265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर झाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय, मंत्र्यांना दिले आदेश, 'जे तालुके समाविष्ट नाहीत...'
दुष्काळासंदर्भात मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा करण्यात आली असून, यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय घेतला आहे.
राज्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला असून, देवेंद्र फडणवीस यांनी 256 तालुक्यांमध्ये दुष्काळाची घोषणा केली आहे. राज्य सरकारने शनिवारी 26 सप्टेंबर रोजी यासंदर्भातील जीआर काढला. राज्यातील 358 पैकी 265 तालुक्यात दुष्काळ असून,75 टक्के महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर झाला आहे. दरम्यान दुष्काळासंदर्भात मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा करण्यात आली असून, यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय घेतला आहे. दुष्काळात वगळलेल्या तालुक्यांचाही समावेश करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
दुष्काळ निवारण मंत्रिमंडळ उपसमिती बैठक नियमित घ्या, मंत्र्यांनी आपल्या सूचना नियमितपणे या उपसमितीकडे द्याव्य असे आदेश देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. जे तालुके समाविष्ट झालेले नाहीत, त्याबाबत अन्य निकष लावून मदतीबाबत प्रस्ताव सादर करावा असंही त्यांनी सांगितलं आहे. पाणीवापर कसा करायचा याचा स्वयंस्पष्ट जीआर काढा, पिण्याचे पाणी गृहीत धरताना त्यात जनावरांचे पाणी समाविष्ट करा आणि नंतर इतर प्राधान्यक्रम ठरवा असंही त्यांनी सांगितलं आहे.
डीपीडीसीमध्ये अधिकाधिक कामे ही दुष्काळ निवारणाची घ्या. पालकमंत्र्यांनी कल्पकतेने स्थानिक स्तरावर काय निर्णय घेता येईल, यावर लक्ष द्यावे. विद्यार्थ्यांचे दहावी-बारावी परीक्षा शुल्क घेऊन रिफंड करण्यापेक्षा आधीच घेऊ नका असेही आदेश त्यांनी दिले आहेत.
बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की, "दुष्काळाबाबत आज मंत्रीमंडळात चर्चा झाली. अनेक मंत्र्यांनी तालुके पिक करपले तरी ट्रिगर 1 मध्ये बसलेले नाहीत,. त्यांनाही मदत करण्याची मागणी केली. असे जे तालुके आहेत तिथे ट्रिगर 2 मधील काही निकष आणि त्यातही बसत नसतील त्या तिथे ग्राउंड पाहणी करून दुष्काळाचे फायदे द्यायचे अशी कार्यप्रणाली ठरवली आहे. उपसमितीलाही तालुक्यातील स्थिती जाणून घेतली पाहिजे असं सांगितलं आहे. शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे पण तांत्रिक अडचणीमुळे त्यांना मदतीपासून वंचित राहू नये. उपसमिती यावर लक्ष ठेवेल. यामुळे शेतकरी, तालुक्यावर अन्याय झाला असेल तर न्याय मिळेल. मंडळ स्तरावरही तालुक्यात जाण्याचा निर्णय घेतला आहे".
अग्निवीर यांच्यासंदर्भात ते म्हणाले की, पहिली बॅच आज परत येणार आहेत. पोलीस किंवा वेगवगेळी पदे आहेत त्या पदावर आपण अग्निवीरांना सामावून घेणार आहोत. आपण त्यांना वयातही चार वर्षाची सुट देणार आहोत. पदे कमी पडली तर आणखी पदे भरले जातील . विशेष बाब म्हणून कोस्टल सिक्युरिटी म्हणून आपण त्याना आपण घेणार आहोत. सर्व अग्निवीरना आम्ही घेणार आहोत.