म्हटले आहे. तसेच, राज्य सरकारच्या एका झोपु प्रकल्पासाठी पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रातील बोरिवलीच्या देवीचापाडा येथे तीन झाडे तोडली जाणार आहेत. वृक्षतोडीची मंजुरी मिळालेल्यांमध्ये ठाणे, भाईंदर, विहार तलावाजवळील 'आयआयएम' च्या पुनर्विकास प्रकल्पाचाही समावेश आहे. या वृक्षतोडीला पर्यवरणवाद्यांकडून विरोध केला जात असला तरी वन्यजीव मंडळाने परवानगी दिल्याने ही वृक्षतोड अटळ असल्याचं मानलं जात आहे.

32490 झाडे तोडण्याची परवानगी

रायगड जिल्ह्यातील कर्जत येथे टोरेंट पॉवरच्या 3000 मेगावॅट क्षमतेच्या जलविद्युत प्रकल्पासाठी एकूण 32490 झाडे तोडण्याची परवानगी वनविभागाने दिली आहे. स्थानिक नागरिक आणि पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधामुळे कर्जत येथील वृक्षतोड तूर्तास थांबवण्यात आली आहे. काम थांबवले जाण्यापूर्वी सुमारे 2700 झाडे तोडण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

मोजक्या शब्दांमध्ये...स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.पत्रकारितेचा श्रीगणेशास्वप्निल यांनी पत्रकारितेच्या दुसऱ्या वर्षापासूनच 'ठाणे वैभव' या ठाण्यातील स्थानिक वृत्तपत्रामध्ये शिकाऊ पत्रकार म्हणून कामाला सुरुवात केली. सांस्कृतिक आणि गुन्हेगारी यासंदर्भातील वृत्तांकन यांनी या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये केलं. बीएमएमच्या तृतीय वर्षाला ठाण्यातील जोशी-बेडेकर महाविद्यालयातील 'ऋत' या पत्रकारिता विभागाच्या महाविद्यालयीन वृत्तपत्रासाठी स्वप्निल यांनी उपसंपादक म्हणून काम पाहिले.डिजिटलमध्ये एन्ट्री'महाराष्ट्र टाइम्स डॉट कॉम'च्या माध्यमातून पहिल्यांदा डिजिटल क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या स्वप्निल यांनी सुरुवातीला सोशल मिडिया व्यवस्थापक म्हणून काम पाहिले. त्यानंतर हळूहळू ते डिजिटल वृत्तांकनाकडे वळले. त्यांनी 'महाराष्ट्र टाइम्स' वृत्तपत्रामध्येही माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लेखन केलं. मुख्य पुरवणीसोबतच अनेकदा रविवार विशेष अंकांमध्येही त्यांचे लेख छापून आले आहेत. 'मुंबई टाइम्स' या पुरवणीअंतर्गत विद्यार्थ्यांच्या विश्वातील अनेक विषय त्यांनी कॉलेज क्लब रिपोर्ट्सच्या माध्यमातून हाताळले. कॉलेज क्लब रिपोर्टर्ससोबतच्या कामासोबतच त्यांनी 'मटा सन्मान', 'मटा श्रावण क्विन' यासारख्या कार्यक्रमांसाठी डिजिटल आणि प्रिंटदरम्यान संयोजक म्हणून काम पाहिलं. जवळपास पाच वर्ष ते मटामध्ये कार्यरत होते.प्रगल्भतेची आसमहाराष्ट्र टाइम्सनंतर तितक्याच तोलामोलाच्या 'लोकसत्ता'मध्ये स्वप्निल यांनी काम केलं. या ठिकाणीही ते पाच वर्ष कार्यरत होते. 'मटा'पासून सुरु झालेल्या प्रवासाला 'लोकसत्ता'मध्ये प्रगल्भता लाभली. राजकीय बातम्या, ताज्या घडामोडी, ट्रेडींग बातम्या याबरोबरच त्यांनी डिजिटल आणि प्रिंटमधील समन्वयाचं (इंटीग्रेशन) कामही त्यांनी लोकसत्तामध्ये केलं. 'लोकसत्ता'मधील 'व्हिवा' या पुरवणीमध्ये तरुणाईसंदर्भातील विषयांवर त्यांनी लेखन केलं. तसेच 'लोकप्रभा'च्या माध्यमातून त्यांनी माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लिखाण केलं. लोकसत्ता डॉट कॉममध्ये स्वप्निल यांनी चार ते पाच सेक्शनसची जबाबदारी पार पाडली.तो सध्या काय करतो?'लोकसत्ता'नंतर स्वप्निल यांनी पहिल्यांदाच टीव्हीशी संलग्न वेबसाईटसाठी म्हणजेच 'झी 24 तास'च्या वेबसाईटसाठी काम करण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी ते ताज्या घडामोडींबरोबरच, राजकीय बातम्या, ब्रेकिंग बातम्या, ट्रेडिंग बातम्या हाताळतात. बातमीमधील अचूक माहिती, व्याकरण, उत्तम मथळे यासारख्या गोष्टींकडे त्यांचं कटाक्षाने लक्ष असतं. लिखाणबरोबरच मॅरेथॉन पळणं, वेगवेगळ्या ठिकाणी खादडीसाठी जाणं, पुस्तकांसोबतच अवांतर वाचन यासारख्या गोष्टींना ते प्राधान्य देतात.

ZEENEWS TRENDING STORIES